शिवाजी विद्यापीठाचा संशोधनपर लेख विभागात प्रथम पारितोषिक प्राप्त लेख..
_ _ _ __ _ _ _
महाराष्ट्राच्या भुमी पटलावर आजतागायत अनेक राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक स्थित्यंतरे घडली आहेत. प्राचीन काळी यामध्ये परमार, चोल, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या राजवंशां बरोबरच शिलाहार राजवंशाचीही भुमिकाही महत्त्वाची होती. शिलाहार वंशीय राजकर्त्यांनी प्रसंगी राष्ट्रकूट, चालुक्य यांसारख्या राजघराण्यांचे मांडलिकत्व पत्करून सुद्धा आपले स्वतंत्र अस्तित्व जपले होते. अशाप्रकारे आपल्या छोट्या राज्यात सुमारे तीनशे ते चारशे वर्षे चिवटपणे तग धरून राहणारे शिलाहारां सारखे इतर राजघराणे क्वचितच असेल. सध्याच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे मुळ स्थान असणार्या शिलाहारांच्या एकुण तीन शाखा महाराष्ट्रामध्ये कार्यरत होत्या. यापैकी कोल्हापूर शाखेचा थेट संबंध या कसबा बीड गावाशी असलेला दिसुन येतो.
कोल्हापूर शहरापासून पश्चिमेस 15 किमी अंतरावर असणारे कसबा बीड हे गाव तुळशी आणि भोगावती या नद्यांच्या संगमावर वसले आहे. या पवित्र संगमास 'रूद्रप्रयाग' असे म्हटले जाते. तुळशी आणि भोगावती या नद्यांनी गावच्या उत्तर, पुर्व आणि दक्षिण या बाजू वेढल्या आहेत. तर पश्चिमेस डोंगराळ आणि दुर्गम प्रदेश आहे. तीन बाजूंनी नदीने वेढलेले तसेच या नद्यांच्या काठावर स्थित गाव म्हणून यांस प्राचीन काळी 'तीरवाड' (तीर - काठ, वाड - गाव) म्हणून ओळखले जात असे.
तीन बाजूंनी नदीचा वेढा तर पश्चिमेस डोंगराळ भाग अशा प्रकारचे नैसर्गिक संरक्षण या प्रदेशास लाभले आहे. नद्या, तलाव यामुळे मुबलक पाणी, सुपीक जमीन आणि युध्द भुमीपासुन सुरक्षित अंतरावर असणार्या या प्रदेशात एखादी बाजारपेठ स्थापन करणे, लष्करी तळ उभारणे अथवा हंगामी राजधानी तयार करणे अत्यंत सोयीचे ठरते. याचेच महत्त्व ओळखून तत्कालीन सत्ताधिशांनी या ठिकाणी नगर वसवले असावे.
आज कसबा बीड हे गाव आकाराने लहान वाटतं असले तरी प्राचीन काळच्या उपलब्ध साधनांवरून सध्याची आरे, महे, कोगे, बहिरेश्वर आणि सावरवाडी ही गावे या कसबा बीडचाच म्हणजे तीरवाडचा भाग असल्याचे दिसते. जवळपास 5000 लोकसंख्या असणारे कसबा बीड हे छोटे खेडे असले तरीही याचा इतिहास मात्र मोठा आहे.
कृष्णा खोर्याच्या खालील भागाला प्राचीन काळी 'कुंतल' किंवा 'कुंतलदेश ' म्हणून ओळखले जात असे. सध्याच्या कोल्हापूर, सातारा, सांगली, बेळगाव या जिल्ह्यांचा समावेश कुंतल राज्यात होत असे. दहाव्या शतकापर्यंत राष्ट्रकूट घराणे महाराष्ट्र भुमीवर प्रबळ सत्ताधिश होते. या प्रदेेेेशावर राष्ट्रकूटांचे मांडलिक म्हणून 'सिंध घराणे' या प्रदेशाचे शासन चालवत असावे असे उपलब्ध साधनांतून आढळते. समांतर याच काळात कोल्हापूर शिलाहार शाखेचा मुळ पुरुष 'जतिग' हा राष्ट्रकूटांचा एक अधिकारी म्हणून शिमोगा (कर्नाटक राज्य) येथे कार्यरत होता.
