Friday, 9 August 2024

सुवर्ण राजधानी कसबा बीड आणि नागदेव


         आपल्या संस्कृतीमध्ये नागाला देवाचे स्थान देण्यात आले आहे. नाग तसेच सर्व सर्पांना शेतकऱ्याचा मित्र म्हणून ओळखले जाते. या नागांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागपंचमी साजरी केली जाते. नागपंचमीला नागांचे पुजन केले जाते. तसेच स्त्रिया भावासाठी म्हणून उपवास करत असतात. काही गावांत नागपंचमी सण नाग देवाच्या पालखी, नौबतीच्या लवाजम्यासह साजरा केला जातो.

          श्री महादेवांनी ह्या नागदेवाला आपल्या गळ्यावर स्थान दिलेले आहे. श्री शंकरांच्या अनेक मूर्त्यांवर आपल्याला नागाचे अंकण त्यांच्या किरीटावर, गळ्यामध्ये तसेच हातामध्ये केले असल्याचे पहायला मिळते.

          तर करवीर निवासिनी श्री देवी अंबाबाई यांनी नागाला आपला भाऊ मानला आहे. तु माझा थोरला भाऊ आहेस आणि तुझी जागा माझ्या डोक्यावर आहे असे म्हणून अंबाबाईने त्याला आपल्या मुकुटावर विराजमान केले आहे. त्यामुळेच श्री अंबाबाईच्या मुकुटावर आपल्याला नागाचे अंकण केलेले दिसते. श्री देवी अंबाबाईने नागाला आपला भाऊ मानल्यानेच नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया भावासाठी उपवास करत असतात.

          कसबा बीड ही शिलाहारांची राजधानी म्हणून पूर्वापार प्रसिद्ध आहे. कोल्हापूर शिलाहार राजवंशाच्या काळात कसबा बीड (तत्कालीन तीरवाडबीड) येथे शिलाहारांचा लष्करी तळ होता. शिलाहार राजे काही काळ येथे वास्तव्यास होते. याच काळात श्री महादेव आणि श्री देवी अंबेचे निस्सीम भक्त असणाऱ्या शिलाहारांनी कसबा बीड गावात अनेक शिव-अंबेची मंदीरे उभारली तसेच अनेक मूर्तीदेखील घडवल्या होत्या. यासोबतच त्यांच्या काळात गावात अनेक नागदेव मंदीरे उभारण्यात आली होती तसेच नागदेवांच्या मूर्ती घडवण्यात आल्या होत्या.

          कसबा बीड गावातील अनेक ठिकाणी अशा मूर्ती पहायला मिळतात. गावच्या वेशीवर असणाऱ्या गाव मारूती मंदीराच्या प्रवेशद्वारावरच एक पाच फणी नागाची मूर्ती दिसते. अशाच प्रकारची  पाच फणी नागाची मूर्ती कसबा बीडचे ग्रामस्थ सुहास यादव यांच्या घराच्या परसबागेत पहायला मिळते. गावचे ग्रामदैवत श्री बीडेश्वर मंदीराच्या मागे एक नाग मूर्ती बसवण्यात आली आहे. तर श्री अंबाबाई मंदीरात शेषनागाची सुबक मूर्ती पहायला मिळते. तसेच गावातील आंभिरा तरूण मंडळ, खांडेकर गल्लीच्या चौकात सात फणी नागाची मूर्ती पुजली जाते. येथुन जवळच असणाऱ्या समाज मंदीराच्या मागे एक नाग मूर्ती आढळते. भैरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजाराम वरूटे यांच्या मळ्यात देखील अशीच एक मूर्ती पहायला मिळते. याशिवाय गावातील अनेक महादेव मूर्ती, गणेश मूर्ती तसेच जैन मुनींच्या मूर्तींवर नागांचे अंकण दिसते.

           कसबा बीड या गावात अनेक प्रकारची सोन्याची नाणी वेळोवेळी सापडत असतात. यासोबतच गावातील अनेकांना सोन्याच्या नाग मुद्रा सापडल्या आहेत. यामध्ये जबडा उघडुन आक्रमक आवाशात असणाऱ्या नागाची मुद्रा, फणा काढून वेटोळे घातलेल्या नागाची मुद्रा यांचा समावेश होतो.

          या सर्व मूर्ती तसेच मुद्रांसोबत गावात नाग देवाबद्दल काही अख्यायिका देखील प्रचलित आहेत. यातील एक म्हणजे सोन्याचा जिवंत नाग. कसबा बीडचे ग्रामदैवत श्री बीडेश्वर महादेव मंदीर आवारात एक सोन्याचा नाग वर्षानुवर्ष राहतो जो या संपूर्ण परिसरात मुक्त संचार करत असतो असे मानले जाते. नशीबवानालाच जशा सुवर्ण मुद्रां सापडतात त्या प्रमाणेच हा सुवर्ण नाग देखील फक्त नशीबवान व्यक्तिलाच दिसतो अशी अख्यायिका प्रसिद्ध आहे.

           गेली शेकडो वर्ष कसबा बीड हा आपला ठेवा जपत आहे. आपल्या प्रथा परंपरांना नव्याने उजाळा देत त्यांना पाळत आहे. श्री देवी अंबाबाई जशी आपल्या भावासाठी नागपंचमीला उपवास करते त्याचप्रमाणे गावातील स्त्रीया आपल्या भावासाठी उपवास करत असतात. श्री महादेवाचा सखा आणि श्री अंबेचा थोरला भाऊ म्हणजेच नागाची नागपंचमी दिवशी वरील सर्व ठिकाणी मनोभावे पुजा केली जाते.


भैरी येथील नागदेव मूर्ती


श्री अंबाबाई मंदिरातील शेषनाग मूर्ती


श्री गाव मारूती मंदिरासमोर असणारी पाच फणी नागदेव मूर्ती


समाज मंदीराच्या मागील नागदेव मूर्ती


आंभिरा तरूण मंडळ, खांडेकर गल्ली येथील सात फणी नागदेव मूर्ती


सुहास यादव यांच्या परस बागेतील पाच फणी नागदेव मूर्ती


श्री बीडेश्वर महादेव मंदिरातील नागदेव मूर्ती


जबडा उघडुन आक्रमक आवाशात असणारी नाग मुद्रा


वेटोळे घातलेली अलंकारिक नाग मुद्रा


फणा काढून उभारलेली नाग मुद्रा


श्री महादेवांच्या मुकुटावर विराजमान नागदेव


श्री बीडेश्वर महादेवांच्या हाती नागदेव



सुरज संजय तिबीले
यंग ब्रिगेड सुवर्ण राजधानी कसबा बीड
मो. नं. 9503973234

Monday, 29 July 2024

गाव म्हाई आणि श्री देवी मरगाई (कसबा बीड)

 



कसबा बीड गावास हजारो वर्षांचा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा लाभला आहे. अनेक ऐतिहासिक मंदीरे, वीरगळ, शिल्प, सोन्याचा पाऊस, विविध अख्यायिका यासाठी कसबा बीड प्रसिद्ध आहेच पण येथे पूर्वापार चालत आलेल्या प्रथा परंपरांसाठी देखील कसबा बीड ओळखले जाते. अशीच एक परंपरा म्हणजेच गावाची म्हाई. म्हाई म्हणजे एखाद्या देवतेला कौल लावून अथवा गाऱ्हाण्यापोटी किंवा नवस म्हणून बळी अर्पण करणे होय. साधारण पावसाळ्याच्या सुरूवातीस गाव पातळीवर निर्णय घेवुन आषाढी एकादशीनंतर येणाऱ्या दुसर्‍या मंगळवारी गावची मुख्य म्हाई आयोजित केली जाते. आषाढी एकादशी ते श्रावण मासारंभ या दरम्यानच्या पंधरवड्यात गावात एकूण तीन म्हाई केल्या जातात. यांत सुरूवातीस गल्ली म्हाई त्यानंतर गाव म्हाई आणि नंतर दत्तुंड्याची म्हाई याचा समावेश होतो.

          श्री दत्तुंडा मंदीरास एक वेळ तर गावची लोकदेवता श्री देवी मरगाईस दोन वेळा बळी अर्पण केले जातात. या मरगाई देवीस पार्वतीचा अवतार मानले जाते. महाराष्ट्राच्या अनेक गावखेड्यांच्या वेशीवर मरगाईची मंदिरे असलेली आढळतात. देवी मरगाईस रोग नाशक, जंतू विनाशक देवी मानले जाते. मरगाईच्या कृपेने पुरामार्फत किंवा पावसाळ्यात उद्भवणारे विविध सांसर्गिक रोग गावच्या वेशीवरच नष्ट व्हावेत आणि त्यांची बाधा गावातील लोकांना होऊ नये यासाठी या देवीचे स्थान हे गावाच्या वेशीवर असते.

