कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी आणि करवीर तालुक्यांच्या सीमेवर सातेरी महादेव ही टेकड्यांची रांग स्थित आहे. पुर्व - पश्चिम पसरलेल्या ह्या या रांगेमध्ये साधारणतः वीस ते बावीस लहान मोठ्या टेकड्या आहेत. पूर्वेकडील सर्वांत शेवटची टेकडी म्हणजेच महादेव टेकडी. याच महादेव डोंगरावर श्री महादेवाचे पवित्र स्थान आहे. संपूर्ण कातळात कोरलेले मंदीर, नंदी, खोल्या, पायऱ्या, गुहा आणि विहीर हे या स्थानाचे खास वैशिष्ट्य.
या डोंगरावर आल्या नंतर प्रथम आपल्याला दिसतो तो साधारण पाच फुट उंचीचा संपूर्ण कातळात कोरलेला नंदी. हा नंदी बसलेल्या स्थितीत असुन त्याचा रोख आग्नेय दिशेस आहे. या नंदीची आभुषणे ही कातळात अगदी उत्तमरितीने कोरण्यात आली आहेत. यानंतर पुढे आपल्याला कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसुन येतात. पुर्वी या पायऱ्या गुडघ्याएवढ्या उंच एखाद्या गडाला साजेशा होत्या. सध्या या पायर्या लहान आणि चढण्यास सोयीस्कर बनवण्यात आल्या आहेत.
पायर्यांवरून वर जाता जाता डाव्या बाजूला आपणांस एक विहीर दिसते. अंदाजे 30 ते 40 फुट खोल ही विहीर सध्या रिकामीच आहे. पुर्वी वर डोंगरावर पडणारे पावसाचे पाणी कातळातील भेगांमुळे या विहीरीत साठवले जात होते. काही वर्षांपूर्वी या डोंगरावर ही विहीर एकमात्र पाण्याचा स्त्रोत होती. पण वर ब्लाॅक बसवल्यानंतर ही विहीर कोरडीच राहिली आहे. या विहीरीत उतरण्यासाठी पायऱ्यांची रचना केलेली दिसते. तर त्याच्या आत ठिकठिकाणी खोबण्या करण्यात आल्या आहेत.
इथुन पुन्हा आपण वर आलो की आपणांस दिसते ते श्री. महादेव मंदिर. पुर्वाभिमुख असणारे हे मंदीर कातळात कोरलेल्या गुहेमध्ये वसले आहे. आतमध्ये एक शिवलिंग स्थापित करण्यात आले आहे. या शिवलिंगावर वेटोळे घातलेल्या नागाची पितळेची मुर्ती नंतर बसवण्यात आली आहे. तर याच्या मागे श्री. शंकराचे आयुध त्रिशुळ ठेवण्यात आले आहे. या गुहेच्या छतावर अगदी मध्यभागी एक गोलाकार रचना दिसते. तीन स्तरांची ही रचना एखाद्या फुलाप्रमाणे दिसते. कालौघात त्याची बरीच झिज झालेली आहे.
दर्शन घेवून आपण बाहेर आल्यानंतर या गुहेच्या मागे अजुन दोन प्रवेशद्वार आपणांस दिसतात. उजव्या बाजुने आत प्रवेश केल्यानंतर समोरच एका दिवळीवजा जागेत आपल्याला श्री. गणेशाची मुर्ती दिसते. ही संगमरवरी मुर्ती अलिकडच्या काळातच स्थापण करण्यात आली आहे. इथुन उजव्या बाजुने आत जाताच समोर आपणांस दर्शन होते ते आदिशक्ती पार्वती मातेचे. ही सर्वांत आतील गुहा. या गुहेच्या भिंतीवरच पार्वती मातेची सुरेख छाया कोरण्यात आली आहे. याच्या उजव्या बाजूला बसण्यासाठी ओट्याप्रमाणे रचना आहे. तर डाव्या बाजुस एका दिवळीची रचना आहे. गुहेच्या या भागाचे वातावरण सर्वांत शीत आढळते. बाहेर कितीही कडक उन जरी असले तरी आतील गारवा कमी होतं नाही ही याची खासियत आहे.
