Thursday, 17 December 2020

शिलाहार राजवंश


          या बलाढ्य दख्खनच्या पठारावर अनेक राजसत्ता उदयास आल्या. अनेक सुप्रसिद्ध राजे, राजवंश येथे घडले. यातीलच एक म्हणजे शिलाहार राजवंश. तब्बल सातव्या शतकापासुन दख्खनच्या राजपटलावर शिलाहार घराण्याचे अस्तित्व आपल्याला आढळते. शिलाहार राजे हेे महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रांतावर राज्य करत असत. सुमारे तिनशेहुन अधिक वर्षे आपल्या मर्यादित राज्यात तग धरून असणारी शिलाहारांशिवाय इतर राजसत्ता आढळत नाही. 

          ● मुळ स्थान

          सातव्या शतकात शिलाहार राजे हे पुर्वकालीन चालुक्य राजांचे मांडलिक म्हणून सध्याच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर (तगर) या ठिकाणी राज्य करत असत. पुर्वकालीन चालुक्यांच्या पतनानंतर काही धाडसी शिलाहार कुमारांनी पश्चिमेस आणि दक्षिणेस जात राष्ट्रकूटांच्या अधिपत्याखाली आपापली राज्ये स्थापल्याचे दिसते. उपलब्ध पुराव्यांनुसार शिलाहारांच्या एकुण सहा शाखा महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या राज्यात कार्यरत होत्या. यापैकी फक्त तीन शाखा विशेष प्रसिद्ध आहेत तर तीन शाखा अज्ञात आहेत.

          या सर्व शाखांचे शिलाहार राजे स्वतःला तगरपुरेश्वर, तगरपुरपरमेश्वर (कर्नुल शाखा), तगरपुरनगराधिश्वर (एलमेल शाखा), तगरपुरवराधिश्वर (अक्कलकोट शाखा) अशी बिरूदे वापरत असत. या बिरूदांवरून ते आपले मुळ स्थान तगर चा निर्देश करतात. शिलाहारांच्या सर्वप्रथम प्रसिद्ध झालेल्या ताम्रपटाचे संपादन विल्फर्ड यांनी केले होते. त्यांनी तगर म्हणजे देवगिरी म्हणजेच दौलताबाद असावे असे अनुमान काढले होते. अशाच प्रकारे वेगवेगळ्या संशोधकांनी आपली वेगवेगळी मते मांडली. भगवानलाल इंद्रजी यांनी तगर म्हणजे पुणे जिल्ह्यातील जुन्नर हे ठिकाण असावे असा अंदाज वर्तवला तर रा. गो. भांडारकर यांनी तगर हे बीड जिल्ह्यातील दारूर हे ठिकाण असावे असे मत मांडले. वि. का. राजवाडे यांनी तगर हे पुर्वीच्या हैद्राबाद संस्थानातील कणकगिरीच्या उत्तरेस असणारे तवंगीर या ठिकाणी असावे असे अनुमान काढले. डाॅ. फ्लीट यांनी सुरूवातीला करवीर म्हणजेच तगर असावे असे अनुमान काढले होते. तगर आणि करवीर ही दोन्ही एकाच फुलाची नावे आहेत आणि करवीर हे कोल्हापूरचे सध्या प्रचलित असलेले दुसरे नाव आहे यावर डाॅ. फ्लीट यांचे अनुमान आधारलेले होते. पण नंतर डाॅ. फ्लीट यांनी आपले मत बदलुन तगर हे सध्याच्या मराठवाडा विभागातील उस्मानाबाद जिल्ह्यातील 'तेर' हेच गाव आहे हे सप्रमाण सिद्ध केले.