          कसबा बीड गावाच्या वेशीवर देखील श्री देवी मरगाईचे प्राचीन मंदीर आहे. गल्ली म्हाई आणि गाव म्हाई दिवशी मरगाई देवीस बळी अर्पण केले जातात. देवीचा दही भाताचा नैवेद्य गावच्या वेशीवर टाकला जातो आणि रक्त पिपासिनी मरगाई देवी रक्ततीलक लावून आमच्या गावाचे रोगांपासून रक्षण कर असे गाऱ्हाणे देवीसमोर मांडले जाते. तर दत्तुंड्याच्या म्हाईला श्री दत्तुंडा देवास गावातील जनावरांचे सांसर्गिक रोगापासून रक्षण व्हावे यासाठी बळी अर्पण केले जातात. कसबा बीड गावात तिन्ही बाजूंनी नदीचा वेढा आहे. पावसाळ्याच्या दिवसात गावाला पुराचा वेढा पडतो. यातुन गावात अनेक रोग पसरू नयेत त्यापासुन गावातील लोकांचे, जनावरांचे रक्षण व्हावे म्हणून कसबा बीड गावात ही प्रथा पूर्वापार चालत आली आहे.



सुरज संजय तिबीले

यंग ब्रिगेड सुवर्ण राजधानी कसबा बीड

मो. नं. 9503973234

Friday, 15 April 2022

सुवर्णराजधानी कसबा बीड गाव मारूती


         तुळशी आणि भोगावती नद्यांच्या संगम तीरी वसलेले कसबा बीड हे गाव. या गावाला हजारो वर्षांचा सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारसा लाभलेला आहे. कोल्हापूरच्या शिलाहार राजवंशाचे लष्करी ठाणे आणि प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ असणाऱ्या ह्या कसबा बीड आज अनेक प्राचीन मंदिरे, शिल्प, शिलालेख आढळतात. शिलाहार कालीन समृध्द कसबा बीडच्या पाऊलखुणा आपल्याला पदोपदी पाहण्यास मिळतात. 


            आज हनुमान जन्मोत्सवानिमित्त आपण दर्शन घेणार आहोत गावातील अशाच प्राचीन गाव मारुतीचे. तुळशी-भोगावती संगम ओलांडुन गावात प्रवेश केल्या नंतर आपल्याला प्रथम गाव मारुतीचे मंदिर लागते. हे मंदिर साधे कौलारू स्वरूपाचे असले तरी मारुतीची मूर्ती मात्र वैशिष्ट्यपूर्ण आहे. चपेटदान मुद्रेत उभ्या असणाऱ्या या मारुतीच्या पायाखाली राक्षसी दाखवण्यात आली आहे. ही राक्षसी म्हणजेच पणवती किंवा साडेसाती होय. असा मारुती साडेसातीचे नियंत्रण करतो, तिचा नाश करतो अशी पुर्वापार श्रद्धा आहे. या मारुतीचा वरचा हात हा आशिर्वादासाठी नसुन तो चापट मारण्यासाठी उगारला आहे. चापट मारण्याच्या आवेशात असणारा हा मारुती आपल्या सर्व अडचणी, दुःख दुर करतो असे मानले जाते. गावच्या वेशीवर असणारा मारुती गावचे, गावकऱ्यांची पणवती पासुन सुटका करतो आणि गावचे रक्षण करतो अशी धारणा कसबा बीड गावात प्रचलित आहे. या मंदिराशिवाय गावातील शिवयोगी सदालाल महाराज मठ, त्रिमूर्ती गणेश मंदिर या मंदिरात देखील अशा चपेटदान मुद्रेतील मूर्ती आढळतात.




           या गाव मारुती मंदिरामध्ये एक शिवलिंग, नंदी यांची स्थापना केल्याचे दिसते.  मंदिराच्या बाहेर भिंतीला लागून पाच फणी नागांचे एक सुंदर शिल्प आहे. याच्या शेजारी नऊ चेहरे असणारा एक पाषाणपट्ट ठेवण्यात आला आहे. हे नऊ चेहरे म्हणजे नवग्रह आहेत अशी मान्यता गावात प्रसिद्ध आहे. तर काहींच्या मते हे शिल्प म्हणजे बावीस नक्षत्रांचे प्रतीक असणाऱ्या बावीस चेहऱ्यांच्या सलग पाषाणपट्टाचा एक भाग आहे. असेच एक शिल्प शिवयोगी सदालाल महाराज मठ येथे आढळते. मारुती मंदिरासमोर पार असुन गावातील अबालवृध्दांच्या सोयीसाठी येथे बाक टाकण्यात आले आहेत.







            गावातील इन्कलाब तरूण मंडळातर्फे ह्या मंदिराचे सर्व व्यवस्थापन पाहिले जाते. 2014-15 या वर्षात मंडळ आणि ग्रामस्थांच्या पुढाकाराने या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिरात नित्य पुजा अर्चा, आरती इ. गोष्टी मंडळाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ करत असतात. प्रती वर्षी हनुमान जन्मोत्सवानिमित्त मंदिरात किर्तन, प्रवचन यांचे आयोजन केले जाते. अपार भक्तिभावाने आणि प्रचंड उत्साहात रामनामाच्या गजरात गावात हनुमान जयंती साजरी केली जाते.


संदर्भ - 

कसबा बीड एक ऐतिहासिक नगर

          : डाॅ. आनंद दामले.




सुरज संजय तिबीले

यंग ब्रिगेड सुवर्णराजधानी कसबा बीड

मो. नं. : 9503973234

ईमेल आयडी : tibilesuraj7@gmail.com

श्री बीडेश्वर महादेव महाशिवरात्री पालखी सोहळा

 

शिवस्वरूपिनी तुळशी नदी आणि पाताळगंगा भोगावती यांच्या पवित्र रूद्रप्रयाग संगम तिरी वसलेली प्राचीन सुवर्ण नगरी म्हणजे कसबा बीड. या कसबा बीड गावास हजारो वर्षांचा समृद्ध इतिहास लाभला आहे. येथील मंदीरे, वीरगळ आणि सुवर्णमुद्रा यामुळे हे गाव नेहमीच चर्चेत राहिलेले आहे. शिलाहार काळात हे बीड गाव तीरवाडबीड या नावाने उदयाला आले. तीरवाड याचा अर्थ नदी काठी वसलेले गाव असा होतो. तर बीड यातुन लष्करी तळ असा अर्थ प्रतीत होतो. आज हे गाव आकाराने लहान वाटत असले तरी शिलाहार काळात याचा विस्तार आजच्या कोगे, महे, आरे, सावरवाडी, गणेशवाडी आणि बहिरेश्वर या गावांच्या इतका मोठा होता. पुर्वी या सर्व गावांचा समावेश या तीरवाडबीड नगरातच होत असे. कसबा बीड सह पंचक्रोशीत कसबा बीडास भोज राजाची राजधानी म्हणून ओळखले जाते. शिलाहार राजा भोज यांनीच प्रथम आपला लष्करी तळ तीरवाडबीड येथे स्थापन केल्याचे मानले जाते.



           या राजा भोज यांनी तीरवाडबीड नगरात अनेक इमारती तसेच मंदिरांची उभारणी केली. आरे येथील हरेश्वर मंदीर, बहिरेश्वर मधील कोटेश्वर मंदीर तसेच कसबा बीड मधील बीडेश्वर मंदीर हे त्यापैकीच काही प्रमुख मंदीरे. आज महाशिवरात्री निमित्त आपण दर्शन घेणार आहोत कसबा बीड मधील बीडेश्वर मंदीराचे.  या कसबा बीड गावच्या मध्यभागी हे बीडेश्वर मंदीर स्थित आहे. या मंदीराच्या निर्मिती बाबत ठोस पुरावा उपलब्ध नसला तरी मौखिक अख्यायिकां नुसार शिलाहार राजा भोज यांच्या काळातच मंदीर निर्माण करण्यात आल्याचे मानले जाते. श्री बीडेश्वर महादेव मंदीरास प्रशस्त परिसर लाभला आहे. या परिसरात सभोवती अनेक वीरगळ तसेच शिल्प ठेवण्यात आली आहेत तर मध्यभागी पुर्वाभिमुख बीडेश्वराचे प्राचीन मंदीर आहे. महाशिवरात्री तसेच नवरात्री काळात या मंदीराला विशेष महत्त्व आहे. मंदिराचे प्राचीनत्व आणि महात्म्य ओळखून अनेक भक्तगण दर्शनासाठी येथे येत असतात.



