शिव (शिवस्वरूपिनी तुळशी नदी) आणि गंगा (पाताळगंगा भोगावती नदी) यांचा पवित्र संगम तीरी वसलेले, शेतीयोग्य सुपीक जमीन आणि निसर्गदत्त संरक्षण लाभलेला असा या प्रदेश म्हणजे प्राचीन तीरवाड नगर. हजारो वर्षांपूर्वी येेेेथे मानवी वसाहत स्थिरावली असावी. हळूहळू ह्या साधारण वस्तीचे गावामध्ये रूपांतर झाले. कालांतराने येथे सर्व सुसज्ज नगर येथे विराजित झाले आणि तद्नंतर यांस राजधानीचा मान प्राप्त झाला, असे हे तीरवाड.
तीरवाड मधील तीर म्हणजे काठ आणि वाड म्हणजे गाव. नदीच्या तीरावर वसलेले ते तीरवाड. प्राचीन काळी राज्य शासनाच्या सोयीकरता प्रदेशाचे अनेक विभाग आणि पोटविभाग केले होते. शिलाहार राजवंशाच्या काळात सदर विभाग आणि पोटविभागांसाठी देश, विषय, खंपण/गंपण, नगर व ग्राम अशा संज्ञा प्रचलित होत्या. शिलाहार काळात कोल्हापूर प्रदेशातील सामान्य लोकांची भाषा कन्नड असल्याने तेथील विभागांची नावे ही कन्नड भाषेतच आढळतात. यांत सर्वांत मोठ्या विभागाला देश ही संज्ञा वापरली जाते. उदाहरणार्थ कुंतल देश, महादेश. देशाचा पोटविभाग तो विषय. विषयांच्या शेवटी नाड किंवा खोल्ल अशी नावे जोडलेली असत. उदाहरणार्थ एडेनाड, आजिरगेखोल्ल. विषयांचे खंपण आणि गंपण या नावाचे पोटविभाग पडतात. उदाहरणार्थ मिरींजेगंपण, कोडवल्लिखंपण. त्याचे पोटविभाग म्हणजे ग्राम. याच्या शेवटी पल्लि, पल्लिका, वाड आणि ग्राम अशा संज्ञा वापरल्या जातात. उदाहरणार्थ मंचकपल्लि, चिख्यलपल्लिका, तीरवाड, बोपग्राम. अशाच प्रकारचे तीरवाड हे कन्नड भाषी नाव तेव्हा या नगरास प्राप्त झाले असावे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या ईशान्य भागांस शिलाहार काळात एडेनाड असे नाव होते. क्षुल्लकपुर (कोल्हापूर) प्रमाणे एडेनाड हा स्वतंत्र विषय (जिल्हा) होता. एडेनाड विषयात सध्याच्या करवीर तालुक्यातील पश्चिम भाग, हातकणंगले तालुक्याचा दक्षिण भाग व कागल तालुक्यातील काही भाग या प्रदेशाचा समावेश होत असे. तीरवाडचा समावेश ह्याच एडेनाड विषयात होत असे. कोल्हापूरातील महालक्ष्मी मंदिर परिसरामध्ये प्राप्त झालेल्या शिलालेखामध्ये शिलाहार राजा वीरभोज (द्वितीय) यांनी कोप्परवाड या गावातील जमीन दान दिल्याची माहिती मिळते. सदर शिलालेख मंगळवार दिनांक 25 डिसेंबर 1190 साली दिला असुन या दान दिलेल्या शेताच्या सीमा सांगताना तीरवाडबीड ते पन्नाले दुर्गाला जाणार्या मार्गाचा उल्लेख आला आहे. यातील कोप्परवाड म्हणजे सध्याचे कोपार्डे गाव तर प्रन्न्नाले दुर्ग म्हणजे पन्हाळा किल्ला. बीड ते पन्हाळा मार्गातच कोपार्डे गाव आहे त्यामुळे प्राचीन तीरवाड म्हणजेच सध्याचे बीड यांस दुजोरा मिळतो.
![]() |
राजा द्वितीय भोज यांच्या दानपत्रातील तीरवाडबीड चा उल्लेख |
तसेच बीड या नावासंबंधी सुचना करताना अनेकदा तर्क केला जाते की शिलाहार काळा नंतर येथे बेडा म्हणुन ओळखल्या जाणार्या सुवर्ण मुद्रांवरून यांस बीड हे नाव प्राप्त झाले. पण शिलाहार राजा भोज (द्वितीय) यांच्या शिलालेखामध्ये कसबा बीड चा तीरवाडबीड असा उल्लेख आला आहे. म्हणजेच सध्याचे प्रचलित बीड हे नाव हजारो वर्षांपासून चालत आले आहे. कदाचित बीड ह्या नावामुळेच येथे आढळणार्या सुवर्ण मुद्रांना बेडा हे नाव मिळाले असावे.
