Saturday, 26 September 2020

कोल्हापूर जिल्हा दुर्ग भ्रमंती

          महाराष्ट्राला गड-किल्ल्यांच्या स्वरूपात मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्राचा बहुतांश इतिहास या गडांभोवतीच रेंगाळतो. प्राचीन काळी गडकोटांची उभारणी ही मुख्यतः टेहळणी साठी केली जात असे. व्यापारी मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी चौकीच्या स्वरूपात किल्ल्यांचा वापर होत असे. कालांतराने या किल्ल्यांचे प्रदेश संरक्षणासाठीचे महत्व ओळखून हे गडकोट सामरीक दृष्ट्या सज्ज केले गेले. याच गड-किल्ल्यांवर अनेक राजसत्तांचा उदय झाला. तसेच अनेक राजसत्ता लयास ही गेल्या. या अजिंक्य आणि बेलाग गडांच्या जोरावरच छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे कल्याणकारी स्वराज्य उभे केले. तर हे किल्ले सर करता करता सबंध भारतावर राज्य करणारी मुघल सत्ता खिळखिळी झाली.

          कोल्हापूर जिल्ह्याला देखील प्राचीन काळापासून गड-किल्ल्यांची परंपरा लाभलेली आहे. प्राचीन काळी कोल्हापूर प्रदेशावर राज्य करणाऱ्या शिलाहार राज्यकर्त्यांनी टेहळणीसाठी आणि आपल्या राज्याच्या रक्षणासाठी काही किल्ल्याची निर्मिती केली. यामध्ये पन्हाळा, पावनगड, विशाळगड, गगनगड, शिवगड, भूदरगड, रांगणा आणि सामानगड या किल्ल्यांचा समावेश होतो. स्वराज्य निर्मिती काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी १११ किल्ल्यांची उभारणी केली असे सभासद बखर सांगते. यापैकी चार किल्ले कोल्हापूर जिल्ह्यात महाराजांनी निर्माण केले. हे किल्ले म्हणजे महिपालगड, कलानिधीगड, गंधर्वगड, आणि पारगड. कालांतराने अठराव्या शतकात पेशवे आणि आंग्रे यांच्यात वितुष्ट आल्यानंतर शासकीय सोयीसाठी मुडागड आणि दुशाळगडाची निर्मिती झाली. अशाप्रकारे कोल्हापुर जिल्ह्यामध्ये गिरीदूर्ग आणि वनदूर्ग प्रकारातील एकूण १४ किल्ले अस्तित्वात आहेत.


● पन्हाळा ●

          कोल्हापूर शहरापासून सर्वात जवळ आणि थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असणारा गड म्हणजे पन्हाळा. या गडाच्या नावावरूनच सध्याचा पन्हाळा तालुका ओळखला जातो. हा किल्ला दख्खनच्या पठारावरील सर्वांत मोठा किल्ला आहे. शिलाहार राजवंशाच्या शासन काळात हा किल्ला उभारला गेला आहे. शिलाहार राजा मारसिंह यांच्या ताम्रपटात राजा गोंक यांचा पन्नाले दुर्गाचा स्वामी असा उल्लेख येतो. शिलाहार नृपती गोंक यांनी पन्हाळ्यावर आपले लष्करी ठाणे निर्माण केले होते. कालांतराने शिलाहार राजा महामंडलेश्वर भोज यांनी पन्हाळा गडास संपूर्ण किल्ल्याचे स्वरूप दिले. त्या काळी येथे नागवंशीय लोक राहत असल्याने या गडास पन्नगनालय म्हणजे नाग लोकांचे घर असे नाव मिळाले. याचाच अपभ्रंश होऊन पन्नालय, पन्नाले, प्रणालक, पन्हाळा अशी नाव प्राप्त झाली असावी. कोल्हापूरच्या शिलाहार शाखेचे शेवटचे राजे महाराजाधिराज द्वितीय भोज यांनी आपली राजधानी कोल्हापूरहून पन्हाळा दुर्गावर आणली. यादव राजा सिंघनदेव यांच्या आक्रमणा वेळी पन्हाळा गडावर अखेरची लढाई झाली. यांत शिलाहारांची हार होवून राजा द्वितीय भोज यांना याच गडावर आजन्म कैदेत ठेवण्यात आले.