          महाशिवरात्री म्हणजे श्री शंकराच्या उपासनेचा दिवस. कसबा बीड या गावच्या प्राचीन बीडेश्वर मंदिरातही अपुर्व उत्साहाने हा सण साजरा केला जातो. महाशिवरात्रीच्या सात दिवस अगोदर मंदीरामध्ये पारायन, प्रवचन कीर्तन आयोजित केले जाते. सकाळी सात ते अकरा या वेळेत पारायण तर संध्याकाळी पाच ते आठ प्रवचन, कीर्तनाचे आयोजन केले जाते. तत्पूर्वी पारायणाच्या सुरूवातीला अखंड हरिनाम गजरात वीणा स्थापन केला जातो. पारायणाचे सातही दिवस अखंड वीणावादन मंदीरात सुरू राहते. अनेक भक्तगण फेरपालट करून आपली सेवा श्री बीडेश्वरास अर्पन करतात. हे सातही दिवस श्री बीडेश्वर महादेव मंदीर भक्तीरसात न्हाऊन निघते.



          कसबा बीड मधील महाशिवरात्रीचे मुख्य आकर्षण म्हणजे श्री बीडेश्वर पालखी सोहळा. सकाळी दुग्धाभिषेक आणि आरती झाल्या नंतर श्री बीडेश्वराची मुकुट-मुर्ती पालखीत विराजमान होते. असंख्य भाविकांच्या उपस्थितीत आणि हर हर महादेव च्या गजरात पालखी नगर प्रदक्षिणेसाठी प्रस्थान करते. श्री बीडेश्वर पालखीचा मान असणार्या कसबा बीड च्या मानकर्यांच्या गराड्यात पालखी मंदीराबाहेर पडते. प्रवेशद्वाराजवळ मुख्य रस्त्यावर प्रथम पालखी थांबते. सर्व प्रथम वाद्यं, मग वारकरी आणि शेवटी पालखी असा शिस्तबद्ध क्रम केला जातो. नंतर श्री शंकराची आरती होवुन हर हर महादेव च्या गजरात आणि गुलाल खोबर्याच्या उधळणीत पालखी मार्गस्थ होते. वाद्यांच्या निनादात आणि वारकरी संप्रदायाचा अखंड हरिनाम जप यांत श्री बीडेश्वराची पालखी तुळशी-भोगावती नद्यांच्या रूद्रप्रयाग संगम स्थळी पोहोचते. येथे असणार्या चबुतर्यावर ही पालखी विराजमान होते.



         संगम स्थळी पोहोचल्या नंतर श्री बीडेश्वर आणि महेची श्री भैरव यांची भेट होते.  या भेटीनंतर रूद्रप्रयाग संगमाच्या पवित्र पाण्याने उत्सव मुर्तीस जलाभिषेक केला जातो. तद्नंतर आरती होवुन हर हर महादेव च्या ओरोळीत श्री बीडेश्वर पालखी मंदीरासाठी प्रस्थान करते. प्रचंड वेगाने पालखी मंदीरामध्ये येते. असंख्य भाविक आणि वाद्यांच्या गजरात पालखीचे स्वागत होते. संपूर्ण मंदीराच्या धावत्या प्रदक्षिणे नंतर पालखी मंदिरासमोर येते. महादेवाची आरती आणि पालखी पुजनानंतर श्री बीडेश्वर पालखी मंदीर प्रवेश करते. मंदीराच्या सभा मंडपामध्ये पालखी आसनस्थ होते.



          महाशिवरात्रीच्या दिवशी सायंकाळी यंग ब्रिगेड सुवर्णराजधानी कसबा बीड च्या मार्फत श्री बीडेश्वर महादेव मंदीरात दिपोत्सवाचे आयोजन केले जाते. यावेळी हजारो दिव्यांनी मंदीर परिसर उजळून निघतो. तसेच यांतुन रांगोळीच्या माध्यमातून समाजोपयोगी संदेश देण्याचे कार्य यंग ब्रिगेड करत असते. हा दिपोत्सव म्हणजे श्री बीडेश्वर महादेव भाविकांसाठी पर्वनी ठरतो. महाशिवरात्रीच्या दुसर्या दिवशी सप्ताहाने पारायनाची आणि अखंड वीणा वादणाची सांगता केली जाते. गावातील मानकरी तसेच भाविकांच्या दानातुन सप्ताहाचे आयोजन केले जाते. याचा अनेक भाविक आस्वाद घेतात. या संपुर्ण काळात गावातील अनेक तरूण मंडळे आणि स्वयंसेवक भाविकांच्या सेवेसाठी सतत कार्यरत असतात.





सुरज संजय तिबीले

यंग ब्रिगेड सुवर्णराजधानी कसबा बीड

मो. नं. : 9503973234

ईमेल आयडी : tibilesuraj7@gmail.com

सुवर्णराजधानी कसबा बीड देवी दर्शन


              कोल्हापूरच्या शिलाहार राजवंशाच्या वरदहस्ताने तुळशी भोगावती तीरी कसबा बीड हे समृद्ध नगर साकारले. शिलाहाराचा लष्करी तळ आणि व्यापारपेठे म्हणून ते नावारुपाला आले. शिलाहार राजांनी या पावन भुमीवर आपले वास्तव्य केले आणि याच काळात त्यांनी गावात अनेक मंदिरांची उभारणी केली. शिलाहार राजे हे शक्तीचे उपासक. श्री महालक्ष्मी हे त्यांचे आराध्य दैवत. तसेच हिंदु, जैन संस्कृती मधील अनेक देवी देवतांचे ते पुजक होते. याचे प्रतीक म्हणजे आज गावात आढळणाऱ्या अनेक देवींची शक्तीस्थाने. आज आपण माहिती घेणार आहोत या कसबा बीड मधील देवींच्या विषयी.


● श्री देवी रेडेलक्ष्मी ●


           देवी रेडेलक्ष्मीस गावची आद्य देवता मानले जाते. काही वर्षांपूर्वी बीडच्या मुख्य रस्त्याला लागून असणाऱ्या एका शेतात देवीचे एक मोठे देवालय अस्तित्वात होते. पण काळाच्या ओघात हे मंदिर नष्ट झाले आणि आज एका लहानशा मंदिरात रेडेलक्ष्मी विराजमान आहे. या लहान मंदिराजवळ प्राचीन मंदिराचे अनेक अवशेष आजही अस्तित्वात आहेत. या मंदिरात दोन खंडीत शिल्पे आणि एक खंडीत वीरगळ ठेवण्यात आले आहेत. या शिल्पांपैकी एका शिल्पावर श्रीदेवी रेड्यावर आरूढ असल्याचे शिल्पांकन दिसते. यामुळेच या देवी रेडेलक्ष्मी हे नाव प्राप्त झाले असावे. पूर्वी कसबा बीड गावातील कोणत्याही सार्वजनिक समारंभापूर्वी गावदेवींना बळी देण्याची प्रथा रूढ होती. त्याचप्रमाणे रेडेलक्ष्मीस गाव पाटलानमार्फत रेड्याचा बळी दिला जात असे. गावाचे कल्याण व्हावे, धनधान्य विपुल पिकावे, गाव विविध रोगांपासुन रक्षण व्हावे यासाठी रेडेलक्ष्मीस हा बळी अर्पण केला जात असे. याशिवाय लक्ष्मीला कौल लावुन नैवेद्य अर्पण केले जातात. आज गावातील कांबळे परिवार या देवीची व्यवस्था पाहत आहे.

कसबा बीड ग्रामदेवता रेडेलक्ष्मी


● श्री देवी मरगाई ●


          गावची आणखी एक लोकदेवता आहे श्री देवी मरगाई. मरगाई देवीस पार्वतीचा अवतार मानले जाते. महाराष्ट्राच्या अनेक गावखेड्यांच्या वेशीवर मरगाईची मंदिरे असलेली आढळतात. कसबा बीड गावात देखील वेशीवरच देवी मरगाईचे मंदिर आहे. देवी मरगाईस रोग नाशक, जंतू विनाशक देवी मानले जाते. मरगाईच्या कृपेने बाहेरून येणारे विविध सांसर्गिक रोग गावच्या वेशीवरच नष्ट व्हावेत आणि त्यांची बाधा गावातील लोकांना होऊ नये यासाठी या देवीचे स्थान हे गावाच्या वेशीवर असते. कसबा बीड गावात पावसाळ्याच्या सुरुवातीस मरगाई देवीस बळी अर्पण केले जातात. देवीचा दही भाताचा नैवेद्य गावच्या वेशीवर टाकला जातो आणि रक्त पिपासिनी मरगाई देवी रक्ततीलक लावून आमच्या गावाचे रोगांपासून रक्षण कर असे गाऱ्हाणे देवीसमोर मांडले जाते. कसबा बीड गावात ही प्रथा पूर्वापार चालत आली आहे.