इ.स. 1024 साली चालुक्य सम्राट जयसिंह यांनी दक्षिण कोंकण पादाक्रांत केले. असे त्यांच्या मिरज ताम्रपटावरून कळते. चालुक्यांपैकी हे एकमेव जयसिंह नामक सम्राट तेव्हा कोल्हापूर प्रदेशावर आले होते. या वेळी मिरज आणि कोल्हापूर वर शिलाहार घराणे चालुक्यांचे मांडलिक म्हणून राज्य करत होते. दक्षिण कोंकण मोहिमेत शिलाहार नरेश गोंक यांनी सम्राट जयसिंह यांना मदत केली होती. म्हणून सम्राट जयसिंह यांनी दक्षिण कोंकण चा प्रदेश शिलाहार नरेश गोंक यांच्या ताब्यात दिला असावा. या मोहिमे दरम्यान जयसिंह यांचा हत्तीवरील सेनापती मरण पावला. या अनामिक सेनापतीच्या स्मरणार्थ कसबा बीड मधील समाधी म्हणुन ओळखल्या जाणार्या ठिकाणी एक शिवालय बांधले गेले. तेच आज कल्लेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. शिलाहारापैंकी राजा गोंक हे प्रथम तीरवाड येथे आले होते हे कळते. पण गोंक यांची त्यावेळची राजधानी ही करहाट (कराड) येथे होती. गोंक पुत्र राजा मारसिंह यांनी आपली राजधानी कोल्हापूर येथे आणली.
कसबा बीड मध्ये पुर्वापार एक अख्यायिका रूढ झाली आहे की 'बीड ही राजा भोज यांची राजधानी होती'. यानुसार मारसिंह यांनी आपली राजधानी कोल्हापूर येथे आणल्यानंतर त्यांचे पुत्र राजा भोज हे या तीरवाड नगरीस आपल्या वास्तव्याचे ठिकाण बनवणारे पहिले शिलाहार राजे असावेत. मुख्य राजधानी पासुन ठराविक ठिकाणी सैन्य तळ आणि विश्रांतीची जागा यासाठी राजा भोज यांनी तीरवाड ला निवडले असावे. तसेच आपल्या राहणीमानास साजेशी नगर रचना करून या नगराला अनेक वास्तु आणि मंदीरांनी सुशोभित केले. त्यामुळेच तीरवाडास आणि आजच्या कसबा बीड ला भोज राजाची राजधानी म्हणून ओळख मिळालेली आहे.
प्रथम भोज हेच तीरवाड नगरात वास्तव्यास असणारे पहिल शिलाहार राजे होते या तर्कास दुजोरा देतो तो राजा गंडरादीत्य यांचा ताळले ताम्रपट. राजा गंडरादीत्य हे राजा भोज यांचे बंधू होते ते त्यांच्या नंतर राजे पदी आले होते. ताळले ताम्रपट हा तीरवाड या शिलाहारांच्या स्थायी शिबीरातुन (सैन्य तळ) दिला गेला असा उल्लेख या ताम्रपटात आढळतो. राजा गंडरादीत्य हे तीरवाड येथे त्यांच्या स्थायी शिबीरात सुखसंवादात राज्य करत असता त्यांनी हे दान दिले असे ताम्रपट सांगतो. सदर दानपत्र मंगळवार दिनांक १ फेब्रुवारी १११० रोजी देण्यात आले होते. म्हणजेच राजा भोज यांच्या नंतर गादीवर आलेल्या राजा गंडरादीत्य यांचे काही काळ येथे वास्तव्य होते.
कसबा बीड चे नागरिक श्री राजाराम वरूटे यांच्या शेतात (वरूटे मळा) दोन शिलालेखांचे काही तुकडे सापडले आहेत. हे शिलालेख शिलाहार नृपती विजयादित्य यांचे आहेत. राजा विजयादित्य हे राजा गंडरादीत्य यांचे पुत्र आणि उत्तराधिकारी होते. या शिलालेखांपैकी पहिला लेख हा एका मोठ्या शिलालेखाचा तुकडा असुन तो कानडी लिपी आणि कानडी भाषेत आहे. इ.स. ११४९ सालाच्या या शिलालेखाच्या उपलब्ध तुकड्यावर राजाचे नाव, त्यांची बिरूदे, लेखाच्या काळ आणि तो वळवाड येथुन राज्य करत होता असा तपशील आहे. राजा गंडरादीत्य यांच्या नंतर राजा विजयादित्य यांचा तीरवाडसोबत प्रत्यक्ष संबंध आला आहे. त्यामुळे तीरवाड हे राजा भोज यांच्या काळातच सुसज्ज नगर झाले असावे. जे राजा गंडरादीत्य आणि राजा विजयादित्य यांच्या काळात संपन्नतेच्या शिखरावर पोहोचले.
![]() |
राजा विजयादित्य यांचे शिलालेख |
राजा द्वितीय भोज यांची राजधानी ही पन्हाळा दुर्गावर स्थित होती. तर द्वितीय भोज यांच्या एका ताम्रपटात तीरवाडबीड ते पन्हाळा दुर्गाला जाणार्या मार्गाचा उल्लेख आला आहे. म्हणजे तीरवाड नगर हे राजा द्वितीय भोज यांचा उदय होण्यापुर्वीच नावारुपाला आलेले होते. अशा प्रकारे तीरवाड नगरासोबत शिलाहार राजा गोंक, राजा भोज (प्रथम), राजा गंडरादीत्य, राजा विजयादित्य आणि राजा वीरभोज (द्वितीय) यांचा प्रत्यक्ष संबंध होता हे स्पष्ट होते.