बाहेर आल्यानंतर ठिक महादेव मंदीराच्या समोर उभे राहिल्यास तेथुन कोल्हापूर शहरासह आसपासची सर्व गावे दृष्टीस पडतात. याशिवाय इथुन जोतिबा डोंगर, पन्हाळा, पावनगड, मसाई पठार, तुमजाई पठार इ. अनेक ठिकाणे दृष्टीस पडतात. तर या मंदिराच्या मागे आल्यास इथुन राधानगरी तालुक्याचा पुर्व भाग दृष्टीस पडतो. यांत राधानगरीचा जंगल परिसर, डोंगर रांग, धामोडचा तुळशी जलाशय, केळोशी जलाशय इत्यादीचा समावेश होतो.
या सातेरी महादेव टेकडीवरून तुळशी नदी, भोगावती नदी, कुंभी नदी यांचे प्रवाह तसेच त्यांचे संगम देखील पहायला मिळतात. पावसाळ्यात या नद्यांचे पाणी वाढल्या नंतर त्यांचे प्रवाह हे स्पष्ट दिसतात. शिवाय संपूर्ण परिसराच्या पुर परिस्थितीवर लक्ष ठेवणे सोयीस्कर होते. नद्यांना आलेल्या ह्या पुरांचे दृष्य येथुन विलोभनीय दिसते. तसेच रात्रीच्या अंधारात कोल्हापूर शहरासह, आसपासच्या गावात लागणाऱ्या विजेच्या दिव्यांचे दृष्यही सुंदर दिसते.
महादेव डोंगराच्या पश्चिम बाजुने खाली जाताना अनेक गुहा दृष्टीस पडतात. या गुहा नैसर्गिक असुन अनेक वर्षांच्या नैसर्गिक क्रियेने त्या तयार झाल्या आहेत. एकाच वेळी अनेक लोक निवांत बसु शकतील अशा गुहा महादेव डोंगरच्या दक्षिण दिशेस आहेत. तेथे वाढलेल्या झाडीमुळे त्या झाकोळल्या गेल्या आहेत. अशा प्रकारच्या अनेक नैसर्गिक गुहा या सातेरी-महादेव डोंगर रांगेतील टेकड्यावर दिसुन येतात.
या सातेरी-महादेव डोंगराची बाबत आणखी एक गोष्ट प्रचलित आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात हा भाग काटेरी झुडपे आणि वनराईने भरलेला होता. या भौगोलिक स्थितीचा फायदा घेऊन या परिसरामध्ये सक्रिय असणारी त्याकाळची कुविख्यात दरोडेखोरांची एक टोळी या महादेव डोंगराच्या आश्रयाला राहत होती. महादेव डोंगर हा त्यांचा मुख्य तळ मानला जात असे. येथील गुहा आणि पावसाळ्यात विहिरीमध्ये साचलेल्या पाण्याच्या बळावर काही काळ हे दरोडेखोर येथे वास्तव्य करत होते. एवढ्या उंचावरुन खालच्या भागावर त्यांना लक्ष ठेवणे चांगलेच सोईस्कर होते. कालांतराने ही टोळी निष्क्रिय झाली आणि त्यांनी आपली हे स्थान सोडून दिले.