कसबा बीड ग्रामदेवता मरगाई


● श्री देवी तामजाई ●


         गणेश तलाव परिसरामध्ये देवी तामजाईचे स्थान आहे. तांबजाईचे मंदिर लहान असून या मंदिरामध्ये एका पाषाणाला तामजाईच्या रूपात पूजले जाते. जनावरांना एखादा आजार झाल्यास किंवा जनावरांना तांबवा सारख्या परजीवी कीटकांचा प्रादुर्भाव झाल्यास या देवीस कापूर लावून तिचा अंगारा जनावरास लावल्यास अशा कीटकांपासून सुटका मिळते अशी अख्यायिका गावात रुढ आहे. ह्या तामजाई मंदिराच्या परिसरामध्ये काही वीरगळ ठेवण्यात आल्या आहेत.

कसबा बीड ग्रामदेवता तामजाई


● श्री देवी अंबाबाई ●


          शिलाहार राजधानी कसबा बीडच्या मुख्य चौकाच्या  उत्तरेला थोड्या अंतरावर एक तलाव आढळतो. या तलावाकाठी देवी अंबाबाईचे एक जुने मंदीर उभे आहे. या तलावाला लक्ष्मी तलाव किंवा लक्ष्मी जलाशय म्हणून ओळखले जाते. मंदिराच्या बाजुने या तलावात उतरण्यासाठी पायऱ्यांचा घाट बांधलेला आहे. अंबाबाई मंदिराचा आज पर्यंत तीन वेळा जीर्णोद्धार झाला आहे. काही वीरगळीं सोबतच प्राचीन अंबाबाई मंदिराचे काही अवशेष आजही या मंदिर परिसरामध्ये पाहण्यास मिळतात. यंग ब्रिगेडने यापैकी काही अवशेष पुन्हा प्रकाशात आणले आहेत. मंदिरात देवी अंबाबाई बरोबरच विष्णू आणि अनंत नागाची मूर्ती ठेवण्यात आली आहे. देवी अंबाबाईची मूर्ती समभंगातील असून तिने गदा, ढाल पानपात्र अशी आयुधे धारण केली आहेत. ही मूर्ती कोल्हापूरच्या अंबाबाई प्रमाणेच असली तरी महाळुंगाच्या जागी देवीने हातात मोदक घेतलेला आहे. हे मंदिर बीडच्या प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. कोल्हापूरच्या अंबाबाईला आपली आराध्य देवता मानणाऱ्या शिलाहारांनी आपली राजधानी असणाऱ्या कसबा बीडमध्ये अंबाबाईचे मंदिर उभारल्याचे मानले जाते. त्यामुळे या मंदिरास कोल्हापूरच्या अंबाबाईचे एक पीठ म्हणून गावात मान्यता आहे.

          गावात श्री देवी अंबाबाई श्री बीडेश्वर महादेवची पत्नी म्हणून पूजले जाते. या देवी बाबत गावात एक अख्यायिका रूढ आहे. नवरात्री काळात आपला योग्य तो मान राखला गेला नाही म्हणून भगवान बीडेश्वरावर नाराज होऊन देवी अंबाबाई ही मुख्य मंदिरातून आता असणाऱ्या लक्ष्मी तलावाकाठी जाऊन विराजमान झाल्या आणि तिथेच त्यांनी आपले स्थान निर्माण केले. ही बाब जेव्हा श्री बीडेश्वरांना समजली तेव्हा ते आपल्या सर्व लवाजम्यासह देवी अंबाबाईची समजुत काढण्यासाठी त्यांच्या दारी गेले. देवी अंबाबाईनी बीडेश्वरांना प्रती वर्षी नवरात्रीस माझ्या दारी येवुन मला सन्मानाने घेवुन जाण्याची अट घातली. श्री बीडेश्वरांनी देखील पत्नीच्या शब्दाचा मान ठेवता ती अट मान्य केली आणि त्यांची समजुत घालुन देवींना नवरात्री उत्सव काळात आपल्या सोबत पालखीचा मान दिला. आपला शब्द राखत प्रती वर्षी शारदीय नवरात्री काळात अश्विन शुद्ध पंचमीला आणि अश्विन शुद्ध अष्टमी जागराला स्वतः श्री बीडेश्वर महादेव आपल्या पत्नीला आणण्यासाठी संपूर्ण लव्याजमासह तिच्या दारी जातात. त्यानंतरच देवी अंबाबाई आपल्या पालखीतुन बीडेश्वर महाली प्रस्थान करतात. पंचमी आणि अष्टमीला देवी उत्सव संपन्न झाल्यानंतर त्या माघारी जातात.

          खंडेमहानवमीला प्रथम देवी अंबाबाई यांचे आगमन होते. आपल्या पत्नीच्या प्रतिक्षेत असणारे श्री बीडेश्वर महादेव देवींन सामोरे गेल्या नंतर दोन्ही पालखी रूद्रप्रयाग संगमी जलाभिषेकास प्रस्थान करतात. अखंड हरिनाम गजरात हे पती पत्नी एकत्र बीडेश्वर महाली परत येतात. खंडेमहानवमीला देवी अंबाबाई ह्या बीडेश्वर महाली मुक्काम करतात आणि दुसऱ्या दिवशी सीमोलंघन झाल्यानंतर त्या श्री बीडेश्वरांचा निरोप घेऊन आपल्या स्थानी परत जातात.

          अशी ही पती पत्नीच्या निस्वार्थ प्रेमावर आधारित आख्यायिका गेली अनेक दशके कसबा बीड गावात प्रचलित आहे. वर्षानुवर्षे देवी अंबाबाई श्री बीडेश्वर महादेवां इतकाच आदर राखला जातो आहे. या देवी अंबाबाईच्या पालखीचा मान हा गावातील आंबी आणि सुतार या परिवारांकडे वर्षानुवर्षे परंपरागत चालत आला आहे. तर पूजेचा मान हा गावातील गुरव परिवार आणि शहाजी सूर्यवंशी यांच्या परिवाराकडे आहे. प्रत्येक वर्षी नवरात्रीचे नऊ ही दिवस देवीची अलंकारीत पूजा मांडण्यात येते.

                श्री बीडेश्वर मंदिराच्या डाव्या बाजूला असणाऱ्या लहान शिवमंदिरात एका चबुतऱ्यावर तीन शिल्प विराजमान आहेत. यातील उजव्या बाजूची मूर्ती ही श्री करवीर निवासिनी अंबाबाईची समभंगातील प्रतिकृती आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई प्रमाणेच महाळुंग, गदा, खेटक व पानपात्र धारण करणारी ही चतुर्भुज मूर्ती गावात खोकळूबाई म्हणून ओळखली जाते. लहान मुलांना खोकला झाल्यावर त्यावर उपाय म्हणून तिच्यासमोर कापूर लावून तिचा अंगारा लहान मुलांना लावला जातो. करवीर निवासिनी अंबाबाईच्या खूप कमी प्रतिकृती आज उपलब्ध आहेत. यापैकी एक कसबा बीड गावात असणे ही गावासाठी अभिमानाची बाब आहे.

श्री देवी अंबाबाई


● आदिशक्ती देवी पार्वती ●


            देवी पार्वती या हिमालय व मेना यांच्या कन्या आणि भगवान शंकराची पत्नी म्हणून प्रसिद्ध आहेत. सिंह वाहन असणाऱ्या पार्वती देवींना अंबिका, उमा, गौरी, ईश्वरी, भैरवी, काली, दुर्गा, कात्यायनी, चामुंडा, भवानी इत्यादी नावाने देखील ओळखले जाते. या देवींना आपण त्यांचे अवतारी रूप मानतो. कार्तिकेय, गजानन हे देवींचे पुत्र असून बाण व वीरभद्र यांनाही त्यांनी आपले पुत्र मानले आहे. आदिशक्ती देवी पार्वतींची स्वतंत्र मंदिरे अत्यल्प आहेत. देवी पार्वतींच्या स्वतंत्र मुर्तीस चतुर्भुज तर शिवशंकरा सोबत त्यांना द्विभुज दाखवले जाते.

          अशाच अनेक द्विभुज पार्वतीच्या मूर्ती कसबा बीड गावात आढळतात. श्री बीडेश्वर महादेव मंदिर प्राकारात प्रवेश करताच डाव्या बाजूला आपल्याला एक उमामहेश्वराचे शिल्प दिसते. हे शिल्प खंडित असले तरी उपलब्ध भागाचे कोरीव काम अतिशय उत्तम आहे. हा खंडीत भाग पाहता संपूर्ण मूर्ती ही साधारण पाच फूट असावी असा अंदाज वर्तवला जातो. यानंतर मुख्य मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला गाभार्‍यात एक अलिंगण मुद्रेतील उमाशंकराचे शिल्प दिसते. या शिल्पात चतुर्भुज भगवान शिवशंकरांच्या डाव्या बाजूला देवी पार्वतींना दाखवण्यात आले आहे. श्री शंकरांनी आपला डावा हात उमाच्या कमरेभोवती ठेवला असून त्यांच्या माना एकमेकांकडे झुकल्या आहेत. या शिल्पाच्या खाली नंदी विराजमान झाले आहेत. मुख्य मंदिराच्या शेजारी असणाऱ्या लहान शिव मंदिरामध्ये एका चबुतऱ्यावर तीन पुरातन शिल्प आढळतात. त्यांच्या मध्यभागी एक आलिंगन मुद्रेतील उमामहेश्वराचे यांचे शिल्प आहे. या शिल्पावर शिवपार्वती, गजानन, कार्तिकेय आणि नंदी असा शिव परिवार दर्शविण्यात आला आहे. अशा प्रकारच्या काही मूर्ती रानबाव या ठिकाणी देखील आढळून येतात. हजारो वर्षे उन वारा झेलणाऱ्या या मूर्ती आता जीर्ण झाल्या आहेत.