राजा द्वितीय भोज यांच्या दानपत्रात आलेल्या तीरवाड ते पन्हाळा दुर्गाला जाणार्या मार्गाविषयी सुचना करताना डाॅ. ग्रॅहम म्हणतात की काही राजे हे बीड या राजधानीवर राज्य करत असत. बीड च्या राज्यात सध्याचे कोल्हापूर आणि पन्हाळा यांचा समावेश होत असे. या विधानाला मुंबई गॅझेटियर देखील पुष्टी देते. कोल्हापूर आणि पन्हाळा प्रदेशांचा समावेश असणार्या राज्याची राजधानी कसबा बीड असणे ही बीड वासियांसाठी अभिमानाची बाब आहे.
या तीरवाड नगराची वसाहत कशी होती हे निश्चित सांगता येत नसले तरी त्याबाबत अंदाज बांधता येतो. पुर्वी सामान्य जनांची घरे ही कच्ची, झोपडीवजा असत. तर अमीर, उमराव, मोठे व्यापारी, राजे, मंत्रीगण यांची घरे ही पक्की घडीव दगडी बांधकामात असत. तसेच विहीरी, तलाव हे मानवी वस्तीजवळच खोदवले जात किंबहुना मानव अशा पाणवठ्याच्या ठिकाणीच राहणे अधिक योग्य समजतो. त्याचप्रमाणे मंदिरे ही देखील वस्ती पासुन अधिक दुर असत नाहीत. साधारणतः सखल भागात वसाहतीच्या मध्यभागी मंदिर पहावयास मिळतात. आज ही कच्ची घरे जमिनीत विलीन झाली असली तरी पक्क्या घरांचे दगडी अवशेष आढळुन येतात. तसेच दगडी प्रापंचिक वस्तू, पक्की भाजलेली खापरे, भांड्यांचे तुकडे हे अनेक ठिकाणी सहजी सापडतात. बर्याच ठिकाणी सुवर्ण मुद्रा आढळतात. सदर सर्व गोष्टी या मानवी वसाहतीच्या द्योतक आहेत.
![]() |
प्रापंचिक वस्तू |
![]() |
खापरे आणि भांड्यांचे तुकडे |
अशा स्वरूपाची बरीच स्थळे कसबा बीड आणि त्याच्या सभोवती पहावयास मिळतात. यापैकी थोटाळा, रानबाव, सोन्याचा माळ, ढोक माळ, पाटील मळा (बेंदाड), गोसावकी, वरूटे मळा, चव्हाण पाणंद, कोगे पाणंद ही ठिकाणे या दृष्टीने महत्त्वाची आहेत. थोटाळा या ठिकाणी जैन मंदिराचे अवशेष आणि एक तलाव देखील आढळतो. या भोवती पुरातन वास्तुंचे अवशेष, वीरगळ सापडतात. त्यायोगे तीरवाड ची जैन वसाहत या स्थळी असावी असा कयास वर्तवता येतो.
![]() |
थोटाळा येथील जैन मंदिर अवशेष |
राणबाव म्हणून ओळखल्या जाणार्या ठिकाणी राणी स्नानासाठी येत असत अशी अख्यायिका प्रसिद्ध आहे. त्यामुळे सदर ठिकाणी एखादी महालवजा वास्तु असणे शक्य आहे. ह्या तळ्याला लागुनच एका वास्तुचा जोता आणि त्याचे भग्नावशेष आढळतात. यांवरून या अख्यायिकेला आधार मिळतो. राणबाव आणि गणेश तलाव या दरम्यानचा प्रदेश हा किंचित उतरणीचा आहे. या संपूर्ण प्रदेशात अनेक अवशेष हे विखुरलेले आढळतात. तसेच या प्रदेशात प्रापंचिक वस्तू आणि सुवर्णमुद्रा प्राप्त झाल्या आहेत.
![]() |
राणबाव परिसरातील अवशेष |
गणेश तलाव ते गणेशवाडी दरम्यानचा प्रदेश म्हणजे सध्याची बीडशेड बाजारपेठ. पुर्वी पासुन हा प्रदेश हा सोन्याचा माळ म्हणून प्रसिद्ध आहे. प्राचीन काळी याच ठिकाणी मोठी व्यापारपेठ आणि याला लागुनच पुर्वेस व्यापारी वसाहत असावी. याच्या दक्षिणेस जवळपास 16 एकर वर पसरलेला गणेश तलाव, त्या परिसरात मिळणारे अवशेष, प्रापंचिक वस्तू आणि सुवर्णालंकार हे येथील वसाहतीचे निर्देशक आहेत. या गणेश तलावाची रचना ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. तलावा अंतर्गत सात विहीरी आहेत. तर तलावातील जास्तीचे पाणी बाहेर काढण्यासाठी सुयोग्य यंत्रणा करण्यात आली आहे. पाणी बाहेर पडणार्या जागेवर काहीशा घडीव दगडांची रचना दिसते त्यास स्थानिक भाषेत 'लिक' म्हटले जाते.
![]() |
गणेश तलाव परिसरातीलअवशेष |
सोन्याच्या माळावरून खाली समाधी परिसर लागतो. येथे आढळलेल्या मानवी हाडे आणि इतर काही अवशेषांवरून येथे दफनभूमी असावी आणि त्यावरून यांस समाधी असे नाव प्राप्त झाले असावे असे दिसते. या परिसरामध्ये आज श्री कल्लेश्वर मंदीर आणि इतर काही अवशेष आढळुन येतात. अकराव्या शतकात चालुक्य सम्राट जयसिंह यांनी दक्षिण कोंकणवर आक्रमण केले. यावेळी झालेल्या युद्धात सम्राट जयसिंह यांचा हत्तीवरील सेनापती मरण पावला. या अमर सेनापतीच्या स्मरणार्थ सम्राट जयसिंह यांनी हे मंदिर बांधले.