या महादेव डोंगरापासुन सुरू होणारी ही सातेरी-महादेव डोंगर रांग पुर्व-पश्चिम दिशेस पसरलेली दिसते. या रांगेमध्ये वीस ते बावीस लहानमोठ्या टेकड्या असलेल्या आढळतात. यातील काही टेकड्यांपर्यंत गाडीवाट गेलेली आहे. या टेकड्यांवर आपल्याला अनेक भौगोलिक रचना आढळतात. याशिवाय येथे काजु, आंबा, करवंद, जांभुळ असा विविध प्रकारचा रानमेवा या टेकड्यांवर आपणांस चाखण्यास मिळतो. येथील दुर्मीळ वनराई पर्यटकाचे लक्ष लगेच वेधुन घेते. विविध प्रकारची डोंगरी फुले याठिकाणी पाहण्यास मिळतात. शिवाय येथे ससा, रानमांजर, मुंगुस, अनेक जातीचे साप, विविध फुलपाखरे अशा प्रकारची जीवसंस्था आढळते. पावसाळी भ्रमंतीसाठी या टेकड्या एक उत्तम पर्याय आहे. गेली दोन वर्षे यंग ब्रिगेड सुवर्णराजधानी कसबा बीड ही संघटना येथे ट्रेकिंगचे आयोजन करते आहे.
महादेव डोंगराच्या पायथ्याशी श्री सातेरी देवीचे वास्तव्य आहे. या ठिकाणी आपल्याला एक छोटेखानी मंदीर आढळते. मुळ मंदीराच्या समोर आता एक सभामंडप बांधण्यात आला आहे. या सभामंडपात मध्यभागी काही लहान पादुकांच्या जोड्या ठेवलेल्या आपणांस दिसतात. या पादुका सातेरी देवीसाठी अतिशय पवित्र मानल्या जातात. यांतील मुळ सात जोड्यांची नित्यनियमाने पुजा केली जाते. सभामंडपातुन आत गेल्यास मुळ मंदीर लागते. आकाराने छोटा असणारा हा गाभारा हेमाडपंती बांधकामाचा आहे. कालांतराने त्याला बाहेरून गिलावा करण्यात आला आहे. या गाभार्यात एकुण सात देवींची पुजा केलेली दिसते. सात असमान दगडांना देवीच्या रूपात येथे पुजले जाते. या मुर्तींची रचना ही विशिष्ट आहे. मोठ्या पासुन लहानापर्यंत लावण्यात आलेले हे दगड सात बहिणींच्या वयातील अंतर दर्शवतात. साधारणपणे देवी पार्वतीच्या सात रूपांना सातेरी देवींच्या रूपात पुजले जाते. अशी सातेरी देवीची मंदिरे मुख्यतः पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोंकण आणि उत्तर कर्नाटक ह्या भागात अधिक आढळुन येतात. पण या मंदिराविषयी एक खास अख्यायिका आपणांस स्थानिकाकडुन ऐकण्यास मिळते.
अज्ञात काळी सध्याच्या कसबा बीड परिसरामध्ये एक अनामिक दांपत्य राहत होते. या दांपत्यास एकुण सात मुली होत्या. काही कारणवश या मुलींच्या आईचे निधन झाले. त्यामुळे साऱ्या मुलींचा भार एकट्या बापावर येऊन पडला. काही काळानंतर त्याला त्या मुलींचा सांभाळ करणे असह्य झाले. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी त्याने मुलींना फिरवण्याच्या बहाण्याने सातेरी येथील घनदाट जंगलात आणले. त्या काळी सातेरीवर निबिड अरण्य होते असे म्हणले जाते. या जंगलात व्याघ्रादी श्वापद वास करत होती. सध्याच्या सातेरी मंदिराच्या ठिकाणी येताच या सात मुलींना तेथे बसवून भरल्या मनाने बाप माघारी परतला. रात्रीच्या किरर अंधारात त्या मुली घाबरून गेल्या होत्या. जंगलात हिंस्त्र प्राण्यांचा आवाजाने त्या अधिकच भेदरल्या. आपल्या बापाची वाट पाहता पाहता त्या या रात्रीच निसर्गात विलीन झाल्या. याच ठिकाणी या निसर्गाने या सात मुलींना आपल्यात सामावून घेतले. याच सात मुली पुढे सातेरी देवी म्हणजेच सात देवीच्या रूपात येथे पुजल्या जाऊ लागल्या.