श्री देवी पार्वती


● श्री देवी गजलक्ष्मी ●


           गजलक्ष्मी ही अशी देवता आहे जी बौद्ध, जैन आणि हिंदू संस्कृती मध्ये पूजनीय आहे. बौद्ध संस्कृतीमध्ये या देवाचा संबंध हा गौतम बुद्धांच्या जन्मासोबत जोडला गेला आहे. तर हिंदु संस्कतीत ही अष्टलक्ष्मींपैकी एक असुन हत्तींसह असणारी, कमळात बसलेली लक्ष्मी म्हणून हिला गजलक्ष्मी असे संबोधले जाते. कमलासनावर बसलेली देवी, तिच्या दोन बाजूंना दोन उभे हत्ती, त्यांच्या सोंडेमधे पाण्याने भरलेल्या दोन घागरी, ते हत्ती घागरीमधले पाणी देवीच्या डोक्यावर ओतत आहेत असे शिल्प आपल्याला अनेकदा बघायला मिळते. हिलाच अभिषेकलक्ष्मी अथवा गजलक्ष्मी असे संबोधले जाते. लक्ष्मी, हत्ती ही संपत्ती, ऐश्वर्याची प्रतीके मानली गेली आहेत. तद्वत लक्ष्मीचा पृथ्वीशी आणि हत्तींचा मेघाशी संबंध जोडलेला बघायला मिळतो. गजलक्ष्मीच्या शिल्पांकणाची प्राचीनता बौद्ध काळापर्यंत मागे जाते. कुषाण काळापासून राष्ट्रकुट, शिलाहार, कलचुरी ते थेट यादव काळापर्यंत सर्वच राजकुलांनी गजलक्ष्मीला उपास्य दैवत मानले. राष्ट्रकुटांची तर ती राजचिन्हावर स्थानापन्न झालेली देवी होती.

          या राष्ट्रकुटांचे मांडलिकत्व पत्करून उदयाला आलेल्या शिलाहार राजवंशाला देखील गजलक्ष्मीस आपले आद्य दैवत मानले आहे. शिलाहार शासित राज्यावर राष्ट्रकुटांचा विशेष प्रभाव होता. या शिलाहारांची राजधानी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कसबा बीड गावात राष्ट्रकुट राजवटीच्या राजचिन्हाचा संकेत करणारे गजलक्ष्मीचे शिल्प आढळते. श्री बीडेश्वर महादेव मंदीराच्या प्राकारात प्रवेश करताच डाव्या बाजुच्या चबुतऱ्यावर हे शिल्प विराजमान आहे. या शिल्पाच्या तळाशी चार परिवार देवातांचे शिल्पाकंण करण्यात आले आहे. या परिवार देवतांमुळे हे शिल्प गावात सापडणाऱ्या इतर गजलक्ष्मी शिल्पांपेक्षा वेगळे आहे हे लक्षात येते.

          श्री बीडेश्वर महादेव मंदीराच्या आग्नेयेला असणाऱ्या ज्ञानेश्वर मंडपात गावातील सर्वात मोठे गजलक्ष्मीचे शिल्प आढळते. स्थानिक भाषेत या देवीला भावेश्वरी किंवा भावकाई  या नावाने ओळखले जाते. या शिल्पावर देवी पद्मासनात बसलेली असून ती द्विभुजा आहे. तिच्या दोन्ही हातात कमळाच्या कळ्या आहेत. देवीच्या मस्तकावर किरीट गळ्यात एक लहान व एक मोठी अशा दोन माळा, पायात तोडे असे अलंकार आहेत. मूर्तीच्या दोन्ही बाजूंना स्तंभावर उभे असलेले हत्ती देवीच्या मस्तकावर कलशातून अभिषेक करत आहेत. प्रतिवर्षी उत्तम पाऊस व्हावा आणि शेतीला चांगले पीक यावे यासाठी देवीची आराधना केली जाते. साधारण जून महिन्यात पेरणीच्या दिवसात आणि जुलै महिन्यात देवीला नैवेद्य अर्पन केला जातो. या नैवेद्यास भावीचा नैवद्य असे म्हणले जाते. गावात गजलक्ष्मीची अशी शिल्पे अनेक ठिकाणी आढळतात यापैकी चव्हाण पानंद येथील विस्मृतीत गेलेले देवीचे स्थान यंग ब्रिगेडने पुन्हा प्रकाशात आणले आहे.

श्री देवी गजलक्ष्मी


● श्री महिषासुर मर्दिनी ●


          देवी महिषासुर मर्दिनीस असुर राज महिषासुराचा काळ मानले जाते. महिषासुराने जपतप करून देवतांकडुन सदैव अजेय राहण्याचे वरदान प्राप्त केले. या वरदानाच्या बळावर बलशाली महिषासुराने आपल्या राज्याची सिमा थेट देवलोकाला भिडवली. त्याने सुर्य, इंद, अग्नी, वायू, वरूण इत्यादी देवांचा परावभ केला आणि स्वर्ग लोकांवर आपले अधिपत्य स्थापित केले. महिषासुराच्या प्रकोपाला घाबरून ब्रम्ह, विष्णू सहित देवादिकांनी देवी दुर्गेची आराधना केली. सर्व देवांनी आपली शस्त्रे दुर्गेला अर्पण केली आणि देवी दुर्गा सर्व देवांवर प्रसन्न होवून ती पृथ्वी लोकी पोहोचली. महिषासुरा सोबत तीचे नऊ दिवस युद्ध चालले यांत देवीने अनेक अवतार घेतले. दहाव्या दिवशी दुर्गेने महिषासुराचा वध केला आणि ती महिषासुर मर्दिनी ठरली. तिच्या या युध्द विजया प्रित्यर्थच नवरात्री उत्सव साजरा केला जातो. देवी महिषासुर मर्दिनीच्या महिषासुर वधाच्या अनेक प्रतिकात्मक मुर्ती संपूर्ण भारत वर्षात दिसुन येतात.

          शक्ती उपासक शिलाहार राजवंशाची राजधानी असणाऱ्या कसबा बीड गावात देखील अशा अनेक मुर्ती आढळुन येतात. कसबा बीडातील श्री बीडेश्वर महादेव मंदीरालगत असणाऱ्या लहान शिव मंदीरात एका चबुतऱ्यावर तीन मुर्ती विराजमान आहेत. यांत डाव्या बाजुला त्रिभंग अवस्थेतील चतुर्भुज महिषासुर मर्दिनीचे शिल्प आहे. या शिल्पावर देवीचा उजवा पाय महिषासुराच्या पाठीवर असुन डाव्या हाताने त्याचे केस पकडुन उजव्या हातातील त्रिशुळाने तीने त्याच्या मानेवर वार केला आहे, असे शिल्पांकण आहे. अशाच प्रकारची महिषासुर मर्दिनीची दोन शिल्पे गावातील मगदूम कुटुंबाच्या एका छोट्या मंदीरात आढळतात. येथे उजव्या बाजूला त्रिभंग अवस्थेतील तर डाव्या बाजुला समभंगातील चतुर्भुज महिषासुर मर्दिनीचे शिल्प आहे. स्थानिक भाषेत या देवीला तुकाई या नावाने ओळखले जाते. ही तुकाई कसबा बीडच्या ग्रामदेवतांपैकी एक आहे. नवरात्री काळात तुकाईस विशेष मान आहे. गावात या महिषासुर मर्दिनीस तुकाई म्हणण्याचा नेमका उलघडा होत नसला तरी रामायनातील अख्यायिकेप्रमाणे देवी पार्वतीलाच तुकाई मानले जाते.

श्री देवी महिषासुरमर्दिनी


• श्री देवी शारजाई •




          गावातील बेंदाड (पाटील मळा) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी श्री देवी शारजाईचे स्थान आहे. रेडेलक्ष्मी, तुकाई, भावकाई , मरगाई, तामजाई , अशा देवी प्रमाणे देवी शारजाई देखील कसबा बीडच्या मूळ देवतापैकी एक आहेत. प्रति वर्षी देवी शारजाई यांना गावाच्या भरभराटीसाठी नैवेद्य अर्पण केला जातो.