![]() |
पाटील मळा (बेंदाड) परिसरातील अवशेष |
समाधी नंतरच्या प्रदेशाला ढोक माळ असे म्हणतात. ढोक माळाचा भाग हा इतर भागांपेक्षा किंचित उंचीवर आहे. तर त्याच्या भोवती उतरण होत जाते. या ढोक माळाच्या माथ्यावर एका बाजुस बुरुज सदृश्य बांधकामाचा पाया आढळतो. त्याचे स्थान पाहता हा बुरुज तटबंदीचा भाग असावा असे भासते. सभोवार तटबंदी आणि त्या आत वाडा हे समीकरण फार पूर्वीपासून चालत आले आहे. ढोक माळाचा समतल माथा आणि तटबंदीचे अवशेष यांवरून हे राजवाड्याचे ठिकाण असावे असा अंदाज बांधता येईल.
![]() |
गोसावकी परिसरातील अवशेष |
ढोक माळाच्या दक्षिणेचा भाग म्हणजे व्हावटेक. या ठिकाणी वस्तारा आणि वस्तार्याची पाती आढळली होती यांवरून यांस व्हावटेक का म्हणतात याचा उलगडा होतो. राजा या ठिकाणी आपली दाढी वैगरे करण्यासाठी येत असे त्यामुळे याला व्हावटेक म्हणतात अशी अख्यायिका नेहमी सांगितली जाते. पण सदर ठिकाणी पूर्वी नाभिक समाजाची वसाहत होती म्हणून याला व्हावटेक म्हणत ही शक्यता नाकारता येत नाही.
![]() |
वरूटे मळा परिसरातील अवशेष |
ढोक माळाच्या उत्तर पुर्व भागाला घोडकल असे म्हटले जाते. ह्या भागात घोड्यांचे सांगाडे, हाडे खुप वेळा मिळालेली आहेत. त्यानुसार येथे प्राचीन काळी घोड्यांची पागा असावी असे म्हणता येईल. घोड्यांची पागा ही सैन्य तळापासुन दुर असत नाही. म्हणून ह्या पागेला लागुनच सैन्याच्या निवासाची जागा असावी हे खास. ढोक माळाच्या उंचवट्यांला वेढा देत, राज प्रासादापासुन ठराविक अंतरावर सखल जागेत सैन्याचे निवास स्थान आणि त्याला लागुन अश्वशाळा हे तर्कसंगत आहे. सध्याच्या चव्हाण पाणंदीचा सुरूवातीचा भाग म्हणजे ही जागा असावी असे वाटते.
![]() |
चव्हाण पाणंद परिसरातील अवशेष |
अशाच प्रकारे लक्ष्मी तलाव आणि त्याच्या पुर्वेचा परिसर. येथे लक्ष्मी मंदिर, गोसावी मठ तसेच अनेक अवशेष आढळतात. यासोबतच वरूटे मळा, कोगे पाणंद येथे येथे वसाहतीच्या पुसटशा खुणा पहावयास मिळतात. सध्याचा कसबा बीड चा मुख्य चौक असणारी जागा ही पुर्वी खाणीची जागा होती अशी माहिती जाणकारां मार्फत मिळते. विविध वास्तु, शिल्प, वीरगळ इत्यादी साठी लागणारा काळा कभिन्न दगड हा या खाणीतुनच प्राप्त होत असावा.
![]() |
लक्ष्मी तलाव परिसरातील अवशेष |
गावाला तीन बाजुंनी नदीचा वेढा आहे पण एकंदरीत नदी किनारी प्रदेश पाहता येथे मोठी वसाहत असावी असे वाटत नाही. याशिवाय अनेक ठिकाणी नदीने खडकाळ भागात उतार दिला आहे. या भागावरून पावसाळ्या व्यतिरिक्त इतर काळात वाहतुक चालत असावी असे वाटते. कोगे पाणंद येथुन कोगे साठी आणि शिवयोगी मठ येथुन आरे गावासाठी जाणारे मार्ग असावे असे दिसते. ही शक्यता गृहीत धरली तर कोगे पाणंद - लक्ष्मी तलाव - चव्हाण पाणंद / ढोक माळ - गोसावकी - व्यापारपेठ असा आणि व्यापारपेठ - गणेश तलाव - राणबाव - पाटील मळा (बेंदाड) - शिवयोगी मठ - आरे मार्ग असे मार्ग असण्याची शक्यता आहे. यापैकी आरेसाठीचा मार्ग हा विसाव्या शतकापर्यंत अस्तित्वात होता हे तेथे आढळणार्या ब्रिटिश कालीन नाण्यांवरून कळते. म्हणजेच नगराच्या मध्यवर्ती ठिकाणाच्या सभोवार मुख्य मार्ग, ह्या मार्गाच्या आत राजवाडा, व्यापारी वसाहत, लष्करी तळ असावा आणि याच्या बाहेर शेती आणि इतर वसाहत असावी असा अंदाज केला जाऊ शकतो.