सातेरी देवीचे मूळ मंदिर हे फार जुने असून येथे अनेक प्राचीन अवशेष आजही आढळतात. मंदिराच्या बाहेरच काही कोरीव अवशेष ठेवलेले दिसतात. तर या मंदिराच्या मागे दोन विरगळ असून ते खंडित आहेत. एका वीरगळीचा फक्त युद्ध प्रसंगाचा भाग उपलब्ध आहे. तर दुसरी वीरगळ खंडित असली तरी त्याचे सर्व भाग उपलब्ध आहेत. ही वीरगळ चार स्तरीय असून यावर गाई-गुरांचे रक्षण करणाऱ्या वीराचे अंकण पहायला मिळते. या वीरगळचा सर्वात खालचा टप्पा हा गुरांचे रक्षण करणाऱ्या वीराला दर्शवतो. दुसऱ्या टप्प्यावर युद्धप्रसंग कोरण्यात आला आहे. तिसरा टप्पा वीराला स्वर्गी नेणाऱ्या अप्सरांचा आहे. तर शेवटचा चौथा टप्पा हा कैलासातील श्री शंकराच्या पूजेचा आहे. या प्रत्येक टप्प्याच्या दरम्यान आपल्याला सुरेख नक्षीकाम दिसते. प्रथमदर्शनी ही वीरगळ शिलाहार पूर्वकालीन असावी असे वाटते.
या मंदिराच्या दोन्ही बाजूला दोन खोल्या बांधण्यात आल्या आहेत. या खोल्या सातेरी देवीच्या भक्तांना सातेरीची जत्रा करणे सोयीस्कर जावे यासाठी बांधण्यात आल्या आहेत. शेजारची धोंडेवाडी, केकतवाडी, आमशी, नरगेवाडी, वाघोबावाडी या गावचे भाविक प्रत्येक वर्षी सातेरी देवी ची जत्रा साजरी करतात. येथे अनेक बकरी, कोंबडे देवीस अर्पण केले जातात. याशिवाय या मंदिराच्या आसपास अनेक मोठे डेरेदार वृक्ष आणि प्रशस्त जागा असून या ठिकाणी आपणास वनभोजन किंवा अल्पोपहारचा आनंद घेता येतो.
या मंदिरापासून खाली जाताना धोंडेवाडीला जाणाऱ्या मार्गावर डाव्या बाजूस आत शेतात एक घरवजा मंदिर दिसते. या मंदिरामध्ये नागदेवाची पूजा केली जाते. एका मोठ्या दगडावर एकवीस फण्यांचा नागाचे चित्रांकन असून आमशीतील एक गृहस्थ नित्यनेमाने याची पूजा करतात. या घराच्या मागूनच सातेरी-महादेव डोंगरावर जाणारी पायवाट आहे.
या मंदिराच्या उजव्या बाजूने जाणारी वाट वाघोबावाडी मार्गे आमशीमध्ये जाते. वाघोबावाडी हे एक लहानसे कमी लोकवस्तीचे गाव आहे. या गावाच्या वाटेवरच एक दरी वजा छोटीशी भौगोलिक रचना दिसते. पावसाळ्यात इथून वाहणारे ओढे, उंचावरून पडणारे पाणी आणि खाली उतरलेले ढग यांचे दृश्य विहंगम दिसते. या मार्गावर बरीच झाडी आढळते. वाघोबावाडी हे गाव तसे या वनराईतच दडले आहे. येथून दिसणारा नजारा तसा सुखावणारा आहे.