● श्री देवी दुर्गा ●


           दुर्गेला आदिशक्ती पार्वती मातेचाच अवतार मानले जाते. दुर्गा देवीचे वर्णन मुळ शक्ती, प्रबळ स्वभाव, सद्गुण योगमय, बुद्धीची आई आणि विकार नाशक असे केले जाते. ती अंधार आणि अज्ञान नामक राक्षसा पासुन संरक्षण आणि उपकारकर्ता आहे. महान असुर नायक दुर्गामासुराचा निःपात करण्यासाठी देवी पार्वतीने आधी शताक्षीचे रूप धारण केले आणि नंतर तीने शंखधारी शाकंभरी देवीचे रूप घेतले आणि त्यांनी दुर्गामासुराचा वध केला. दुर्गामासुराचा काळ म्हणून देवीस श्री दुर्गा हे नाव प्राप्त झाले आणि ती दुर्गेच्या रूपात पुजले जाऊ लागले. देवी दुर्गा ही सिंहारूढ असुन तिला नेहमी अष्टभुजा दाखवले जाते. तिच्या आठही हातात काही ना काही शस्त्र धारण केलेले आहे.

           दुर्गा हे भगवान शिवाची पत्नी आदिशक्तीचे रूप आणि तिची मुर्ती शक्ती उपासक शिलाहारांच्या राजधानीत नसेल तर नवलच. शिलाहार राजधानी कसबा बीड मध्ये श्री दुर्गेचे समभंगातील अष्टभुजा शिल्प आढळते. श्री बीडेश्वर मंदीर प्राकारात प्रवेश करताच डाव्या बाजुच्या एका चबुतऱ्यावर हे शिल्प ठेवण्यात आले आहे. सदर शिल्प खंडीत असले तरी त्यावरील शिल्पांकण अतिशय सुरेख आहे. या देवीच्या मस्तकावर किरीट, गळ्यात एक लहान व एक मोठी अशा दोन माळा, पायेत तोडे असे देवीच्या अंगप्रत्यंगावरील अलंकार अत्यंत बारकाईने कोरण्यात आले आहेत. देवीच्या पायाशी डाव्या बाजुला गरूड तर उजव्या बाजुला मेंढा यांचे शिल्पांकण करण्यात आले आहे. या शिल्पावरून शिलाहार कालीन कारागिरांचे शिल्पकलेतील कसब लक्षात येते.

श्री देवी दुर्गा


● श्री देवी सरस्वती (गायत्री) ●



          हिंदु संस्कृती मध्ये देवी सरस्वतीस ज्ञान, संगीत, कला, विद्या आणि शिक्षणाची देवी मानले जाते. देवी सरस्वती ही ब्रम्ह देवाची पत्नी असुन ती पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती या त्रिदेवींपैकी एक आहे. तिला शारदा, शतरूपा, विनावादीनी, भारती इत्यादी नावाने देखील ओळखले जाते. देवी सरस्वतीचे वाहन हंस आहे पण जैन पुराणांमध्ये आणि लोककथांमध्ये तिचे वाहन मोर असल्याचे सांगितले जाते. अनेक चित्रांत सरस्वतीस शुभ्र वस्त्रे नेसलेली आणि अनेकदा कमळावर बसलेली दाखवतात.

          देवी सरस्वतीच्या अवतारास गायत्री असे म्हटले जाते. देवी गायत्रीस सावित्री आणि वेदमाता मानले जाते. पुराणात गायत्रीला ब्रह्मदेवाचे दुसरी पत्नी आणि सरस्वतीचा अवतार म्हणून उल्लेख आला आहे. गायत्री देवता प्रातःकाळी बाल्यावस्थेत, माध्यान्ह काळी युवा अवस्थेत व सायंकाळी वृद्धावस्थेत असते. या देवीचेही वाहन हंस असून तिने शंख, चक्र, पद्मा, परशु, गदा, पाश अशी आयुधे धारण केली आहेत.

          ज्ञान, विद्या आणि कलेचे उपासक असणाऱ्या शिलाहारांच्या राजधानीत देखील श्री देवी सरस्वती आणि गायत्री यांच्या स्वतंत्र मूर्ती आढळतात. कसबा बीडच्या मुख्य चौकात श्री ज्योतिबा मंदिरामध्ये एका चबुतऱ्यावर देवी सरस्वती आणि देवी गायत्री या विराजमान आहेत. मंदीरात डाव्या बाजूला सरस्वतीची चतुर्भुज बैठी मूर्ती ठेवण्यात आली आहे. ही मूर्ती साधारण बाराव्या शतकातील असल्याचे मानले जाते. कालौघात मुर्तीची बरीचशी झीज झाली असली तरी त्यावरील कोरीव काम म्हणजे कलेचा अद्भूत नमुना आहे. या शिल्पावर किरीट, अंगावर मोठी माळ, पायात तोडे, हाती विना इत्यादी दर्शविण्यात आले आहे. या मंदीराच्या उजव्या बाजूला देवी गायत्रीची त्रिमुखी मूर्ती ठेवण्यात आली आहे. सदर मूर्ती अतिशय जीर्ण अवस्थेत  असुन ती बाराव्या शतकाच्या पूर्वीची असल्याचे मानले जाते. या शिल्पावर विविध अलंकार, गदा व परशु अशी आयुधे यांचे अंकन दिसते.

श्री देवी सरस्वती


• सप्तमात्रुका •




सप्तमातृका हा हिंदू धर्मातील सात देवींचा एक समूह आहे. यात आदिशक्तीचे भिन्नभिन्न रुपे आहेत. ह्या सप्तमात्रुका म्हणजे प्रमुख पुरुष देवतांची स्त्री शक्ती रूपे आहेत. ब्रह्मापासून ब्रह्माणी, विष्णूपासून वैष्णवी, शिवापासून माहेश्वरी, कार्तिकेय पासून कौमारी, इंद्रापासून इंद्राणी, वराह अवतारापासून वाराही आणि चामुंडा अशा ह्या सप्तमात्रुका पुजल्या जातात. आपल्या गावात असे दोन सप्तमात्रुकापट्ट आढळतात. यावर सर्व देवींच्या वाहनांचे ही अंकण करण्यात आले आहे.



● श्री देवी रेणुका ●


          श्री देवी रेणुका ही इक्ष्वांकु वंशातील रेणु राजाची कन्या, जमदग्नी ॠषीची पत्नी आणि परशुरामांची माता होय. रेणुका देवीस यल्लम्मा, जोगम्मा, मरिअम्मा, महाकाली, जगदम्बिका इत्यादी नावांनी देखील ओळखले जाते. रेणुका देवीचा एक हात हा अहंपणाचा नाश करणारा आणि दुसरा हात हा भक्तांवर वरदहस्त दाखवणारा आहे. महाराष्ट्रासह, कर्नाटक, आंध्रप्रदेशातही देवीचे उपासक आहेत. या रेणुका मातेचा उल्लेख महाभारत, हरिवंश आणि भागवत पुराणात आढळतो. देवी रेणुका ही आपल्या परिवारासह सौंदत्ती येथे राहत असे. रेणुका आणि जमदग्नी यांना वसु, विश्वावसु, रुमण्वत, सुषेण आणि रंभद्रा असे पाच पुत्र होते. यापैकी रंभद्रा हाच परशुराम होय. बापाच्या आज्ञपोटी परशुरामाने आपल्या मातेचा म्हणजेच रेणुकेचा शिरच्छेद केला. यावेळी रेणुकेचे धड हे सौंदत्तीस तर शिर हे माहुर या ठिकाणी पडले. म्हणून माहुर या ठिकाणी रेणुका मातेचे फक्त शिर पूजिले जाते ज्यास तांदळा असे म्हणतात. सौंदत्तीला रेणुका आपल्या परिवारासह राहिली असल्याने तेथील देवीस परिवार देवता म्हणून ओळखले जाते.