![]() |
प्राचीन तीरवाड नगराचा अंदाजित नकाशा |
शिलाहार राजे हे व्यापाराच्या दृष्टीने सकारात्मक होते. व्यापारास राजाश्रय प्राप्त होता. सध्याचे राधानगरी म्हणजे शिलाहारांची वळवाड (वलयवाड, वल्लवाड) ही राजधानी. या राजधानीहुन पन्हाळा दुर्गाला जाणारा व्यापारी मार्ग हा कोटे (कोते), गंगवाड (घानवडे), तीरवाड येथुन जात असे. तीरवाडचे स्थान पाहता येथेही व्यापारपेठ निर्माण झाली. या स्थानाचे व्यापारी दृष्ट्या महत्त्व सध्याच्या बीडशेड बाजारपेठे वरून ध्यानात येते. यथावकाश व्यापाराचा आणि व्यापारपेठेचा विकास झाला आणि यासोबतच अनेक व्यापारी येथे स्थायिक झाले.
सध्याच्या बीडशेड या ठिकाणी प्राचीन काळी व्यापारपेठ आणि व्यापार्यांची वसाहत होती. स्वातंत्र्योत्तर काळात शेतीसाठी जमीन कसत असता लोकांना येथे मोठ्या प्रमाणावर नाणी मिळु लागली. या भागात इतके सोने सापडल्याने सदर भागाला सोन्याचा माळ असे नाव पडले. त्यानंतर या सोन्याच्या माळाची ख्याती सर्वदूर पसरली होती असे जाणकार सांगतात. यासोबतच या ठिकाणाच्या आसपास काही लोकांना अतिशय सुरेख कलाकुसरीचे सुवर्णालंकार आणि उत्तम दर्जाच्या दगडी प्रापंचिक वस्तू सापडल्या आहेत. हे सुवर्णालंकार आणि प्रापंचिक वस्तू पाहता येथील व्यापारी वर्गाच्या श्रीमंतीची कल्पना येते.
कसबा बीड गावात एक उर्दू शिलालेख सापडला आहे. ह्या शिलालेखावर उर्दू भाषेत आयत आणि अल्लाह असे कोरलेले आहे. हा शिलालेख सध्या जोतिबा मंदिर येथे असून सदर शिलालेख म्हणजे एखाद्या इस्लामी प्रार्थना स्थळाच्या चौकटीचा भाग असावा असे तज्ञांचे मत आहे. यावरून कसबा बीड येथे एखादे इस्लामी प्रार्थना स्थळ असावे असे अनुमान निघते. हे अनुमान गृहीत धरता तीरवाड येथे अरब व्यापार्यांची म्हणजेच परदेशी लोकांची वसाहत अथवा सततचा संपर्क असावा असे म्हणण्याचा मोह आवरत नाही.
![]() |
जोतिबा मंदिर परिसरातील उर्दू शिलालेख |
आजतागायत कसबा बीड आणि त्याच्या सभोवती सोन्याची नाणी व मुद्रा सापडतात. अगदी रोजच्या उठबस असणार्या ठिकाणी अचानक आणि सतत अशी नाणी प्राप्त झाल्याने कसबा बीड मध्ये सोन्याचा पाऊस पडतो आणि ही नाणी नशीबवान व्यक्तीलाच सापडतात अशी अख्यायिका रूढ झाली आहे. तसेच मोठा व्यापार, राज परिवाराच्या वास्तव्याचे स्थान, राज शिबीर यांमुळे तीरवाड नगराची वैभव संपन्नता इतकी उच्च होती की तीरवाडमध्ये सोन्याचाच पाऊस पडतो अशी प्रसिद्धी प्राप्त झाली असावी. आज पंचक्रोशीतील प्रत्येक अबालवृध्दांच्या तोंडी हमखास ही अख्यायिका ऐकायला मिळते. यासंबंधी तज्ञ म्हणतात की प्राचीन काळी जेव्हा राजाचे नगरात स्वागत होत असे अथवा नगर प्रदक्षिणेसाठी प्रस्थान होत असे तेव्हा राजावर सुवर्ण मुद्रांची उधळण केली जात असे. त्यावेळी या सुवर्ण मुद्रा जमिनीत गाडल्या गेल्या आणि आज या विविध कारणांमुळे त्या मुद्रा वर येत आहेत.
![]() |
बीड मध्ये सापडलेली नाणी आणि सुवर्णालंकार |
पण या मुद्रां सोबतच सुवर्णालंकार आणि इतर सोन्याच्या वस्तू बर्याच ठिकाणी प्राप्त झाल्या आहेत. तसेच या नाण्यांचे प्राप्तीस्थळ पाहता ही ठिकाणे वसाहतीची असावी असे भासते. त्यामुळे वसाहत असणार्या ठिकाणी ही नाणी आणि सुवर्णालंकार जमिनीत गाडले गेले जे आज प्राप्त होत आहेत ही शक्यता ही नाकारता येत नाही. तसेच जुन्या मार्गांवर देखील अशी नाणी बर्याच वेळा मिळालेली आहेत. कसबा बीड व आरे यांना जोडणार्या जुन्या मार्गावर प्राचीन काळापासून मध्ययुगीन तसेच ब्रिटिश कालीन नाणी मिळालेली आहेत. यावरून जुने मार्ग आणि वसाहतींच्या ठिकाणी अशी नाणी सापडतात हे विधान योग्य ठरते.