उत्तरोत्तर सिंध घराण्याचे राजे आणि राजसत्ता कमकुवत बनत गेली आणि शिलाहार राजे हे तुलनेने अधिक प्रभावशाली बनले. साधारण दहाव्या शतकाच्या अखेरीस शिलाहार राजा 'दुसरा जतिग' याने सिंध घराण्याचा पराभव केला आणि राष्ट्रकूट घराण्याचा मांडलिक म्हणून कुंतल चे राज्य शासन चालवू लागला. सिंध घराण्याच्या राजधानीचे ठिकाण असणारे करहाट (कराड) हेच ठिकाण शिलाहारांनी आपले राजधानीचे स्थळ म्हणून निवडले. उपलब्ध अधिकृत साधनांवरून कालांतराने शिलाहारांनी आपली राजधानी वळवाड (दाजीपूर), ब्रम्हपुरी (पंचगंगा घाट परिसर) आणि अखेरीस पन्नगनालय (पन्हाळा) येथे स्थलांतरित केल्याचे दिसते.
अकराव्या शतकामध्ये मानखेटच्या (कर्नाटक राज्य) राष्ट्रकूटाची सत्ता कल्याणीच्या चालुक्यानी संपुष्टात आणली. राष्ट्रकूटांच्या पाडावानंतर चालुक्यांनी अनेक राजांना आपले मांडलिक बनवले. आपल्यापेक्षा बलाढ्य असणार्या चालुक्यांशी संघर्ष न करता शिलाहार राजांनी चालुक्यांचे मांडलिकत्व पत्करले. शिलाहार नरेश दुसरा जतिग याचा उत्तराधिकारी 'गोकं' हा चालुक्यांचा मांडलिक होता. जेव्हा चालुक्य सम्राट 'जयसिंह' ने दक्षिण कोकण मोहिम काढली तेव्हा गोंक हा चालुक्यांच्या बाजूने लढला. दक्षिण कोंकण काबिज केल्या नंतर शिलाहार नरेश गोंक याच्या पराक्रमाचे बक्षिस म्हणून जयसिंहने दक्षिण कोंकणचा कारभार गोंक यांच्याकडे सोपवला. त्यामुळे शिलाहारांची पर्यायाने कुंतल देशाची राज्य सीमा सिंधुदुर्ग, रत्नागिरी ते कदंब (सध्याचे गोवा राज्य) राज्यापर्यंत पसरली. या गोंकाचे वर्णन त्याचा पुत्र मारसिंह याच्या ताम्रपटात तो करहाट, कुण्डी, मिरींज देश आणि समग्र कोंकणचा अधिपती होता असे आहे.
चालुक्य दरबारातील बिल्हण याने त्याच्या 'विक्रमांकदेव चरित' या ग्रंथामध्ये चालुक्य सम्राट सहावा विक्रमादित्य आणि चंद्रलेखा उर्फ चंदलादेवी या शिलाहार राजकन्येच्या स्वयंवर विवाहाचे वर्णन केले आहे. चंद्रलेखा ही गोंक याच्यानंतर सत्तारूढ झालेला त्याचा जेष्ठ पुत्र राजा 'मारसिंह' याची मुलगी होती.
म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांच्या प्रदेशावर राज्य करणार्या बलाढ्य बदामीच्या चालुक्य घराण्याशी शिलाहारांचे रक्ताचे संबंध होते. हे स्वयंवर तत्कालीन शिलाहारांची राजधानी कराड येथे पार पडले. चालुक्य सम्राट सहावा विक्रमादित्य यांचे सासरे आणि शिलाहार नरेश मारसिंह हे अनेक रणसंग्रामात चालुक्यांच्या बाजुने सहभागी झाले. दक्षिणेच्या चोळ राज्यकर्त्यांच्या आक्रमणावेळी मारसिंह याने विशेष कामगिरी बजावून चोळांचे आक्रमण परतवून लावले आणि सर्व चालुक्य मांडलिकांमध्ये सर्वोच्च स्थान प्राप्त केले. राजा मारसिंहा पासून शिलाहार राजे 'महामंडलेश्वर' हे बीरूद लावत असल्याचे दिसून येते.