          शिलाहारांच्या पाडावानंतर हा गड यादवांच्या ताब्यात गेला. नंतर बहामनी आणि आदिलशाही या मुस्लीम सत्ताधिशांकडे याचे अधिकारी राहीले. गडावरील बहुतांश वास्तुंचे बांधकाम हे आदिलशहीच्या काळात झाल्याचे आढळते. बऱ्याच वास्तु या मुस्लिम वास्तुकलेत निर्माण करण्यात आलेल्या आहेत. सन १६५९ मध्ये अफजल वधानंतर अल्पावधीतच शिवछत्रपतींनी हा गड स्वराज्यात आणला. स्वराज्यावर चालून येणारे सिद्धी जौहर नावाचे वादळ थोपवण्यासाठी महाराजांनी याच दुर्गाची निवड केली. त्यानंतर या गडाच्या साक्षीने घडलेल्या घटना इतिहासात कायमच्या अजरामर झाल्या. मुत्सद्देगिरी, गनिमी कावा आणि मावळ्यांच्या बलिदानामुळे महाराज सुखरुप निसटले खरे पण हा गड पुन्हा आदीलशहाच्या ताब्यात गेला. मात्र सन १६७३ मध्ये सरदार कोंडाजी फर्जंद यांनी अवघ्या ६० मावळ्यांनिशी भेदनितीचा वापर करत हा गड पुन्हा स्वराज्यात आणला.

          स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचे दीर्घकाळ वास्तव्य या गडावर राहिले आहे. त्यांच्या काळात या गडास उपराजधानीचे स्वरूप प्राप्त झाले होते. या गडाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे राजधानी व्यतिरिक्त सर्वाधिक काळ वास्तव्य या गडावर राहिले आहे. याशिवाय शिव-शंभूंच्या अखेरच्या भेटीचा पन्हाळा दुर्ग साक्षीदार आहे. तद्नंतर १७१० मध्ये करवीर संस्थानाच्या निर्माणकर्त्या छत्रपती ताराराणी यांनी हा गड आपली राजधानी म्हणून निवडला होता. छत्रपती ताराराणी, छत्रपती शिवाजी महाराज (दुसरे) आणि छत्रपती संभाजी महाराज (तीसरे) यांच्या काळात पन्हाळा किल्ला मराठे शाहिचेे मध्यवर्ती केंद्र बनला होता. आज गडावर राजवाडा, सज्जाकोठी, राजदिंडी मार्ग, अंबरखाना, दारुगोळा कोठाराचे अवशेष, भग्न कचऱ्यांचे अवशेष, तीन दरवाजा, वीर बाजीप्रभू यांचा पुतळा, नरवीर शिवा काशीद यांची समाधी, छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, संभाजी महाराज मंदीर, रामचंद्र पंत अमात्य बावडेकर यांची समाधी, अंधारबाव, चोरखिंड, वाघ दरवाजा, पुसाटी बुरुज इत्यादी पहावयास मिळते. शिवछत्रपतींच्या विशेष किल्ल्यांपैकी एक असणारा हा किल्ला आज देखील निसर्गाचे आणि मानवी विकृतींचे चटके सोसत मानाने उभा आहे. या किल्ल्याच्या जोडीला पावनगड हा किल्ला आहे.