कोल्हापूर च्या शिलाहारांच्या लेखात फणम् आणि बिसिगे या नाण्यांचा उल्लेख आढळतो. फणम् किंवा पणम् हे अगदी लहान आकाराचे पाच किंवा सहा ग्रेन वजनाचे नाणे आहे. तर बिसिगे हे संस्कृत विशोपक किंवा मराठी विसोवा प्रमाणे फणम् च्या विसांश किंमतीचे नाणे असावे. अशा प्रकारची असंख्य नाणी आजतागायत कसबा बीड मध्ये प्राप्त झाली आहेत, होत आहेत. कसबा बीड मधील बहुतांश लोकांजवळ आज अशी नाणी उपलब्ध आहेत.
शिलाहार नृपती द्वितीय भोज यांचे इ.स. ११९१ सालाचे केळेशी दानपत्र प्राप्त झाले आहे. या ताम्रपटाचे तीन पत्रे असुन त्याला गरूडमुद्रा जोडली आहे. यावरून शिलाहार राजांच्या राजमुद्रेवर गरूड चिन्हं होते हे लक्षात येते. अशीच गरूडमुद्रा असणारी अनेक नाणी कसबा बीड मध्ये प्राप्त झाली आहेत. याशिवाय विविध प्राणी, वृक्ष, विविध आयुधे, टिंबे कानडी अक्षरे कोरलेली नाणी बीड मध्ये आढळतात. तसेच झुबा, अंगठी अशाप्रकारचे सुवर्णालंकार आणि सोन्याचा नाग, तार यासारख्या वस्तू सापडल्या आहेत. या व्यतिरिक्त गावात एकत्रित स्वरूपात सोने सापडल्याचे ऐकिवात आहे. पण याबाबत कोणताही अधिकृत पुरावा मिळत नाही.
शिलाहार राजे हे सहिष्णु होते. सर्व धर्मांचे आश्रयदाते होते. त्यांच्या काळात तीरवाड नगर हे सर्व धर्मीयांचे आगार बनले होते. सर्व विभागांत सर्व धर्मांचे लोक एकत्र राहत असले तरी येथे आढळणारी मंदिरे, मठ यांवरून येथे कोणत्या पंथाची, धर्माची लोकवस्ती प्रमुख होती हे सांगता येते. हे सर्व विभाग एकाच नगरात असले तरी त्या विभागांनी आपले असे स्वतंत्र अस्तित्व जपले होते. आज देखील सण एकच असला तरी ते साजरे करण्याच्या पध्दती मध्ये काहीसा फरक आढळतो. हेच या गावांचे वेगळेपण आहे. या सर्व विभागांवर राज्यशासनाचा प्रमुख म्हणून नगराधिपतीचे नियंत्रण राहत असे.
महे येथे भैरवनाथ टेकडीवर भैरवनाथाचे मंदिर आहे. तसेच गावात महादेव, मारूती या देवांची मंदिरे आढळतात. याशिवाय येथे अधिक अवशेष सापडत नाहीत. त्यामुळे येथे पुर्वी पासुनच हिंदू धर्मीय लोक राहत होते हे स्पष्ट होते. तर कोगे या गावी पार्श्वनाथाचे जैन मंदिर आढळते. याशिवाय या गावात चाळकोबा आणि महादेव ही मंदिरे आहेत. सध्या या गावात जैन धर्मीय लोक राहत नसले तरी शिलाहार काळात येथेच मुख्य जैन वस्ती असावी असे येथील अवशेषांवरून दिसते. जैन धर्मीयांसोबतच येथे हिंदू धर्मी लोक ही वास्तव्यास होते.
![]() |
महे येथील भैरवनाथ टेकडी आणि मंदिर |
![]() |
कोगे येथील जैन मंदिर |
![]() |
कोगे येथील महादेव मंदिर |
पुर्वी पासुनच हिंदू धर्मात शैव पंथीय म्हणजे भगवान शिवाचे उपासक आणि वैष्णवपंथीय म्हणजे श्री विष्णूचे उपासक असे दोन पंथ पडतात पण तीरवाड नगरात हे दोन्ही पंथ एकत्रित राहत होते हे बहिरेश्वर आणि कसबा बीड येथील मंदिरे व शिल्पांवरून कळते. बहिरेश्वर या गावी पलाशतीर्थ नावाचा तलाव आहे. या तलावाच्या मध्यभागी शेषशायी विष्णूचे मंदिर असलेले दिसते. करवीर महात्म्य मध्ये या मंदिराचा उल्लेख आलेला आढळतो. या मंदिरातील विष्णूची मुर्ती ही होयसळ कालीन शिल्पकलेतील असुन गजगी रंगाच्या गंडकी शिळेत घडवलेली आहे. या शिल्पावरील प्रत्येक बारकावा कुशल कारागिराने अचूक साकारला आहे. या मंदिराच्या उत्तरेस बुवा-गोसावी समाजाचा मठ आहे तर पुर्वेस बहिरेश्वर गावाच्या मध्यभागी महादेवाचे मंदिर आहे. हे मंदिर उत्तर शिलाहार कालीन असुन ते हेमाडपंती बांधनीचे आहे. या मंदिराच्या सभोवार वीरगळांची मांडणी केलेली आहे. येथील वीरगळांत इतर गावातील वीरगळांपेक्षा थोडा फरक जाणवतो. या वीरगळांमध्ये शिवलिंग हे नंदीने आपल्या पाठीवर तोलले असल्याचे दृष्य दिसते. तर इतर गावातील वीरगळांत मुख्यतः शिवलिंग हे खाली दाखवण्यात आले आहे.