चालूक्य सम्राट जयसिंह याच्या कोंकण स्वारीचे वर्णन वर आले आहेच. या मोहिमे दरम्यान एका लढाईमध्ये जयसिंहाचा सेनापती धारातीर्थी पडला. या सेनापतीच्या स्मरणार्थ जयसिंह याने कसबा बीडमधील समाधी म्हणुन ओळखल्या जाणार्या जागेमध्ये एक शिवालय बांधले. याचा उल्लेख सदर मंदीराच्या चौकटीवर असणा-या शिलालेखावर आढळतो. हेच मंदीर आज कल्लेश्वर मंदीर म्हणून ओळखले जाते.
नंतरच्या काळात कसबा बीडच्या मध्यभागी प्रशस्त जागेमध्ये एक शिवमंदीर बांधण्यात आले. हे मंदीर शिलाहार राजा गंडरादीत्य यांच्या काळात उभारले असावे असा अंदाज आहे. सदर मंदिराला बीडेश्वर मंदिर असे म्हटले जाते. अशाच प्रकारची मंदिरे ही बहिरेश्वर, कोगे, सावरवाडी आणि आरे या गावी बांधण्यात आली आहेत. ही मंदिरे हेमाडपंती बांधकाम शैलीची असून अतिशय सुरेख आणि अजून टिकून आहेत.
बहिरेश्वर या गावी शेषशायी जलमंदीर आढळते. एका तलावाच्या मध्यभागी असणार्या या मंदिराचा उल्लेख करवीर महात्म्यामध्ये असलेला दिसून येतो. पाच फण्याच्या नागाच्या शय्येवर पहुडलेल्या चतुर्भुज विष्णूचं शिल्प या मंदीरामध्ये आहे. गजगी रंगाच्या गंडकी शिळेत घडवलेल्या या देखण्या शिल्पावरील प्रत्येक बारकावा कुशल कारागिराने अचूक साकारला आहे. या मंदिराच्या बाहेर गंडकी शिळेत साकारलेली एक सतीशिळा आहे. ही दोन्ही शिल्पे म्हणजे शिल्पकलेचा अप्रतिम नमुना आहेत.
कोगे या गावामध्ये एक जैन मंदीर आढळते. काळाच्या ओघात हे मंदीर विदीर्ण झाले असले तरी त्याचे काही अवशेष अजून शिल्लक आहेत. या मंदीरामध्ये भगवान पार्श्वनाथाची एक मुर्ती आहे. तसेच कसबा बीड आणि सावरवाडी या गावात जैन मुनींच्या अनेक मुर्त्या आढळतात.
कसबा बीड मध्ये कल्लेश्वर मंदीर, बीडेश्वर मंदीर यासोबत गणपती मंदीर, हनुमान मंदीर जोतिबा मंदीर, दत्त मंदीर, सदालाल महाराज मठ, गोसावी मठ, वारकरी सांप्रदायाचे ज्ञानेश्वर मंडप, संत गोरा कुंभार मंडप, विठ्ठल-रखुमाई मंडप अशी अशी लहान - मोठी मंदीरे आढळतात. तसेच गावात बहुसंख्य लोकांच्या शेतामध्ये काही लहान मंदीरे आढळतात. यांत शारजाई देवी मंदीर, भैरवनाथ मंदीर, शिव मंदीर यांचा समावेश होतो. माने, सुर्यवंशी, वरूटे, गाडवे यांच्या कुळीच्या सती गेलेल्या पुण्यवान स्त्रियांची मंदीरे देखील येथे आहेत. यासोबतच येथे मस्जिद आणि चर्च देखील आहेत. कसबा बीड मध्ये चार तलाव असल्याची नोंद आहे पण सध्या येथे गणेश तलाव आणि लक्ष्मी तलाव हे दोन तलाव अस्तित्वात आहेत. तर इतर दोन तलावांचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
कराड, खिद्रापुर, कोल्हापर इत्यादी ठिकाणी आढळलेल्या ताम्रपटांमध्ये आणि शिलालेखांमध्ये कसबा बीड म्हणजेच तीरवाडचा संदर्भ आलेला आहे. एका दानपत्रामध्ये दान दिलेल्या शेताच्या सीमा सांगताना तीरवाड (कसबा बीड) ते पन्हाळा दुर्गाला जाणार्या मार्गाचा उल्लेख असलेला दिसुन येतो. या दानपत्रा संबंधी सुचना करताना इंग्लिश इतिहासकार डॉ. ग्रॅहम म्हणतात की 'काही राजे बीड या राजधानीवर राज्य करीत होते आणि कोल्हापुर व पन्हाळा यांचा समावेश या बीडच्याच राज्यात होत होता.' या विधानाला मुंबई गॅझेटियर पुष्टी देते.