● पावनगड ●

          कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणारी एकमेव जोड किल्ल्यांची जोडी म्हणजे पन्हाळा आणि पावनगड किल्ले. आपल्याला जर पन्हाळगड समजून घ्यायचं असेल तर सर्वात आधी पावनगड समजून घ्यायला हवा. पन्हाळ गडाच्या संरक्षणासाठी पावन गडाचे महत्त्वही तितकेच मोठे आहे. शिलाहार राजा गोंक यांच्या काळापासून या गडाचे अस्तित्व आढळते. गडावर आज देखील शिलाहारकालीन विहीरी आणि वास्तू असल्याचे दिसते. सिद्धी जौहर जेव्हा पन्हाळा किल्ल्यावर चालून आला तेव्हा त्याच्या सोबत असणाऱ्या इंग्रज तोफांनी पावनगडाच्या बाजुने हल्ला केला होता. त्यामुळे सन १६७३ मध्ये पन्हाळा गड ताब्यात आल्या नंतर महाराजांनी पावनगडाचे महत्त्व ओळखून यास बुरुज, दरवाजे उभारून किल्ल्याचा साज चढवला. एक निमुळता मार्ग पावनगडास पन्हाळ्यापासुन अलग करतो. या किल्ल्यावर खोदीव आयताकृती विहीर, तूपाची विहिर, वाड्याचे अवशेष, दर्गा, काही तोफा, तटबंदी, झेंडा बुरुज इत्यादी पहावयास मिळते. सन १७०३ मध्ये पन्हाळा आणि पावनगडावर चालुन आलेल्या दस्तुरखुद्द औरंगजेबाला हा किल्ला जिंकण्यास तब्बल दोन वर्षे लागली. शेवटी १७०५ साली हा गड फितुरीने औरंगजेबाने बळकावला आणि त्याचे नामकरण रसुलगड असे केले. पण काही काळातच हा किल्ला पुन्हा मराठ्यांनी हस्तगत केला.







● विशाळगड ●

          आंबा घाट, अनुस्कुरा घाट, राजापूर घाट, मलकापूर तसेच तळकोकणातील साखरपा, गणपतीपुळे, रत्नागिरी या ठिकाणांवर देखरेख ठेवणारा हा एक खंदा रखवालदार. कोंकणातील बंदरावरून घाटमार्गे व्यापारी माल देशावर येत असे. या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती झाली आहे. शिलाहार नरेश महामंडलेश्वर भोज यांच्या काळातच या गडाची उभारणी झाल्याचे मानले जाते. शिलाहार काळात या गडावर नाग लोकांची वास्तव्य होते. सुरूवातीला यांस खिलगील या नावाने ओळखले जात असे.  कालांतराने त्याचा अपभ्रंश होऊन यास खिलगिला, खिशागिला, भोजगड, खेळणा ही नावे प्राप्त झाली असावी. सन १६५९ ला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून या गडाचे नाव विशाळगड असे ठेवले. विशाळगडाच्या बाबतीत एक उल्लेखनीय बाब म्हणजे मराठा सरदारांनी बहमणी सैन्याचे केलेले पारिपत्य. सन १४५३ मध्ये मलिक उत्तुजार नामक बहमणी सरदाराने शिर्क्यांचा प्रचितगड जिंकून घेतला आणि शिर्क्यांना धर्मांतराची अट घातली. यावर आम्ही धर्मांतर करू पण आमचा शत्रु असणारा शंकरराव मोरे यांस पराभूत करुन त्याचे धर्मांतर करावे आणि खेळणा किल्ला जिंकवा, यासाठी लागेल ती मदत आणि पोहोचण्याचा मार्ग दाखवु असे आमिष शिर्क्यांनी मलिक उत्तुजारला दाखवले. या आमिषाला भुलुन मलिक आपल्या सैन्यासह खेळणा गडास निघाला. दिलेल्या शब्दानुसार शिर्क्यांनी दोन दिवस संपुर्ण सैन्याला सहज सोप्या मार्गावरून नेले. पण नंतर त्यांनी बहमणी सैन्यास अतिशय दाट जंगलात आणले. सपाटीवर लढणाची सवय असणाऱ्या बहमणी सैन्याचे या घनदाट जंगलाने अतोनात हाल केले. अशातच मलिक उत्तुजार हा आजारी पडला आणि त्याला सैन्याला आदेश देणे ही मुश्किल बनले. बहमणी सैन्य प्रवास करत आता अशा ठिकाणी येवून पोहोचले की त्यांना मागे ही जाता येत नव्हते आणि पुढे जायचा त्राण त्यांच्यात उरले नव्हते. अशाच एका रात्री हे सर्व गाफिल सैन्य गाढ झोपेत असताना शिर्क्यांच्या आणि मोरेंच्या संयुक्त सैन्याने या सैन्यावर आकस्मिक हल्ला करून सर्व सैन्य कापुन काढले. या लढाईत मराठ्यांनी युक्तीने आक्रमकांचे पारिपत्य केले.