          शिलाहार राजधानी कसबा बीड मधील इंद्रजित पाटील यांच्या वाड्यात सौंदत्तीची परिवार देवता रेणुकेचे स्थान आहे. पाटील परिवार वंशपरंपरेने देवीची पुजा अर्चा करत आला आहे. या परिवारात पंचक्रोशीत देवकाका म्हणून प्रसिद्ध श्री परशुराम विठ्ठल पाटील हे मोठे सद्गृहस्थ होऊन गेले. पंचक्रोशीतील भक्तगण देवकाकांच्या मार्गदर्शनासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी येथे येत असत. या पाटील वाड्याच्या देवघरामध्ये रेणुका देवी विराजमान आहे. या देवीच्या डाव्या बाजुला देवी लक्ष्मीची पुजा करण्यात येते. समोर दोन सुळे असलेल्या जडावा पुजण्यात आल्या आहेत. देवकाकांच्या अंगी देवाचा संचार झाल्यानंतर ते तासनतास या सुळ्यांवर उभे राहत असत. या सुळ्यांवर उभे राहुनच लोकांना मार्गदर्शन करत असत. आजही या जडावा मोठ्या आस्थेने पुजल्या जातात. इंद्रजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गावकऱ्यांच्या सहकार्यातुन प्रतिवर्षी गावातील भक्तगणांना सौंदत्तीची यशस्वी यात्रा घडवली जाते. याशिवाय गावात प्रती वर्षी नित्यनियमाने रेणुका मातेचा जागर आयोजित केला जातो.

श्री देवी रेणुका



संदर्भ - 

कसबा बीड एक ऐतिहासिक नगर

          : डाॅ. आनंद दामले.




सुरज संजय तिबीले

यंग ब्रिगेड सुवर्णराजधानी कसबा बीड

मो. नं. : 9503973234

ईमेल आयडी : tibilesuraj7@gmail.com

Saturday, 10 July 2021

श्री श्रेत्र सातेरी महादेव



          कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी आणि करवीर तालुक्यांच्या सीमेवर सातेरी महादेव ही टेकड्यांची रांग स्थित आहे. पुर्व - पश्चिम पसरलेल्या ह्या या रांगेमध्ये साधारणतः वीस ते बावीस लहान मोठ्या टेकड्या आहेत. पूर्वेकडील सर्वांत शेवटची टेकडी म्हणजेच महादेव टेकडी. याच महादेव डोंगरावर श्री महादेवाचे पवित्र स्थान आहे. संपूर्ण कातळात कोरलेले मंदीर, नंदी, खोल्या, पायऱ्या, गुहा आणि विहीर हे या स्थानाचे खास वैशिष्ट्य.



            या डोंगरावर आल्या नंतर प्रथम आपल्याला दिसतो तो साधारण पाच फुट उंचीचा संपूर्ण कातळात कोरलेला नंदी. हा नंदी बसलेल्या स्थितीत असुन त्याचा रोख आग्नेय दिशेस आहे. या नंदीची आभुषणे ही कातळात अगदी उत्तमरितीने कोरण्यात आली आहेत. यानंतर पुढे आपल्याला कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसुन येतात. पुर्वी या पायऱ्या गुडघ्याएवढ्या उंच एखाद्या गडाला साजेशा होत्या. सध्या या पायर्‍या लहान आणि चढण्यास सोयीस्कर बनवण्यात आल्या आहेत.



          पायर्‍यांवरून वर जाता जाता डाव्या बाजूला आपणांस एक विहीर दिसते. अंदाजे 30 ते 40 फुट खोल ही विहीर सध्या रिकामीच आहे. पुर्वी वर डोंगरावर पडणारे पावसाचे पाणी कातळातील भेगांमुळे या विहीरीत साठवले जात होते. काही वर्षांपूर्वी या डोंगरावर ही विहीर एकमात्र पाण्याचा स्त्रोत होती. पण वर ब्लाॅक बसवल्यानंतर ही विहीर कोरडीच राहिली आहे. या विहीरीत उतरण्यासाठी पायऱ्यांची रचना केलेली दिसते. तर त्याच्या आत ठिकठिकाणी खोबण्या करण्यात आल्या आहेत.



          इथुन पुन्हा आपण वर आलो की आपणांस दिसते ते श्री. महादेव मंदिर. पुर्वाभिमुख असणारे हे मंदीर कातळात कोरलेल्या गुहेमध्ये वसले आहे. आतमध्ये एक शिवलिंग स्थापित करण्यात आले आहे. या शिवलिंगावर वेटोळे घातलेल्या नागाची पितळेची मुर्ती नंतर बसवण्यात आली आहे. तर याच्या मागे श्री. शंकराचे आयुध त्रिशुळ ठेवण्यात आले आहे. या गुहेच्या छतावर अगदी मध्यभागी एक गोलाकार रचना दिसते. तीन स्तरांची ही रचना एखाद्या फुलाप्रमाणे दिसते. कालौघात त्याची बरीच झिज झालेली आहे.



           दर्शन घेवून आपण बाहेर आल्यानंतर या गुहेच्या मागे अजुन दोन प्रवेशद्वार आपणांस दिसतात. उजव्या बाजुने आत प्रवेश केल्यानंतर समोरच एका दिवळीवजा जागेत आपल्याला श्री. गणेशाची मुर्ती दिसते. ही संगमरवरी मुर्ती अलिकडच्या काळातच स्थापण करण्यात आली आहे. इथुन उजव्या बाजुने आत जाताच समोर आपणांस दर्शन होते ते आदिशक्ती पार्वती मातेचे. ही सर्वांत आतील गुहा. या गुहेच्या भिंतीवरच पार्वती मातेची सुरेख छाया कोरण्यात आली आहे. याच्या उजव्या बाजूला बसण्यासाठी ओट्याप्रमाणे रचना आहे. तर डाव्या बाजुस एका दिवळीची रचना आहे. गुहेच्या या भागाचे वातावरण सर्वांत शीत आढळते. बाहेर कितीही कडक उन जरी असले तरी आतील गारवा कमी होतं नाही ही याची खासियत आहे.



          बाहेर आल्यानंतर ठिक महादेव मंदीराच्या समोर उभे राहिल्यास तेथुन कोल्हापूर शहरासह आसपासची सर्व गावे दृष्टीस पडतात. याशिवाय इथुन जोतिबा डोंगर, पन्हाळा, पावनगड, मसाई पठार, तुमजाई पठार इ. अनेक ठिकाणे दृष्टीस पडतात. तर या मंदिराच्या मागे आल्यास इथुन राधानगरी तालुक्याचा पुर्व भाग दृष्टीस पडतो. यांत राधानगरीचा जंगल परिसर, डोंगर रांग, धामोडचा तुळशी  जलाशय, केळोशी जलाशय इत्यादीचा समावेश होतो.

          या सातेरी महादेव टेकडीवरून तुळशी नदी, भोगावती नदी, कुंभी नदी यांचे प्रवाह तसेच त्यांचे संगम देखील पहायला मिळतात. पावसाळ्यात या नद्यांचे पाणी वाढल्या नंतर त्यांचे प्रवाह हे स्पष्ट दिसतात. शिवाय संपूर्ण परिसराच्या पुर परिस्थितीवर लक्ष ठेवणे सोयीस्कर होते. नद्यांना आलेल्या ह्या पुरांचे दृष्य येथुन विलोभनीय दिसते. तसेच रात्रीच्या अंधारात कोल्हापूर शहरासह, आसपासच्या गावात लागणाऱ्या विजेच्या दिव्यांचे दृष्यही सुंदर दिसते.



           महादेव डोंगराच्या पश्चिम बाजुने खाली जाताना अनेक गुहा दृष्टीस पडतात. या गुहा नैसर्गिक असुन अनेक वर्षांच्या नैसर्गिक क्रियेने त्या तयार झाल्या आहेत. एकाच वेळी अनेक लोक निवांत बसु शकतील अशा गुहा महादेव डोंगरच्या दक्षिण दिशेस आहेत. तेथे वाढलेल्या झाडीमुळे त्या झाकोळल्या गेल्या आहेत. अशा प्रकारच्या अनेक नैसर्गिक गुहा या सातेरी-महादेव डोंगर रांगेतील टेकड्यावर दिसुन येतात.



         या सातेरी-महादेव डोंगराची बाबत आणखी एक गोष्ट प्रचलित आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात हा भाग काटेरी झुडपे आणि वनराईने भरलेला होता. या भौगोलिक स्थितीचा फायदा घेऊन या परिसरामध्ये सक्रिय असणारी त्याकाळची कुविख्यात दरोडेखोरांची एक टोळी या महादेव डोंगराच्या आश्रयाला राहत होती. महादेव डोंगर हा त्यांचा मुख्य तळ मानला जात असे. येथील गुहा आणि पावसाळ्यात विहिरीमध्ये साचलेल्या पाण्याच्या बळावर काही काळ हे दरोडेखोर येथे वास्तव्य करत होते. एवढ्या उंचावरुन खालच्या भागावर त्यांना लक्ष ठेवणे चांगलेच सोईस्कर होते. कालांतराने ही टोळी निष्क्रिय झाली आणि त्यांनी आपली हे स्थान सोडून दिले.