येथुन खाली गेल्यास आपणास आमशी हे गाव लागते. सातेरी-महादेव डोंगरावरील श्री महादेवलाच आमशीचे ग्रामदैवत मानले जाते. डोंगरावरील सर्व व्यवस्था मुख्यता आमचीचे ग्रामस्थच पाहतात. प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीला आमची गाव तसेच महादेव डोंगरावर मोठी यात्रा भरवली जाते. महाशिवरात्री निमित्त आमशी गावातुन पालखी सोहळा तसेच अश्व रिंगण सोहळा योजिला जातो. याशिवाय नवरात्रीच्या काळात श्री. महादेवाचे नऊ दिवस उपवास केले जातात. या काळात आमशी वासीय येथे महादेव डोंगरावर वास्तव्यास असतात. आमशी गावचे नागरिक तसेच पंचक्रोशीतील दानशूर व्यक्तींच्या सहाय्याने श्री शंभू-महादेव देवस्थान ट्रस्ट प्रत्येक सोमवारी येथे येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करते. महसुली दृष्ट्या सातेरी-महादेव डोंगर धोंडेवाडी विभागात येत असला तरी हा मुख्यता आमशीचाच भाग मानला जातो. आमशी गावात एक गजलक्ष्मीचे शिलाहार कालीन मूर्ती आढळते. शिलाहार काळात आमशी हे गाव लहान वसाहतीच्या स्वरूपात अस्तित्वात असावे असा कयास वर्तवला जातो.
या सातेरी-महादेव डोंगराच्या भोवती नरगेवाडी, केकतवाडी, धोंडेवाडी, गणेशवाडी, अशी गावे स्थित आहेत. धोंडेवाडी ते गणेश वाडी यादरम्यान आपल्याला नागमोडी वळणांचा रस्ता लागतो. या रस्त्यावरच दोन ठिकाणी पावसाळी धबधबे आपल्याला पाहण्यास मिळतात. मुसळधार पाऊस सुरु झाल्यानंतर हे धबधबे प्रवाहित होतात. या धबधब्याचे कोसळणारे पाणी, वाहणारे ओढे यांचे दृष्य ही सुंदर दिसते. वरून येणारे हे पाणी खाली बांधण्यात आलेल्या पाझर तलावात साठवले जाते. खालच्या सखल भागात अलीकडच्या काळात पाझर तलाव तयार करण्यात आला आहे. यामुळे गणेशवाडी गावची काही जमीन ओलिताखाली आली आहे.
या पाझर तलावाच्या डाव्या बाजूस आपल्याला एक अलग झालेली छोटी टेकडी दिसते. या टेकडीला स्थानिक भाषेत राळ्याची रास असे म्हटले जाते. या टेकडी विषयी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. काही वर्षांपूर्वी राळे नामक धान्याचे या भागात मोठ्या प्रमाणावर पिक घेतले जात होते. या राळ्याची मळणी या टेकडी शेजारी होत असे. या पिकाचे उत्पादन इतक्या मोठ्या प्रमाणावर होत असे की त्याच्या राशीच्या राशी येथे लागत असत. या पिकाचे मोठ्या प्रमाणावर होणारे उत्पादन आणि त्याचे लागणारे मोठे ढिग याची तुलना या टेकडी सोबत केली जात असे. यावरूनच या टेकडीला राळ्याची रास हे प्रतीकात्मक नाव मिळाले आहे. आजच्या घडीला या भागात राळे हे पीक घेतले जात नसले तरी येथे भुईमूग, बाजरी, सोयाबीन, भात अशी पिके घेतली जातात.
गणेशवाडी गाव ओलांडल्यानंतर आपणास बीडशेड ही बाजारपेठ लागते. आज येथे कापड उद्योग, हॉटेल, दवाखाने, ऑटोमोबाईल, मेडिकल, किराणामाल दुकाने अशा हरएक प्रकारची दुकाने स्थापन झाली आहेत. एक मोठी बाजारपेठ म्हणून बीडशेड उदयास येत आहे. याच्या पुढे आपणांस कसबा बीड, सावरवाडी, बहिरेश्वर अशी गावे लागतात. शिलाहार काळात अत्यंत महत्वाची असणारी ही गावे आजतागायत आपले प्राचीनत्व टिकवून आहेत.