          दक्षिण भारताच्या पुर्व किनाऱ्यावरील नागार्जुनकोंड, विणुकोंड, वेंगी यांसारख्या नगरांपासुन पश्चिमेस भडोच (प्राचीन नाव बॅरिगाझा) आणि उत्तरेस उज्जयिनी यांना जोडणाऱ्या मार्गावरील तगर ही प्रतिष्ठान (पैठण) आणि नाशिक याप्रमाणे एक प्रमुख बाजारपेठ होती. टाॅलेमी आणि पेरिप्लस यांनी आपल्या पुस्तकांमध्ये तगर चा उल्लेख केला आहे. पण त्यांनी निर्दिष्ट केलेल्या दिशा व अंतरे चुकली आहेत. टॉलेमीने तगर हे भडोच च्या ईशान्येस आहे असे म्हटले आहे तर पेरिप्लस तगर पैठण पासून दहा दिवसाच्या अंतरावर आहे असा निर्देश करतात. पैठण पासून तगरचे अंतर ९६ मैलाचे आहे. तेरे येथे सध्या अर्धवर्तुळाकृती पृष्ठभागाचे त्रिविक्रम मंदिर विद्यमान आहे. हे मूळचे चौथ्या शतकातले बौद्ध चैत्य असावे असा तर्क केला जातो. तसेच येथे उपलब्ध अनेक मंदिरे, लेख, मातीच्या भांड्यांचे तुकडे, मृण्मयमूर्ती आणि नाणी यावरून तेर हे अत्यंत भरभराटीचे ठीकाण असावे याचा अंदाज येतो.

उत्पत्तीकथा ●

          सर्व शिलाहार राजे आपण विद्याधर नृपती जीमुतकेतु यांचा पुत्र जीमुतवाहन यांस आपला मूळ पुरुष मानतात. मध्ययुगीन भारतीय लेखात अनेक राजवंशांची उत्पत्ती ही प्राचीन काळच्या विख्यात वंशापासुन (उदाहरणार्थ कौरव, पांडव इत्यादी पासून) किंवा एखाद्या व्यक्तीपासून (उदाहरणार्थ राम, लक्ष्मण, कर्ण इत्यादी पासून) झाली आहे असे वर्णन आढळते. त्याचप्रमाणे शिलाहार राजे आपली उत्पत्ती विद्याधर नृपती जीमुतकेतू यांचा पुत्र जीमुतवाहन ज्याने गरुडाच्या तावडीत सापडलेल्या नाग कुमार शंखचुडाला त्याच्या बदली स्वतःचा बळी देऊन मुक्त केले त्याच्या वंशात उत्पन्न झालो असा आपल्या लेखात अभिमानाने उल्लेख करतात.

          गरुडाने वासूकीला आपल्या प्रजेतून एक एक सर्प देण्यास भाग पाडले. एके दिवशी शंखचुड नामक सर्पाची पाळी आली. त्याने एका शिलेवर बसून गरुडाच्या हल्ल्याची वाट पाहायची होती. जीमुतवाहन विद्याधर कुमाराला हे पाहून फार वाईट वाटले. त्याने शंखचूड गोकर्ण येथे हे भगवान शिवाच्या दर्शनाला गेला असता त्याची जागा घेतली. तितक्यात गरुडाने तेथे येऊन जिमुतवाहनास भक्षणार्थ नेले.  त्याला अर्धामुर्धा खाल्ल्यावर गरुडाला आपली चूक कळून आली. तेव्हा जीमुतवाहनाच्या पत्नीच्या प्रार्थनेवरून पार्वतीने त्याला जिवंत केले. गरुडाने तेव्हापासून सर्प न खाण्याचे ठरवले आणि त्यापूर्वी मारलेल्या सर्व सर्पांना जीवित केले.

          ही जीमुतवाहनाची कथा मूळच्या पैशाची भाषेतील 'बृहत्कथेमध्ये' होती. तो ग्रंथ आता उपलब्ध नाही. तथापि त्याची संस्कृत रूपांतरे सोमदेवाचे 'कथासरीत्सागर' आणि मज्जरी यांच्या 'बृहत्कथा' मध्ये ती दोन ठिकाणी आली आहे. हे दोन्ही ग्रंथकार अकराव्या शतकात काश्मिरात होऊन गेले.

          उत्तर कोकण शाखेतील शिलाहार छद्वैदेवाच्या सर्वात प्राचीन ताम्रपटात या वंश नामाचे वेगळी उत्पत्ती दिली आहे. त्यात म्हटल्याप्रमाणे परशुरामाच्या बाणाने त्रस्त झालेल्या पश्‍चिम समुद्राचे रक्षण 'सिलार' नामक विराने केले म्हणून त्याच्या वंशजांना 'सिलार' नाव पडले. पण ही आख्यायिका इतरत्र आढळत नाही.

प्रमुख शिलाहार शाखा

          सातव्या शतकामध्ये चालुक्य राजवंशाच्या पतनानंतर महत्त्वाकांक्षी शिलाहार राजांनी राष्ट्रकूटांचे मांडलिक म्हणून आपापली राज्य स्थापन केली. अशा प्रकारे काळानुरुप शिलाहारांच्या एकुण सहा शाखा स्थापन झाल्या. या सहा शाखांपैकी दक्षिण कोकण, उत्तर कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार या तीन शाखा विशेष प्रसिद्ध आहेत.