कसबा बीडचे रहिवासी श्री राजाराम वरूटे यांच्या शेतात दोन शिलालेखांचे दोन लहान भाग सापडले आहेत. पहीला शिलालेखाचा तुकडा हा शिलाहार नृपती विजयादित्य याचा आहे. या शिल्लक असलेल्या तुकड्यावर राजाचे नाव आणि लेखाच्या काळासंबंधी काही तपशील उपलब्ध आहे. यावर विजयादित्याची बिरूदे आहेत.या बिरुदांवरून त्याची तुलना त्याच्या साहीत्य प्रेमामुळे विक्रमादित्याशी केलेली दिसते. दुसरा लेख हा बाराव्या शतकातील कानडी आणि संस्कृत भाषेत आहे. तर चालुक्य सम्राट जयसिंह याने बांधलेल्या कल्लेश्वर मंदीवरील लेख मंदीर पुनर्बांधणी वेळी गहाळ झाला आहे. कसबा बीड च्या मुख्य चौकात असणार्या जोतिबा मंदीराच्या परिसरामध्ये उर्दू अक्षरे कोरलेली एक कमान असल्याचे आढळते. या कमानीच्या एका कडेला असलेल्या देवळीत 'या अल्लाह' अशी उर्दूतील अक्षरे कोरलेली दिसुन आली. यावरून एखाद्या इस्लामी प्रार्थना स्थळाचा हा अवशेष असावा व त्यावर कोरलेला मजकुर म्हणजे कुराणातील एखादा भाग (आयत) असावा असे स्पष्ट होते.
कसबा बीड चे मुख्य आकर्षण म्हणजे येथे आढळणारे 'वीरगळ'. कोणत्याही ठिकाणी वीरगळ सापडणे ही विशेष बाब वाटत नसली तरी इतर ठिकाणी सापडणार्या वीरगळांची संख्या जास्तीत जास्त 10 ते 15 आहे. परंतु कसबा बीड मध्ये सध्यस्थितीला साधारणतः 150 वीरगळ उपलब्ध आहेत. याचप्रमाणे कसबा बीड शेजारील आरे, कोगे, बहिरेश्वर, सावरवाडी या गावात अनेक वीरगळ आढळतात. वीरगळांच्या या इतक्या मोठ्या प्रमाणामुळे कसबा बीडला वीरगळांचा कारखाना अशी ओळख प्राप्त झाली आहे.
वीरगळ म्हणजे युध्दसमयी अथवा इतर अनेक कारणांमुळे धारातिर्थी पडलेल्या वीरांच्या स्मरणार्थ घडवले गेलेले स्मारक स्तंभ होय. तसेच सती गेलेल्या पुण्यवान स्त्रिच्या स्मरणार्थ देखील असे स्तंभ उभारले जातात त्यांना 'सतीगळ' किंवा 'सतीशिळा' असे म्हणतात. कसबा बीड मधील वीरगळ हे साधारणतः तीन स्तरीय आहेत पण काही ठिकाणी ते चार स्तरीय अथवा पाच स्तरीय असलेले आढळतात. या वीरगळांवर आणि सतीशिळांवर चंद्र आणि सूर्य यांच्या प्रतिमा कोरलेल्या असतात. जोपर्यंत चंद्र - सुर्य आकाशात तळपत आहेत तोपर्यंत या वीराची किंवा सतीची किर्ती अखंड राहील हे यातून प्रतीत होते.