           सन १४६९ मलिक रेहान या बहमणी सरदाराने ७ वेळा प्रयत्न करून हा किल्ला हस्तगत केला. या मलिक रेहान च्या नावाचा दर्गा आज या गडावर आढळतो. येथे हजारो हिंदू-मुस्लिम भाविक नित्य नियमाने दर्शनासाठी येत असतात. सिद्धी जौहर जेव्हा पन्हाळ्याला वेढा घालून बसला होता तेव्हा विशाळगडास जसवंतराव दळवी आणि सुर्यराव सुर्वे यांनी वेढा घातला होता. पन्हाळ्यावरून निसटल्या नंतर महाराजांनी हा वेढा फोडत विशाळगडाचा आश्रय घेतला होता. या किल्ल्यांच्या डागडुजी आणि बांधकामासाठी महाराजांनी ५००० होन खर्च केल्याची दफ्तरी नोंद आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी देखील गडावर काही बांधकामे करून घेतली आहेत. छत्रपती राजाराम महाराज जिंजीला असता महाराष्ट्राचा कारभार पाहणारे रामचंद्र पंत अमात्य यांनी विशाळगडालाच आपले मुख्य ठिकाण बनवले होते.

          सन १७०१ मध्ये छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यू नंतर त्यांच्या तृतीय पत्नी अंबिका राणीसाहेब या विशाळगडावर सती गेल्या. त्यांची समाधी गडावर आढळते. याशिवाय विशाळगडावर सहा कोरीव टाके आणि काही गुहा आढळतात. या गुहांमध्ये विशाळदेवीचे स्थान आहे. किल्ल्यावर भगवंतेश्वर मंदिर, राजवाड्याचे अवशेष, अमृतेश्वर मंदिर, मुंढा दरवाजा, रणमंडळ टेकडी, काही विहीरी आणि आठ फुटी तोफ आढळते. संकट काळात महाराजांसाठी आणि स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावून लढणारे बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभु यांच्या समाधी या गडावर आहेत. सन १७०१ मध्ये औरंगजेबाने या गडावर आक्रमण केले. तब्बल ६ महिन्यांनी हा किल्ला जिंकून औरंगजेबाने त्यास सरवरलना हे नाव दिले. तद्नंतर १७०७ ला छत्रपती ताराराणी यांनी हा गड जिंकून घेतला जो १८४४ पर्यंत मराठ्यांच्या अखत्यारीत राहीला.






● गगनगड ●

          शिलाहार महाराजाधिराज भोज यांनी या गडाची निर्मिती केली आहे असे मानले जाते. दक्षिण कोंकण बंदरात उतरलेला माल  कोंकणातील कुडाळ, कणकवली, गगनबावडा घाट मार्गे देशात येत असे. या मार्गावर नजर ठेवण्यासाठी या गडाची बांधणी झाली असावी. नागपंथीय गैबीनाथाचे हे मुळ स्थान. गडाच्या बालेकिल्ल्यावर गैबीनाथाची समाधी आढळते. सन १६५८ साली हा किल्ला स्वराज्यात सामील झाला. एकोणिसाव्या शतकात गगनगिरी महाराजांच्या वास्तव्यामुळे हा गड प्रसिद्धीस आला. येथे गगनगिरी महाराजांची समाधी आणि मठ स्थापन करण्यात आला आहे. किल्ल्यावर विठ्ठलाई देवी मंदिर, म्हसोबा मंदिर, प्राचीन विहीर, तटबंदीचे अवशेष, जुन्या घरांचे अवशेष आणि तोफा आढळतात.