          सर्वप्रथम दक्षिण कोकण कोकणामध्ये शिलाहारांची शाखा स्थापन झाल्याचे दिसते. दक्षिण कोकण शाखेचा संस्थापक शिलाहार सन्ना फुल यांना राष्ट्रकूट राजा कृष्ण यांच्या कृपेने राज्य मिळाले असा उल्लेख शिलाहारांच्या ताम्रपटात आला आहे. या शाखेच्या अधिपत्याखाली सध्याचा गोवा (प्राचीन नाव सिंहल देश), सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड (प्राचीन नाव इरिडगे प्रदेश) इतका प्रदेश येत असे. सप्तकोंकण म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या प्रदेशाची बलिपत्तन (खारेपाटन) ही राजधानी होती.

          त्यानंतर काही काळात उत्तर कोंकण शिलाहार शाखेचे संस्थापक प्रथम कपर्दी यांना राष्ट्रकूट सम्राट तृतीय गोविंद यांच्या कृपेने उदयास आले असावेत. उत्तर कोंकण शाखेची सत्ता ही सध्याच्या ठाणे, कुलाबा, मुंबई, पालघर, रायगड जिल्ह्याचा काही भाग तर गुजरात राज्याच्या दक्षिण भागावर चालत असे. कवडीद्वीप किंवा पुरीकोंकण म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या राज्याची राजधानी प्रथम पुरी (दंडाराजपुरी अथवा राजापुरी) आणि नंतर ठाणे (स्थानक) या ठिकाणी स्थित होती.

          कोल्हापूरचे शिलाहार बऱ्याच काळाने उदयास आलेले दिसतात. या शाखेचा मूळ पुरुष प्रथम जतिग हे गोमंथ गिरीदुर्गाचे अधिपती होते. हा गोमंत पर्वत कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यात स्थित आहे. कोल्हापूर शाखेच्या शिलाहारांचे पूर्वज हे तगरहून निघाल्यानंतर काही काळ कर्नाटक राज्याच्या शिमोगा जिल्ह्यात राज्य करीत होते असे दिसते. कालांतराने या शिलाहार शाखेने कोल्हापूर (प्राचीन नाव एडेनाड किंवा क्षुल्लकपुर) या प्रदेशावर आपले राज्य स्थापले असावे. या शाखेचे कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव आणि दक्षिण कोंकणचा काही भाग यावर राज्य चालत असे. कुंतल देश म्हणून प्रसिद्ध या राज्याची वळवाड आणि पन्हाळा ही राजधानी होती.

भाषा आणि समाजव्यवस्था ●

          शिलाहार हे कन्नड भाषिक होते. त्यांचे मूळ स्थान तगर हे प्राचीन काळी कन्नड देशात अंतर्भूत होत असे. शिलाहार राजे कन्नड भाषिक होते हे त्यांच्या स्वतःच्या कन्नड बिरूदांवरून (उदाहरणार्थ मलगलगण्ड, गण्डरगण्ड, दण्डवड़र, नन्नीसमुद्र, मरुवक्कसर्प, इडुवरादित्य, अय्यनसिंग इत्यादी) आणि त्यांच्या प्रमुख लेखांवरून स्पष्ट दिसते. शिलाहारांचे प्रमुख लेख हे कन्नड आणि संस्कृत भाषेतच अधिक आढळतात. कोंकणातील सामान्यांची भाषा ही मराठी तर कोल्हापूर प्रदेशातील सामान्यांची भाषा ही कन्नड होती.

          शिलाहार काळात हिंदू, जैन, लिंगायत आणि बौद्ध धर्मी लोक एकत्र राहत असावेत हे उपलब्ध मंदीरे आणि अवशेषांवरून दिसते. सर्वच धर्मांना राजाश्रय होता. तर सर्व समाज हा आपल्या कार्यानुरूप विभागला गेला होता. समाजातील सर्व घटक हे परस्परांवर अवलंबून होते.

