कसबा बीड गावास हजारो वर्षांचा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा लाभला आहे. अनेक ऐतिहासिक मंदीरे, वीरगळ, शिल्प, सोन्याचा पाऊस, विविध अख्यायिका यासाठी कसबा बीड प्रसिद्ध आहेच पण येथे पूर्वापार चालत आलेल्या प्रथा परंपरांसाठी देखील कसबा बीड ओळखले जाते. अशीच एक परंपरा म्हणजेच गावाची म्हाई. म्हाई म्हणजे एखाद्या देवतेला कौल लावून अथवा गाऱ्हाण्यापोटी किंवा नवस म्हणून बळी अर्पण करणे होय. साधारण पावसाळ्याच्या सुरूवातीस गाव पातळीवर निर्णय घेवुन आषाढी एकादशीनंतर येणाऱ्या दुसर्या मंगळवारी गावची मुख्य म्हाई आयोजित केली जाते. आषाढी एकादशी ते श्रावण मासारंभ या दरम्यानच्या पंधरवड्यात गावात एकूण तीन म्हाई केल्या जातात. यांत सुरूवातीस गल्ली म्हाई त्यानंतर गाव म्हाई आणि नंतर दत्तुंड्याची म्हाई याचा समावेश होतो.
श्री दत्तुंडा मंदीरास एक वेळ तर गावची लोकदेवता श्री देवी मरगाईस दोन वेळा बळी अर्पण केले जातात. या मरगाई देवीस पार्वतीचा अवतार मानले जाते. महाराष्ट्राच्या अनेक गावखेड्यांच्या वेशीवर मरगाईची मंदिरे असलेली आढळतात. देवी मरगाईस रोग नाशक, जंतू विनाशक देवी मानले जाते. मरगाईच्या कृपेने पुरामार्फत किंवा पावसाळ्यात उद्भवणारे विविध सांसर्गिक रोग गावच्या वेशीवरच नष्ट व्हावेत आणि त्यांची बाधा गावातील लोकांना होऊ नये यासाठी या देवीचे स्थान हे गावाच्या वेशीवर असते.
कसबा बीड गावाच्या वेशीवर देखील श्री देवी मरगाईचे प्राचीन मंदीर आहे. गल्ली म्हाई आणि गाव म्हाई दिवशी मरगाई देवीस बळी अर्पण केले जातात. देवीचा दही भाताचा नैवेद्य गावच्या वेशीवर टाकला जातो आणि रक्त पिपासिनी मरगाई देवी रक्ततीलक लावून आमच्या गावाचे रोगांपासून रक्षण कर असे गाऱ्हाणे देवीसमोर मांडले जाते. तर दत्तुंड्याच्या म्हाईला श्री दत्तुंडा देवास गावातील जनावरांचे सांसर्गिक रोगापासून रक्षण व्हावे यासाठी बळी अर्पण केले जातात. कसबा बीड गावात तिन्ही बाजूंनी नदीचा वेढा आहे. पावसाळ्याच्या दिवसात गावाला पुराचा वेढा पडतो. यातुन गावात अनेक रोग पसरू नयेत त्यापासुन गावातील लोकांचे, जनावरांचे रक्षण व्हावे म्हणून कसबा बीड गावात ही प्रथा पूर्वापार चालत आली आहे.
सुरज संजय तिबीले
यंग ब्रिगेड सुवर्ण राजधानी कसबा बीड
मो. नं. 9503973234