![]() |
बहिरेश्वर येथील महादेव मंदिर |
![]() |
बहिरेश्वर येथील शेषशायी विष्णू जलमंदीर |
गणेश तलाव, गावातील गणेश मंदिर आणि गणेशवाडी हे नाव यांचा परस्पर संबंध असावा असा तर्क वर्तवला जातो. या गावात मारूती मंदिर आणि गणेश मंदिर ही मंदिरे प्रमुख आहेत. याशिवाय या गावात प्राचीन अवशेष आढळत नाहीत. सध्याची वसाहत ही प्राचीन वाटत नाही. पुर्वी गणेश तलाव आणि व्यापारपेठेच्या सभोवार असणारी वसाहत ही कालांतराने येथे स्थायिक झाली असावी.
![]() |
गणेशवाडी येथील मारूती मंदिर |
सावरवाडी गावात भैरवनाथाचे प्रमुख मंदिर आहे. या मंदिर परिसरात जैन मुनींची शिल्प ठेवली असल्याचे दिसतात. मंदिर फार जुने नाही पण ही शिल्पे प्राचीन आहेत असे वाटते. आज या गावात जैन धर्माचे अनुयायी राहत नाहीत त्यामुळे हे अवशेष प्राचीन वसाहतीचेच असावेत. आज येथे हिंदू धर्मीय लोक असले तरी पुर्वी हे जैन धर्मीय लोकांचे स्थान असावे.
![]() |
सावरवाडी गावातील प्राचीन अवशेष |
तीरवाड ते क्षुल्लकपुर या मार्गावर आरे हे गाव लागते. विसाव्या शतकापर्यंत कोल्हापूरला जाण्यासाठी याच मार्गाचा उपयोग होत असे. या गावात हरेश्वर महादेव मंदिर हे मुख्य देवस्थान आहे. मंदिराचे बांधकाम हे हेमाडपंती बांधनीचे असून याच्या छताचे काम हे पुरातत्व विभागाने नंतर केलेले आहे. मंदिराच्या आवारामध्ये वीरगळ ठेवण्यात आलेल्या आहेत. या वीरगळांमध्ये एक वीरगळ अतिशय महत्वाचा आहे. साधारण ५ फुट उंचीचा हा वीरगळ शिलाहार राजा गंडरादीत्य उर्फ गंडरदेव यांचा सेनापती बोमन्ननायक यांच्या स्मरणार्थ तयार केला आहे. वीर बोमन्ननायक हत्तीवर आरूढ कलचुरी राजा बिज्जल यांच्यावर चालून गेला असे या वीरगळावर दाखवले आहे. असेच अगदी हुबेहुब चित्रण कसबा बीड मधील बीडेश्वर मंदिरात असणार्या स्तंभ वीरगळावर देखील आहे. या अशा गोष्टीतुन या गावांची एकरूपता दिसून येते. तर या गावातील नारायण टेक येथे नारायणाचे मंदिर आढळते. याशिवाय या गावात इतर अवशेष मिळतं नाहीत यावरून येथे फक्त हिंदू धर्मीय लोक राहत असत असा कयास आहे.
![]() |
आरे येथील हरेश्वर महादेव मंदिर |
कसबा बीड म्हणजे या गावात थोटाळा या ठिकाणी जैन मंदिराचे अवशेष आढळतात याशिवाय वीरगळ आणि तलाव आढळतो. यावरून येथे मोठे जैन मंदिर आणि जैन वसाहत असावी असा अंदाज बांधता येतो. तसेच गावात जैन मुनींची शिल्पे देखील मिळतात. याशिवाय बीड मध्ये कल्लेश्वर मंदिर, बीडेश्वर मंदिर, मारूती मंदिर, गणेश मंदिर, जोतिबा मंदीर, लक्ष्मी मंदिर ही प्रमुख मंदिरे आहेत. तर गावच्या आसपास शारजाई, तुकाई, भैरव, गजलक्ष्मी यांची मंदिरे आढळतात. या सर्व मंदिरांवरून आणि अवशेषांवरून या ठिकाणी हिंदू धर्मी लोक अधिक होते हे स्पष्ट होते. इतर गावांपेक्षा कसबा बीड मधील मंदिरे आणि अवशेष हे अधिक प्रमाणात मिळतात. यानुसार कसबा बीड हेच तीरवाड चे मध्यवर्ती ठिकाण असल्याचे सिद्ध होते.
![]() |
कसबा बीड मधील प्रमुख मंदिरे |
तीरवाड आणि आसपासच्या सर्व भागांवर लक्ष ठेवण्यासाठी पुर्वेस भैरवनाथ टेकडीवर आणि पश्चिमेस सातेरी-महादेव डोंगरावर टेहळणी साठी ठाणे असावे. तीरवाडहून क्षुल्लकपुर ला जाणार्या मार्गावर भैरवनाथ टेकडीवरून लक्ष ठेवता येते तर सातेरी-महादेव डोंगरावरून कोल्हापुर पर्यंतचा संपूर्ण प्रदेश दृष्टीस पडतो. कालांतराने रूद्रप्रयाग संगम तीरी पाण्याची उपलब्धता आणि डोंगराचा आडोसा यामुळे महे या गावी वसाहत वाढली असावी. पण सातेरी-महादेव डोंगरावर पाण्याच्या दुर्भिक्षतेमुळे तेथे वसाहत नसलेली आपल्याला दिसते. आज बीड ते सातेरी या दरम्यान केकतवाडी, धोंडेवाडी आणि गणेशवाडी ही गावे आढळतात त्यांची वसाहत फार जुनी नाही. पुर्वी गावात एखादा साथीचा आजार पसरला तर किंवा दुष्काळ, अतिवृष्टी अशा आसमानी संकटामुळे मुळ स्थानापासून स्थलांतर करत असत. अशा प्रकारे तीरवाडच्या मुख्य वसाहतींचे स्थलांतर होऊन ही गावे निर्माण झाली असावी.