कोल्हापूर प्रदेशावर राज्य करणाऱ्या शिलाहारांनी आपली उपराजधानी आणि सैन्य तळ कसबा बीड (त्याकाळचे तीरवाड बीड) या ठिकाणी वसवला होता. सध्याच्या आरे, महे, कोगे, बहिरेश्वर, गणेशवाडी, सावरवाडी आणि कसबा बीड या गावांच्या इतकी मोठी असणारी ही राजधानी सातेरी-महादेव टेकडीवरून सहज नजरेच्या टप्प्यात येत होती. प्रथम शिलाहारांनी कराड येथुन कोल्हापूर येथे आपली राजधानी वसवली होती. कोल्हापूर ही मुख्य राजधानी असताना राजाच्या विश्रांतीचे तसेच राजधानी पासुन सुरक्षित अंतरावर सैन्य गतीविधीचे ठिकाण म्हणून कसबा बीड या गावची निवड केली होती. कसबा बीड ते कोल्हापूर यांना जोडणारा मार्ग हा आरे मार्गे जात असे. राजधानी कोल्हापूर आणि सैन्य शिबिर असणाऱ्या कसबा बीड मध्ये सतत संपर्क होत असे. या संपूर्ण मार्गावर सातेरी-महादेव डोंगरावरून लक्ष ठेवणे सोयीस्कर होते. या टेकडीवरून कोल्हापूर आणि त्याच्या पश्चिमेचा बराच परिसर नजरेस पडतो. त्यामुळे येथे राहुन राजधानीच्या जवळपासच्या सर्व हालचाली टिपणे सहज सोपे होते.
याशिवाय कोंकणातुन येणारा व्यापारी मार्ग हा सध्याच्या घानवडे, आरळे, शिरोली, कसबा बीड, बहिरेश्वर, म्हारूळ, सांगरूळ, कोपार्डे, कळे अशा मार्गाने शिलाहारांचे मुख्य लष्करी ठाणे आणि नंतर झालेले राजधानीचे ठिकाण पन्हाळा गडाकडे जात असे. शिलाहार राजा भोज यांच्या एका ताम्रपटातही तीरवाड बीड ते पन्हाळा मार्गाचा उल्लेख आला आहे. या संपूर्ण मार्गावर सातेरी-महादेव टेकडीवरून नजर ठेवण्यास मदत होतं असे. वर उल्लेख आलेल्या व्यापारी मार्गावर अनेक टप्पे तयार करण्यात आलेले आहेत. जसे शिरोली तेथील डोंगर, सातेरी-महादेव डोंगर, सांगरूळ येथील डोंगर. या टप्प्यावरून सदर व्यापारी मार्गावर नजर ठेवली जात असे. या सर्व टप्प्यांपैकी सातेरी-महादेवाचे स्थान सर्वांत उंच आहे. या स्थानावरूनच व्यापारी मार्गावरील सर्व टेहळणीची ठिकाणे सहज दृष्टीस पडतात. आरळे-घानवडे पासुन ते पन्हाळा दुर्गापर्यंतचा पुर्ण व्यापारी मार्ग ह्या एकट्या सातेरी-महादेव डोंगरावरून नजरेस पडत होता. याशिवाय कोल्हापूर, पन्हाळा, कसबा बीड या राजशिबिरांमध्ये परस्पर संपर्क साधण्यास देखील हा डोंगर नक्कीच उपयोगी पडत असेल. प्राचीन काळाच्या अनेक क्लुप्ती वापरून महत्त्वाचे संदेश लवकरात लवकर पोहोचवणे हे आपण अनेक मालिकांमध्ये तसेच छत्रपती शिवरायांच्या युध्द नितीमध्ये पाहिले आहे. असे संदेश कोल्हापूर, पन्हाळा, कसबा बीड तसेच संपूर्ण व्यापारी मार्गावरील टेहळणी ठिकाणांवर पोहचवण्यासाठी या टेकडीचा वापर होतं असावा. इतके हे स्थान महत्त्वाचे होते.