कसबा बीड मध्ये युध्दसमयी वीरगतीस प्राप्त झालेल्या वीरांच्या स्मरणार्थ घडवले गेलेले बहुसंख्य वीरगळ आढळतात. तसेच काही सतीशिळा देखील पहावयास मिळतात. शेजारच्या आरे या गावी अदमासे पाच फुट उंच एक वीरगळ आहे. या वीरगळांवर कोल्हापूरचे शिलाहार आणि सोलापूरच्या कलचुरी यांच्यातील युध्दाचे चित्रांकण आहे. सदर युद्धात शिलाहार नृपती गंडरादीत्याचा सेनापती बोमन्ननायक याने कलचुरी राजा द्वितीय बिज्जल यांस यमसदनी पाठवून कलचुरी सेनेचा पाडाव केला मात्र स्वतःही मृत्यूमुखी पडला. यांच्या स्मरणार्थ हा वीरगळ उभारण्यात आला आहे हे यावरील लेखावरुन कळते.
सोन्याचा पाऊस पडणारे कसबा बीड..
कसबा बीड ची खरी ओळख म्हणजे सोन्याचा पाऊस पडणार गाव. आजतागायत गावात सोन्याची नाणी, सुवर्णालंकार आणि इतर काही गोष्टी सापडत आहेत. अगदी आकस्मिकपणे रोजच्या उठ-बस असणार्या ठिकाणी, जनावरांच्या गोठ्यात, शेतात काम करताना, सततच्या वर्दळीच्या ठिकाणी आणि जुन्या घरांच्या कौलावर अशी नाणी सापडल्याची उदाहरणे आहेत. म्हणूनच बीडमध्ये सोन्याचा पाऊस पडतो आणि ही नाणी फक्त नशीबवानालाच सापडतात अशी अख्यायिका रूढ झाली असावी. कसबा बीडमध्ये या नाण्यांना बेडा म्हटलं जात. यावरुनच तीरवाडला कालांतराने बीड हे नाव पडले असावे असा तर्क आहे. कसबा बीडमधील आणि पंचक्रोशीतील अबालवृध्दाच्या तोंडी हमखास 'सोन्याचा पाऊस पडणारे बीड' ही आख्यायिका ऐकायला मिळते.
कसबा बीड येथे झालेल्या संशोधनाअंती तज्ञ म्हणतात कि, येथे आढळणार्या मुद्रा आणि नाणी ही प्राचीन काळी एखाद्या समारंभावेळी उधळल्या गेल्या असाव्यात अथवा परकीय आक्रमण वेळी त्या जमिनीवर विखुरल्या गेल्या असाव्यात. ज्या त्यावेळी जमिनीत गाडल्या गेल्या आणि आता कालानुरूप त्या सापडत आहेत.
गावातील जाणकार व वृद्धमंडळीच्या म्हणण्यानुसार पूर्वी गावामध्ये काही ठिकाणी एकत्रित स्वरुपात लहान पात्रांमध्ये अथवा हंड्यामध्ये अशी नाणी किंवा मुद्रा सापडल्या आहेत. यामध्ये सोन्याबरोबरच तांबे आणि चांदीची नाणी सापडल्याची माहिती मिळते. पण याची पुष्टी देणारा अधिकृत पुरावा मिळत नाही.
कसबा बीडमध्ये सापडणार्या या नाण्यांवर नाग, घोडा, हत्ती यासारखे प्राणी, पक्षी, विविध आयुधे, फुले आणि कन्नड अक्षरे कोरलेली आहेत. अनेक नाग्यांवर शिलाहारांची राजमुद्रा असणारी गरुडमद्रा आढळते. तसेच अलकारांमध्ये झूबा, नथ, हार इत्यादींचा समावेश होतो. यासोबतच अस्सल सोन्यात घडवलेली गणपतीची लहान मुर्ती, वेटोळे घातलेला, फणा काढुन आक्रमक पवित्र्यात असलेला ऐटबाज नाग इत्यादी गोष्टी गावामध्ये सापडल्या आहेत. इतिहास संशोधकांच्या मतानुसार ही आढळणारी नाणी, अलंकार हे शिलाहार आणि यादव कालीन आहेत.