● शिवगड ●

           कोल्हापूर शहरापासून सुमारे नव्वद किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला दाजीपूर अभयारण्यात आहे. या गडाच्या बांधणी संबंधीचा इतिहास फारसा माहीत नसला तरी हा किल्ला शिलाहार नृपती द्वितीय भोज यांच्या काळात बांधल्याचा अंदाज आहे. दाजीपूर अभयारण्याच्या घनदाट जंगलात मधोमध एका लहानशा टेकडीवर हा किल्ला स्थित आहे. थोडाफार चढ आणि पठार वडा बालेकिल्ला असणारा हा गड आहे. शिलाहार काळात फोंडा घाटावर नजर ठेवण्यासाठी चौकीच्या स्वरूपात या गडाचा वापर होत असे. सध्या गडावर तटबंदीचे आणि पडक्या वाड्यांचे काही अवशेष आढळतात. गडावर एक सतीशिळा आहे. या सतीशिळेला स्थानिक लोक उगवाई देवी म्हणून पुजतात. गडावरून कुरली धरण आणि दाजीपूर अभयारण्य यांचे नेत्रदीपक दृश्य दिसते. तसेच दाजीपूर अभयारण्यातील पायी सफर मन सुखावणारा आहे.




● रांगणा ●

           कोल्हापूर जिल्ह्यातील अतिशय रांगडा किल्ला म्हणजे किल्ले रांगणा. घनदाट जंगल, ओढे पार करत या किल्ल्यावर जावे लागते. कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या सीमेवर रांगणा किल्ला स्थित आहे. शिलाहार राजवंशाच्या शासन काळातच या गडाची निर्मिती झाली आहे. देश, कोंकण आणि गोवा या प्रदेशांवर लक्ष ठेवण्यासाठी हा अतिशय महत्वाचा किल्ला मानला जातो. या गडाची विशेष बाब म्हणजे सह्याद्रीतील  प्रत्येक किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला  चढाई करावी लागते. मात्र रांगणा गडावर जाण्यासाठी डोंगर उतरून जावे लागते. बाराव्या शतकात भोजनानंतर हा गड यादवांकडे आणि नंतर संगमेश्वरच्या जखुरायाकडे गेला. १४७० मध्ये बहमणी सरदारा महम्मद गावान याने हा किल्ला जिंकून घेतला. तद्नंतर या किल्ल्यांचे अधिकार आदीशहाकडे आले.  सन १६६६ ला महाराज आग्रा येथे कैदेत असताना जिजाऊंनी विशेष मोहीम काढुन किल्ले रांगणा घेण्याची जबाबदारी राहुजी सोमनाथ यांच्यावर सोपवली. १६६६ साली  हा गड स्वराज्यात सामील झाला पण लगेचच १४ एप्रिल १६६७ ला आदीलशाही सरदार बहलोलखान आणि व्यंकोजीराजे यांनी या गडाला वेढा दिला. १२ मे १६६७ रोजी शिवछत्रपतींनी जातीने येवून हा वेडा फोडला आणि यानंतर काही काळ गेल्यावर वास्तव्य केले. या गडासाठी महाराजांनी ६००० होन खर्च केल्याची दफ्तरी नोंद आहे. महाराजांनी या गडास प्रसिद्धगड असे नाव दिले.

          औरंगजेबाने हा किल्ला जिंकण्यासाठी प्रयत्न केले पण हा गड त्याच्या हाती लागला नाही. धामधुमीच्या काळात छत्रपती ताराराणी यांनी काही काळ गडाचा आश्रय घेतला होता. 'करवीरकरांचे महास्थल' अशा प्रकारे या किल्ल्यांची नोंद करवीर दफ्तरी आढळते. याशिवाय १७८१ च्या कागदपत्रात 'एक रांगणा खबरदार तर सर्व सुरक्षित, नाहीतर सकल सावंत बारदेशावर उतरेल' असा उल्लेख आढळतो. सध्या गडावर गणेश मंदिर, रांगणाई देवी मंदिर, महादेव मंदिर, मारुती मंदिर, तलाव, खोदीव विहीर, निंबाळकर वाडा तसेच राजसदर यांचे अवशेष आढळतात. गडाच्या पश्चिम बाजूला कोकण दरवाजा दरवाजा, पुर्वेस नारूर दरवाजा याच्यापुढे हत्तीसोंड माची आणि केरवडे दरवाजा आढळतो. गडाजवळील पाटगाव या गावी मौनी महाराजांचा मठ आहे. या मठास छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती ताराराणी आणि छत्रपती शाहू महाराज यांनी सनदा दिलेल्या आहेत.