भौगोलिक दृष्ट्या ही या डोंगराचे आणि डोंगर रांगेचे स्थान महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात या डोंगरावरुन प्रवाहीत होणाऱ्या ओढ्यांचे पाणी खाली तयार करण्यात आलेल्या पाझर तलावांत साठवले जाते. याचा फायदा पायथ्याच्या गावांना होतो. तसेच येथील वाऱ्याची गती पाहता पवनचक्की प्रकल्पाद्वारे येथे वीज निर्मितीही होवू शकते. शिवाय जीवसंस्थेच्या आधीवासासाठी हे डोंगर महत्त्वाचे आहेत.
श्री. श्रेत्र सातेरी-महादेव हे स्थान नैसर्गिक, भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे आहे. या ठिकाणी सांस्कृतिक पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन, निसर्ग पर्यटन होवू शकते. या दृष्टीने येथे पर्यटन व्यवसाय वाढवला जाऊ शकतो. पर्यटन वाढीसोबतच येथे स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होवू शकतात. महाशिवरात्री, नवरात्री तसेच प्रत्येक सोमवारी अनेक भाविक या ठिकाणाला भेट देत असतात. या सर्व भाविक आणि पर्यटकांसाठी येथे चांगले रस्ते, प्रसाधनगृहे, वीजेची सोय अशा प्रकारच्या सोयी होणे अत्यंत महत्वाचे आहे. तसेच या परिसरामध्ये अनेक ठिकाणी बेकायदेशीर उत्खनन देखील वाढले आहे. स्थानिक प्रशासनाने वेळीच लक्ष घालुन नियोजनबद्ध रितीने या जागेचा विकास करणे गरजेचे आहे. आपणही आपल्या मित्रपरिवारासह, आपल्या कुटुंबासह येथील इतिहास, सांस्कृतिक वारसा, निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी किमान एकदा तरी या ठिकाणाला अवश्य भेट द्याच. सातेरी-महादेव डोंगरासोबतच आपण या भागातील बहिरेश्वर, सावरवाडी आणि कसबा बीड या गावातील ऐतिहासिक पर्यटनही तुम्ही अनुभवू शकता. अधिक माहिती आणि गाईड साठी यंग ब्रिगेड, सुवर्णराजधानी कसबा बीड ही संघटना सदैव आपल्या सेवेत तत्पर आहे.
धन्यवाद..
सूरज संजय तिबीले
यंग ब्रिगेड, सुवर्णराजधानी कसबा बीड
मो. नं. : 9503973234
ई-मेल : tibilesuraj7@gmail.com
















Good Information
ReplyDeleteThank You..😇🙏
DeleteNice information..
ReplyDeleteGood work ��Thnks Suraj & Team..��
Thank You..🙏😇
DeleteGood one.. keep it up
ReplyDeleteThank You..😇🙏
Deleteखूपच चांगली माहिती दिलेली आहे अगदी स्वच्छ स्पष्टीकरण ☺️👌👌
ReplyDeleteधन्यवाद..😇🙏
Deleteछान माहिती दिली आहे आपण.
ReplyDeleteधन्यवाद..🙏😇
DeleteGreat Information Keep it up Suraj and Team ������
ReplyDeleteThanks Dada..🙏😇
Deleteजय शंभो महादेव,
ReplyDelete🙏🙇♂️
DeleteVery nice information
ReplyDeleteThanks..🙏😇
Deleteखूप छान माहिती दिली.... धन्यवाद
ReplyDeleteधन्यवाद..🙏😇
Delete👍👍
ReplyDeleteNice 🚩🚩🚩
ReplyDelete👍👍
ReplyDeleteमोलाची माहिती
ReplyDeletewell elaborative information.........
ReplyDelete