प्राचीन काळी शिलाहारांची सत्ता उत्तर कोंकण, दक्षिण कोंकण आणि कोल्हापूर या प्रातांवर होती. कसबा बीडशी संबंधीत असणार्या शिलाहार शाखेची सत्ता कोल्हापुर, सांगली, सातारा, बेळगाव आणि रत्नागिरी सिंधुदूर्ग या जिल्ह्यावर होती. तर देवगिरीच्या यादव राजांनी जवळजवळ संपुर्ण महाराष्ट्र आपल्या सत्तेने व्यापला होता. या राजसत्ताच्या अनेक राजधान्याही होत्या. पण यापैकी कोणत्याही ठिकाणी अशा प्रकारे विखुरलेली आणि अजूनपर्यंत मुद्रा आणि सुवर्णनाणी सापडत नाहीत. यावरुनच कसबा बीडचे विशेष महत्त्व लक्षात येते. कसबा बीड हे शिलाहार घराण्यासाठी तेव्हा महत्त्वाचे होतेच पण आज ते कोल्हापूर जिल्ह्यासाठीही अत्यंत भुषणावह असे आहे.
साधारण 1946 सालामध्ये गावात अधिकृतरित्या उत्खनन आणि संशोधन झाले आहे असे जाणकार सांगतात. पण याचा अहवाल मात्र आज उपलब्ध नाही. या उत्खननात चालुक्य आणि शिलाहार कालीन कलाकुसरीची भांडी, मोठे हंडे, खलबत्त्यासारख्या दगडी प्रापंचिक वस्तू इत्यादी गोष्टी आढळल्या आहेत. तर समाधी म्हणून ओळखल्या जाणा-या ठिकाणी मानवी आणि घोड्यांचे सांगाडे आणि हाडे सापडली आहेत. न्हावटेक या नावाने प्रसिध्द परिसरामध्ये लोखंडी वस्तारा आणि काही पाती सापडली आहेत. तसेच रानबाव या ठिकाणी अनेक मुर्त्या, वीरगळ आणि वाड्याचे अवशेष असल्याचे दिसून येते. न्हावटेक या ठिकाणी वाड्याच्या पायाच दगड स्पष्ट दिसतात. या गोष्टींचा समावेश त्या संशोधनामध्ये केल्याचे समजते.
समारंभावेळी सुवर्णमुद्रा उधळणे आणि येथे आढळणार्या कोरीव मुर्ती, कलाकुसरीची भांडी यावरुन कल्पना येते की प्राचीन काळी कसबा बीड नगर किती श्रीमंत आणि वैभव संपन्न असेल! शिलाहार राजवटीमध्ये कसबा बीड हे राजधानीचे ठिकाण असल्याची अधिकृत माहिती मिळत नाही. पण उपलब्ध पुराव्यावरून आणि अवशेषांवरून कसबा बीड येथे किमान हंगामी राजधानी किंवा लष्करी तळ किंवा मोठी बाजारपेठ असावी यांस दुजोरा मिळतो.
बाराव्या शतकाच्या अखेरीस शिलाहार नरेश द्वितीय भोज हा सत्तेवर आला. या काळात राज्य संरक्षणाच्या दृष्टीने किल्यांचे महत्त्व वाढले. म्हणून शिलाहार नरेश द्वितीय भोज याने त्याच्या राज्यात अनेक किल्ल्यांची निर्मिती केली. यामध्ये विजयदूर्ग, पन्हाळा, रांगणा, अजिंक्यतारा, सामानगड, विशाळगड, भूदरगड हे किल्ले महत्वाचे आहेत. द्वितीय भोज हा महाराजाधिराज हे बिरुद वापरत असे. यावरुन तो स्वतंत्र राजा म्हणून राज्य करत असल्याचे प्रतीत होते. याच काळात देवगिरीच्या यादवांनी चालूक्यांचे उरलेसुरले राज्य संपवले. पण शिलाहार राजा भोज याने यादवांचे मांडलिकत्व पत्करण्यास नकार दिला. म्हणुन यादव राजा सिंघण याने शिलाहारांवर आक्रमण करुन त्यांचा पाडाव केला. आणि कुंतलचा सर्व भाग आपल्या अधिपत्याखाली आणला.