● भुदरगड ●

           पन्हाळ्या प्रमाणे हा तालुका ही येथील भूदरगड या किल्ल्यांच्या नावाने ओळखला जातो. सदर किल्ला शिलाहार राजा भोज यांनीच उभारला आहे असे मानले जाते. सन १६६७ मध्ये हा गड स्वराज्यात सामील झाला पण आदिलशहाने तो परत जिंकून घेतला. नंतर सण १६७२ हा गड पुन्हा स्वराज्यात सामील केला गेला. यानंतर मुघलांनी किल्ल्यावर ताबा मिळवला पण छत्रपती ताराराणी यांनी सन १७२१ गड जिंकून तो पुन्हा स्वराज्यात सामील करून घेतला. हा गड मुख्यतः ओळखला जातो ते १८४४ च्या गडकऱ्यांच्या बंडामुळे. सन १८५७ च्या देशव्यापी उठावा पूर्वी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गडकर्‍यांनी इंग्रजी सत्ते विरुद्ध बंड केले. बाबाजी अहिरेकर यांच्या नेतृत्वाखाली भूदरगड इंग्रजांविरुद्ध लढला पण यात पराभुत झाला. इंग्रजांच्या ताब्यात हा गड आल्यानंतर असे बंड पुन्हा होवू नये यासाठी त्यांनी गडावरील सर्व वास्तु नेस्तनाबूत केल्या. आज गडावर भैरवनाथाचे प्राचीन मंदिर, काही वीरगळ, समाधी, दूध सागर तलाव, भवानी मंदिर, महादेव मंदिर, सैनिकांना बसण्यासाठी कातळात खोदलेली १०×१० ची खोली, गुहेत खोदलेले जाखुबाई मंदिर आढळते.




● सामानगड ●

           रांगणा, भुदरगड, गंधर्वगड, पारगड, कलानिधीगड आणि महिपालगड यांच्या मधोमध असल्यामुळे येथून सर्व गडांना रसद आणि दारूगोळा पुरवणे सोयीस्कर असल्याने या गडास सामानगड नाव पडले असावे असे मानले जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील इतर गडांप्रमाणे हा गड देखील शिलाहार काळातच बांधला गेला आहे असे मानले जाते. या गडावरील कोरीव काम अप्रतिम आहे. संबंध कातळात कोरलेल्या विहीरी, मंदिरे, अंधार कोठडी,  कमानी हे आवर्जून पाहण्यासारखे आहे. टेहळणी करीता गडावर १० बुरुजांची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय गडावर शिलाहार कालीन अनेक शिल्प, वीरगळ देखील पहायला मिळतात. सन १६६७ मध्ये हा गड स्वराज्यात आल्यानंतर याची किल्लेदारी आणि सबनीशी अण्णाजी दत्तो यांना मिळाली. त्यांनी गडावर अनेक वास्तूंची निर्मिती केली.

          मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत धाडसी घटना म्हणजे सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांचे सहा सवंगडी बहलोल खानावर चालून गेल्याची. बहलोलखानावर चालून जाण्या आधी प्रतापराव गुजरांची छावणी ही याच गडावर होती. या गडाजवळील नेसरी गावत या विरां प्रित्यर्थ स्मृतिस्थळ उभारण्यात आले आहे. सन १८४४ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या इंग्रजां विरुद्धच्या बंडामध्ये सामानगड अग्रणी होता. भूदरगड पडल्यानंतरही मुंजाप्पा कदम यांच्या नेतृत्वात सामानगडाने इंग्रजांविरुद्ध कडवा प्रतिकार करत दोन वेळा इंग्रजांचा हल्ला परतवून लावला. सध्या गडावर सात कमान बाव, साखर विहीर, अंधार कोठडी, भवानी मंदिर, महादेव मंदिर, मारुती मंदिर, झेंडा बुरुज, प्रवेश बुरुज, वेताळ बुरुज, सोंड्या चिलखती बुरुज आणि याच बुरुजा समोर मुगल टेकडी आहे. ही टेकडी मुगल सैन्याने कृत्रिम रित्या स्वयं परिश्रमाने उभारली असल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे. सामानगड संवर्धन आणि संरक्षणासाठी कार्यरत दुर्गवीर प्रतिष्ठानचे कार्य वाखाणण्याजोगे आहे.