तीरवाड नगर हे प्रामुख्याने नदी किनारी स्थायिक झाले होते. यासोबतच नगरात अनेक तलाव, विहीरी खोदण्यात आल्या होत्या. नगराला शेतीसाठी सुपीक जमीन आणि मुबलक पाण्याची सोय होती. तसेच या प्रदेशाला निसर्गाने संरक्षण बहाल केले होते. अशा या ठिकाणी प्रथम गावाची स्थापना झाली. कालांतराने या गावाचे नगरात आणि नगराचे राजधानीमध्ये रूपांतर झाले. एक गाव ते सुसज्ज राजधानी होण्यापर्यंतचा प्रवास या भुमीने अनुभवला आहे.
अतिशय उत्तम बांधनीची मंदिरे, सुरेख कोरीव काम असलेली पाषाणशिल्पे, शेकडो वीरगळ, येथे आढळणार्या सुवर्ण मुद्रा हे सर्व आपल्याला त्या प्राचीन तीरवाडची सफर घडवतात. सोन्याचे गाव अशी ओळख गावाला प्राप्त झाली यावरून या नगराची श्रीमंती आणि संपन्नता लक्षात येते. सोन्याची उधळण करणारी, शिलालेख कोरून घेण्या इतपत मातब्बर मंडळी गावात होती. व्यापारला, सर्व जाती धर्मांना राजाश्रय होता. राज कुटूंबाचे वास्तव्य येथे होते. राज शिबीर होते. या सर्व गोष्टींवरून तीरवाड चे महत्व किती मोठे होते हे स्पष्ट होते.
या तीरवाड नगराचेच भाग म्हणजे आजची कसबा बीड, आरे, महे, कोगे, बहिरेश्वर, गणेशवाडी आणि सावरवाडी ही गावे. आपण असं म्हणू शकतो की तीरवाड ची ही सात अपत्ये व या गावांच आपापसातील नाते हे भावां समान. आज सर्व गावे स्वतंत्र व सार्वभौम आहेत. प्रत्येक गावाला स्वतंत्र प्रशासन आहे. सर्वच गावांनी विविध क्षेत्रात समतोल विकास साधला आहे. भोगावती नदी आणि तुळशी नदी यांच्या कृपेने ही गावे सर्वसंपन्न झालेली आहेत. पण या सर्वांचे मुळ आहे ते हे प्राचीन तीरवाड नगर. आज जी फळ मिळतं आहेत त्याची बीजे कुठेतरी त्या तीरवाड मध्ये पेरली गेली आहेत. ह्या तीरवाडचे अस्तित्व आज समाप्त झाले आहे. पण त्याचे अवशेष, त्याच्या विषयीच्या अख्यायिका आणि तो दैदिप्यमान इतिहास आजही जिवंत आहे. या सर्वांचे रक्षण व्हावे यासाठी आम्ही आज यंग ब्रिगेड, सुवर्णराजधानी या ग्रुप द्वारे सुरूवात केली आहे. पण हे काम कोणा एका व्यक्तीचे अथवा संस्थेचे किंवा फक्त प्रशासनाचे आहे असे नाही. हे काम या गावांत राहणार्या प्रत्येकाचे आहे. आपण आपल्या पुर्वजांचे वैभव जसे प्राणपणाने जपतो त्याच प्रमाणे हे आपल्या प्राचीन नगराचे अवशेष आपण जपले पाहिजेत. खर तर ते आपले आद्य कर्तव्य असले पाहीजे. आपापसातील मतभेद विसरून, एकमताने, सर्वांच्या साथीने हा हजारो वर्षांचा इतिहासाचा ठेवा आपण जपायलाच हवा. या इतिहासाच्या संवर्धनाची, जतनाची चेतना गावांतील प्रत्येक नागरिकांत जागली पाहीजे. तरच हे तीरवाड चे वैभव जिवंत राहु शकेल.
धन्यवाद..!
संदर्भ -
१) कसबा बीड एक ऐतिहासिक नगर
- डाॅ. आनंद दामले
२) शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख
- वासुदेव विष्णू मिराशी
३) महाराष्ट्र व गोवे शिलालेख - ताम्रपटांची वर्णनात्मक संदर्भ सुची
- शांताराम भालचंद्र देव
टीप - सदर लेख हा उपलब्ध साधने आणि अवशेष यांना नजरेसमोर ठेवून शक्यता आणि अंदाजांवर लिहिलेला आहे. यांतील माहीती पुर्णपणे योग्य आहे असे म्हणता येणार नाही. तरी या संदर्भात आपले मार्गदर्शन आणि सूचनांचे स्वागत आहे.
सुरज संजय तिबीले
यंग ब्रिगेड, सुवर्णराजधानी कसबा बीड
मो. नं. ९५०३९७३२३४
ई-मेल : tibilesuraj7@gmail.com