चालुक्य सम्राट जयसिंह याचा कसबा बीडसोबत असलेला संबंध त्याने बांधलेल्या कल्लेश्वर मंदीवरुन कळतो. शिलाहार राजे गोंक, गंडरादीत्य, विजयादित्य, द्वितीय भोज यांचा कसबा बीड सोबत निकटचा संबंध होता हे उपलब्ध साधनांतून लक्षात येते. कसबा बीड हे गाव शिलाहारांचे राजधानीचे ठिकाण आहे किंवा नाही याबाबत मतभेद असले तरी काही तज्ञ म्हणतात की, "काही काळ का असेना पण सांगली, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश असणार्या कुंतल देशाचा कारभार याच कसबा बीड (तीरवाड) मधुन चालत असे." तसेच येथे आढळणार्या घोड्यांच्या सांगाड्यांवरून येथे लष्करी तळ असावा असे तज्ञ सांगतात. तर ताम्रपटावर कसबा बीड ते पन्हाळा (तीरवाड ते पन्नगनालय) या मार्गाचा उल्लेख आढळतो. त्यायोगे कसबा बीड येथे बाजारपेठ असावी आणि कसबा बीड व पन्हाळा यांचा व्यापारी संबंध असावा असाही अंदाज व्यक्त केला जातो.
गावात शैवपंथीयांची शिव मंदिरे आणि वैष्णवपंथीयांची विष्णु मंदीरे आढळतात. पुर्वी काही काळ शैवपंथीय आणि वैष्णवपंथीय यांत टोकाचा संघर्ष होता पण या गावामध्ये प्राचीन काळी शैवपंथीय आणि वैष्णवपंथीय लोक हे एकत्र राहत असावेत असे दिसते. तर येथे आढळणारे जैन मंदिर आणि जिनांच्या मुर्त्या यावरुन जैन धर्माला येथे राजाश्रय असल्याचे लक्षात येते. याचबरोबर येथे आढळणाच्या उर्दु शिलालेखा वरुन प्राचीन अथवा मध्ययुगीन काळात येथे मुस्लीम वस्ती असावी किंवा कसबा बीड मधील बाजारपेठेमध्ये अरब व्यापार्यांची रेलचेल असावी असा अंदाज वर्तवला जातो. या सर्वांवरून शिलाहार राजे हे सर्व धर्मीयांचे आश्रयदाते होते हे स्पष्ट होते. तसेच कसबा बीड ला गाव प्राचीन काळापासून सर्व धर्म समभाव व सहिष्णूतावादी संस्कृतीचा वारसा लाभला आहे हे समजते.
गावातील हर एक व्यक्ती 'मी भोज राजाच्या राजधानीच्या गावचा' अशी ओळख करून देताना शिलाहार राजांप्रती असणारा अभिमान आणि आदरभाव प्रकट करतो. प्राचीन वैभवाचा आणि संपन्नतेचा प्रचंड इतिहास आपल्या उदरात सामावून आज हे कसबा बीड नांदत आहे. प्राचीन काळाचे शिल्लक अवशेष, वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरा आणि अख्यायिका गावाने आजही जपल्या आहेत. कसबा बीडच्या नागरीकांमध्ये शिलाहार राजघराण्या बद्दलचा अभिमान आणि कुतूहल अजुनही जागृत आहे. आपली ही प्राचीन संस्कृती आणि प्राचीन ठेवा कसबा बीड मोठ्या आस्थेने जपत आहे.
धन्यवाद...🙏
संदर्भ -
1) कसबा बीड एक ऐतिहासिक नगर - डाॅ. आनंद दामले.
2) मुंबई गॅझेटियर
3) महाराष्ट्र राज्य गॅझेटियर
4) कोल्हापूर जिल्हा गॅझेटियर
5) सातारा जिल्हा गॅझेटियर
6) रत्नागिरी जिल्हा गॅझेटियर
सुरज संजय तिबीले.
यंग ब्रिगेड, सुवर्णराजधानी कसबा बीड
मोबाईल नंबर - 9503973234