राज्य व्यवस्था 

          प्राचीन काळी राज्य शासनाच्या सोयीकरता प्रदेशाचे अनेक विभाग आणि पोटविभाग केले होते. शिलाहार राजवंशाच्या काळात सदर विभाग आणि पोटविभागांसाठी देश, विषय, खंपण/गंपण, नगर व ग्राम अशा संज्ञा प्रचलित होत्या. शिलाहार काळात कोल्हापूर प्रदेशातील सामान्य लोकांची भाषा कन्नड असल्याने तेथील विभागांची नावे ही कन्नड भाषेत तर कोंकण प्रदेशातील विभागांची नावे ही मराठी भाषेत असलेली आढळतात.

          यांत सर्वांत मोठ्या विभागाला देश ही संज्ञा वापरली जाते (उदाहरणार्थ कुंतल देश, महादेश). देशाचा पोटविभाग तो विषय. विषयांच्या शेवटी नाड किंवा खोल्ल अशी नावे जोडलेली असत (उदाहरणार्थ एडेनाड, आजिरगेखोल्ल). विषयांचे खंपण आणि गंपण या नावाचे पोटविभाग पडतात (उदाहरणार्थ मिरींजेगंपण, कोडवल्लिखंपण). त्याचे पोटविभाग म्हणजे ग्राम. याच्या शेवटी पल्लि, पल्लिका, वाड आणि ग्राम अशा संज्ञा वापरल्या जातात (उदाहरणार्थ मंचकपल्लि, चिख्यलपल्लिका, तीरवाड, बोपग्राम). शिलाहार कालीन नगरे ही स्वयंपूर्ण होती. शेती ही अर्थव्यवस्थेचा कणा होती तर सरकारात जमा होणारा शेतासारा, व्यापारावर आकारला जाणारा कर यावर राज्यव्यवस्था चालत असे.

मंदीरे, शिल्पकला आणि नाणी

          शिलाहार राजे हे उदारमतवादी होते. शिलाहार राजवंशाच्या शासन काळात अनेक हिंदू, जैन आणि बौद्ध मंदीरांची स्थापना करण्यात आली. यामध्ये अंबरनाथचे शिव मंदीर, कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदीर आणि जैन मंदीर तसेच रूपनारायण मंदीर ही विशेष प्रसिद्ध आहेत. याशिवाय शिलाहार नृपती हे कलेचे भोक्ते होते. शिलाहार काळात शिल्पकलेला विशेष प्रोत्साहन होते. या काळातील अनेक मंदीरे, लेणी, वीरगळ, सतीगळ, शिल्पे आणि लेख यांचे कोरीव काम हे अचंबित करणारे आहे.

          शिलाहार काळात मोठ्या प्रमाणावर सुवर्ण नाणी आणि मुद्रा तयार केल्या गेल्या. शिलाहारांच्या लेखात फणम्, बिसिगे आणि द्रम्म या नाण्यांचा उल्लेख आढळतो. फणम् किंवा पणम् हे अगदी लहान आकाराचे पाच किंवा सहा ग्रेन वजनाचे नाणे आहे. तर बिसिगे हे संस्कृत विशोपक किंवा मराठी विसोवा प्रमाणे फणम् च्या विसांश किंमतीचे नाणे असावे. अशा प्रकारची असंख्य नाणी आजतागायत प्राप्त झाली आहेत, होत आहेत.

          शिलाहार राजांच्या अनेक ताम्रपट आणि शिलालेखांवर गरूडमुद्रा आढळते. यावरून ही गरूडमुद्रा शिलाहारांची राजमुद्रा असल्याचे स्पष्ट होते. अशीच गरूडमुद्रा असणारी अनेक नाणी प्राप्त झाली आहेत. याशिवाय विविध प्राणी, वृक्ष, विविध आयुधे, टिंबे कानडी अक्षरे कोरलेली नाणी आढळतात. तसेच झुबा, अंगठी अशाप्रकारचे सुवर्णालंकार आणि सोन्याचा नाग, तार यासारख्या वस्तू सापडल्या आहेत.


संदर्भ -

२) शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख

          - वासुदेव विष्णू मिराशी

३) महाराष्ट्र व गोवे शिलालेख - ताम्रपटांची वर्णनात्मक संदर्भ सुची

          - शांताराम भालचंद्र देव


🙏 धन्यवाद 🙏

 

सुरज संजय तिबीले

यंग ब्रिगेड, सुवर्णराजधानी कसबा बीड 

मो. नं. ९५०३९७३२३४

ई-मेल : tibilesuraj7@gmail.com