● गंधर्वगड ●

          सभासद बखरीतील संदर्भानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी वसवलेल्या 111 किल्यांचे यादीत या किल्ल्याचे नाव आहे. या गडाजवळ विशेष असे ऐतिहासिक घटना घडलेली नाही. सदर गड हा वेंगुर्ले, आंबोली घाटावर नजर ठेवण्यासाठी चौकीच्या स्वरूपात उभारला असावा. चंदगड तालुक्यातील गंधर्वगड हे गाव सध्या गडावर नांदते आहे. सध्या गडावर महादरवाज्याचे भग्नावशेष, काही वाड्यांचे अवशेष, प्राचीन विहीर, वीरगळ तसेच चाळकोबा मंदिर आढळते. उत्तर बाजूच्या संरक्षक तटबंदी अजून शाबूत असून यामध्ये चोर दरवाजा आणि शौचकुपाची व्यवस्था आढळते.





● पारगड ●

          गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांच्या सीमेवर असणारा हा किल्ला मूळ स्वराज्याच्या पार टोकास असल्याने यास पारगड नाव प्राप्त झाले असावे. गोव्याच्या पोर्तुगीजांवर आणि सावंतवाडीचे खेमसावंत यांवर वचक ठेवण्यासाठी महाराजांनी १६७६ साली या किल्ल्याची उभारणी केली. गडाच्या वास्तुशांतीसाठी खुद्द छत्रपती शिवाजी महाराज येथे उपस्थित होते. यानंतर गडाची किल्लेदारी नरवीर तानाजी मालुसरे यांचे पुत्र रायबा मालुसरे यांना देण्यात आली. या गडावर महाराजांचे काही काळ वास्तव्य राहिले होते. यावेळी गड रक्षणाचे महत्त्व सांगताना महाराजांनी 'जो पर्यंत आकाशात चंद्र सूर्य तळपत आहेत तो पर्यंत हा गड जागता ठेवा' असे उद्गार काढल्याचे सभासद बखर सांगते. रायबा मालुसरे आणि त्यांच्या वंशाजानी हे व्रत प्राणपणाने जपले आहे. मोगलांच्या दोन स्वाऱ्या या गडकर्‍यांनी परतवून लावल्या आहेत. तसेच हा गड नेहमी अजिंक्य राहीला आहे. आज गडावर हनुमान मंदिर, भवानी माता मंदिर, राजसदरेचे अवशेष, काही वीरगळ आढळतात. गडावरून कलानिधीगड, तिल्लारी जलाशयाचे आणि सांजावणाऱ्या सुर्य किरणांचे दृश्य विलोभनीय दिसते.





● कलानिधीगड ●

          छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या या किल्ल्यावरील बुरुजांची कलात्मक रचना पाहिली तर आपल्याला ह्या गडाच्या नावाचा उलगडा होतो. तसेच लांबून पाहिल्यास ह्या गडाचा आकार एखाद्या बसलेल्या नंदी प्रमाणे दिसतो म्हणून याला कलानंदीगड असे देखील नाव मिळाले आहे. पु ल देशपांडे यांचे मूळ आडनाव कलानिधीगडकर. त्यांचे पूर्वज या गडावर वास्तव्यास होते. गडावर भवानी मंदिर, महादेव मंदिर, भैरव मंदिर, प्रवेशद्वार, खोदीव विहीरी तसेच तटबंदी, वास्तुंचे अवशेष सापडतात. गडावरुन पारगड, तिल्लारी परिसरावर नजर ठेवता येते.




● महिपालगड ●

          शिवरायांनी वसलेला आणखी एक किल्ला म्हणजे महिपालगड. श्री गुरुचरित्रामध्ये चौदाव्या अध्यायात या स्थानाचा उल्लेख येतो. नरसिंह सरस्वती यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या परिसरात दुर्मिळ वनौषधी आढळतात. या गडाच्या पायथ्याशी आरोग्य भवानी मंदिर आणि  वैजनाथ मंदिर आहे. ही मंदिरे हेमाडपंती बांधनीची असुन ती प्राचीन आहेत. या गडावर कार्तिक स्वामी गुहा आढळतात. गडाच्या दक्षिणेला पायरी बुरुज व महादेव बुरुज आहेत. तर ईशान्येस जळका बुरुज आहे. याशिवाय गडावर कातळात खोदलेली बारव-बाव आढळते.




● मुडागड ●

           नानासाहेब पेशवे आणि तुळाजी आंग्रे यांच्यात वितुष्ट आल्यानंतर तुळाजी आंग्रे यांनी या किल्ल्याची उभारणी केली अशी दफ्तरी नोंद आढळते. या गडा मुळे तुळाजी आंग्रे यांना कोकण पट्टीवरील वसूल गोळा करणे आणि पन्हाळा प्रांतावर हल्ले करणे सोयीस्कर झाले होते. तसेच यामुळे घाटावर तसेच सध्या असणाऱ्या पडसाळी धरणाच्या परिसरावर नजर ठेवता येत होते. नाना पेशव्यांचे सहकारी येसाजी आंग्रे आणि सावंतवाडीकर यांनी हा किल्ला जिंकून घेतला. आज गडाचा ताबा अस्ताव्यस्त वाढलेल्या वेली आणि गगनचुंबी झाडांनी घेतल्यामुळे गडाचे अस्तित्व नाहीसे झाले आहे. सध्या गडावर बुरुजाचे अवशेष, वाड्याचे जोते, पाण्याचे टाके दिसून येते.

          शिवारण्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मुडागडच्या परिसरामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी तटबंदी करुन खास विदेशातुन आणलेले काही हत्ती येथे ठेवले होते. या हत्तींसाठी उभारण्यात आलेले तलाव, टाके आज देखील येथे आढळतात.




● दुशाळगड ●

         मुडागड पडल्यानंतर तुळाजी आंग्रे यांनी साखरपा तर्फे देवळे येथे १७५२-५३ दरम्यान दुशाळगड बांधला असे दस्तऐवज प्राप्त झाले आहेत. या गडावर जमाव करून कोंकणपट्टी वरील महसूल गोळा करण्यासाठी या किल्ल्याचा वापर होत असे. इतक्या वर्षांच्या दुर्लक्षामुळे साखरपा तर्फे देवळे येथील एका छोट्या टेकडीवर असणारा हा किल्ला गर्द झाडींनी पूर्ण झाकोळला गेला आहे. सध्या इथे तटबंदी आणि बुरुज यांचे काही अवशेष आढळतात. सदर किल्ला शिवप्रसाद पाटील आणि प्रणालक इतिहास संशोधन मंडळाने शोधला आहे.




संदर्भ -

1) दुर्गवैभव कोल्हापूर जिल्ह्याचे

                - भगवान चिले

2) कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले

               - प्रवास : Prathmesh Harale YouTube Channel

3) दुर्गवारी

               - D Subhash Production YouTube Channel


               🙏 धन्यवाद 🙏



सुरज संजय तिबीले

यंग ब्रिगेड, सुवर्णराजधानी कसबा बीड

मो. नं. 9503973234

ई मेल : tibilesuraj7@gmail.com

16 comments:

  1. great work suraj & young brigade

    ReplyDelete
  2. छ. शिवराय, छ. शंभूराजे आणि असंख्य मावळ्यांच्या पदस्पर्श्याने पावन झालेल्या आपल्या जिल्ह्यातील गड किल्ल्यांची उत्कृष्ट माहिती आपण दिली आहे. गडाचा ईतिहास आणि वास्तूंचे फोटो यामुळे माहीती परिपूर्ण वाटते.

    ReplyDelete
  3. Ashutosh Suryavanshi27 September 2020 at 03:22

    Great Work Suraj and team.... keep growing ����

    ReplyDelete
  4. Well done great work brother

    ReplyDelete