            या महादेव डोंगरापासुन सुरू होणारी ही सातेरी-महादेव डोंगर रांग पुर्व-पश्चिम दिशेस पसरलेली दिसते. या रांगेमध्ये वीस ते बावीस लहानमोठ्या टेकड्या असलेल्या आढळतात. यातील काही टेकड्यांपर्यंत गाडीवाट गेलेली आहे. या टेकड्यांवर आपल्याला अनेक भौगोलिक रचना आढळतात. याशिवाय येथे काजु, आंबा, करवंद, जांभुळ असा विविध प्रकारचा रानमेवा या टेकड्यांवर आपणांस चाखण्यास मिळतो. येथील दुर्मीळ वनराई पर्यटकाचे लक्ष लगेच वेधुन घेते. विविध प्रकारची डोंगरी फुले याठिकाणी पाहण्यास मिळतात. शिवाय येथे ससा, रानमांजर, मुंगुस, अनेक जातीचे साप, विविध फुलपाखरे अशा प्रकारची जीवसंस्था आढळते. पावसाळी भ्रमंतीसाठी या टेकड्या एक उत्तम पर्याय आहे. गेली दोन वर्षे यंग ब्रिगेड सुवर्णराजधानी कसबा बीड ही संघटना येथे ट्रेकिंगचे आयोजन करते आहे.







             महादेव डोंगराच्या पायथ्याशी श्री सातेरी देवीचे वास्तव्य आहे. या ठिकाणी आपल्याला एक छोटेखानी मंदीर आढळते. मुळ मंदीराच्या समोर आता एक सभामंडप बांधण्यात आला आहे. या सभामंडपात मध्यभागी काही लहान पादुकांच्या जोड्या ठेवलेल्या आपणांस दिसतात. या पादुका सातेरी देवीसाठी अतिशय पवित्र मानल्या जातात. यांतील मुळ सात जोड्यांची नित्यनियमाने पुजा केली जाते. सभामंडपातुन आत गेल्यास मुळ मंदीर लागते. आकाराने छोटा असणारा हा गाभारा हेमाडपंती बांधकामाचा आहे. कालांतराने त्याला बाहेरून गिलावा करण्यात आला आहे. या गाभार्‍यात एकुण सात देवींची पुजा केलेली दिसते. सात असमान दगडांना देवीच्या रूपात येथे पुजले जाते. या मुर्तींची रचना ही विशिष्ट आहे. मोठ्या पासुन लहानापर्यंत लावण्यात आलेले हे दगड सात बहिणींच्या वयातील अंतर दर्शवतात. साधारणपणे देवी पार्वतीच्या सात रूपांना सातेरी देवींच्या रूपात पुजले जाते. अशी सातेरी देवीची मंदिरे मुख्यतः पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोंकण आणि उत्तर कर्नाटक ह्या भागात अधिक आढळुन येतात. पण या मंदिराविषयी एक खास अख्यायिका आपणांस स्थानिकाकडुन ऐकण्यास मिळते.

          अज्ञात काळी सध्याच्या कसबा बीड परिसरामध्ये एक अनामिक दांपत्य राहत होते. या दांपत्यास एकुण सात मुली होत्या. काही कारणवश या मुलींच्या आईचे निधन झाले. त्यामुळे साऱ्या मुलींचा भार एकट्या बापावर येऊन पडला. काही काळानंतर त्याला त्या मुलींचा सांभाळ करणे असह्य झाले. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी त्याने मुलींना फिरवण्याच्या बहाण्याने सातेरी येथील घनदाट जंगलात आणले. त्या काळी सातेरीवर निबिड अरण्य होते असे म्हणले जाते. या जंगलात व्याघ्रादी श्वापद वास करत होती. सध्याच्या सातेरी मंदिराच्या ठिकाणी येताच या सात मुलींना तेथे बसवून भरल्या मनाने बाप माघारी परतला. रात्रीच्या किरर अंधारात त्या मुली घाबरून गेल्या होत्या. जंगलात हिंस्त्र प्राण्यांचा आवाजाने त्या अधिकच भेदरल्या. आपल्या बापाची वाट पाहता पाहता त्या या रात्रीच निसर्गात विलीन झाल्या. याच ठिकाणी या निसर्गाने या सात मुलींना आपल्यात सामावून घेतले. याच सात मुली पुढे सातेरी देवी म्हणजेच सात देवीच्या रूपात येथे पुजल्या जाऊ लागल्या.



          सातेरी देवीचे मूळ मंदिर हे फार जुने असून येथे अनेक प्राचीन अवशेष आजही आढळतात. मंदिराच्या बाहेरच काही कोरीव अवशेष ठेवलेले दिसतात. तर या मंदिराच्या मागे दोन विरगळ असून ते खंडित आहेत. एका वीरगळीचा फक्त युद्ध प्रसंगाचा भाग उपलब्ध आहे. तर दुसरी वीरगळ खंडित असली तरी त्याचे सर्व भाग उपलब्ध आहेत. ही वीरगळ चार स्तरीय असून यावर गाई-गुरांचे रक्षण करणाऱ्या वीराचे अंकण पहायला मिळते. या वीरगळचा सर्वात खालचा टप्पा हा गुरांचे रक्षण करणाऱ्या वीराला दर्शवतो. दुसऱ्या टप्प्यावर युद्धप्रसंग कोरण्यात आला आहे. तिसरा टप्पा वीराला स्वर्गी नेणाऱ्या अप्सरांचा आहे. तर शेवटचा चौथा टप्पा हा कैलासातील श्री शंकराच्या पूजेचा आहे. या प्रत्येक टप्प्याच्या दरम्यान आपल्याला सुरेख नक्षीकाम दिसते. प्रथमदर्शनी ही वीरगळ शिलाहार पूर्वकालीन असावी असे वाटते.



          या मंदिराच्या दोन्ही बाजूला दोन खोल्या बांधण्यात आल्या आहेत. या खोल्या सातेरी देवीच्या भक्तांना सातेरीची जत्रा करणे सोयीस्कर जावे यासाठी बांधण्यात आल्या आहेत. शेजारची धोंडेवाडी, केकतवाडी, आमशी, नरगेवाडी, वाघोबावाडी या गावचे भाविक प्रत्येक वर्षी सातेरी देवी ची जत्रा साजरी करतात. येथे अनेक बकरी, कोंबडे देवीस अर्पण केले जातात. याशिवाय या मंदिराच्या आसपास अनेक मोठे डेरेदार वृक्ष आणि प्रशस्त जागा असून या ठिकाणी आपणास वनभोजन किंवा अल्पोपहारचा आनंद घेता येतो.

          या मंदिरापासून खाली जाताना धोंडेवाडीला जाणाऱ्या मार्गावर डाव्या बाजूस आत शेतात एक घरवजा मंदिर दिसते. या मंदिरामध्ये नागदेवाची पूजा केली जाते. एका मोठ्या दगडावर एकवीस फण्यांचा नागाचे चित्रांकन असून आमशीतील एक गृहस्थ नित्यनेमाने याची पूजा करतात. या घराच्या मागूनच सातेरी-महादेव डोंगरावर जाणारी पायवाट आहे.



          या मंदिराच्या उजव्या बाजूने जाणारी वाट वाघोबावाडी मार्गे आमशीमध्ये जाते. वाघोबावाडी हे एक लहानसे कमी लोकवस्तीचे गाव आहे. या गावाच्या वाटेवरच एक दरी वजा छोटीशी भौगोलिक रचना दिसते. पावसाळ्यात इथून वाहणारे ओढे, उंचावरून पडणारे पाणी आणि खाली उतरलेले ढग यांचे दृश्य विहंगम दिसते. या मार्गावर बरीच झाडी आढळते. वाघोबावाडी हे गाव तसे या वनराईतच दडले आहे. येथून दिसणारा नजारा तसा सुखावणारा आहे.

        येथुन खाली गेल्यास आपणास आमशी हे गाव लागते. सातेरी-महादेव डोंगरावरील श्री महादेवलाच आमशीचे ग्रामदैवत मानले जाते. डोंगरावरील सर्व व्यवस्था मुख्यता आमचीचे ग्रामस्थच पाहतात. प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीला आमची गाव तसेच महादेव डोंगरावर मोठी यात्रा भरवली जाते. महाशिवरात्री निमित्त आमशी गावातुन पालखी सोहळा तसेच अश्व रिंगण सोहळा योजिला जातो. याशिवाय नवरात्रीच्या काळात श्री. महादेवाचे नऊ दिवस उपवास केले जातात. या काळात आमशी वासीय येथे महादेव डोंगरावर वास्तव्यास असतात. आमशी गावचे नागरिक तसेच पंचक्रोशीतील दानशूर व्यक्तींच्या सहाय्याने श्री शंभू-महादेव देवस्थान ट्रस्ट प्रत्येक सोमवारी येथे येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करते. महसुली दृष्ट्या सातेरी-महादेव डोंगर धोंडेवाडी विभागात येत असला तरी हा मुख्यता आमशीचाच भाग मानला जातो. आमशी गावात एक गजलक्ष्मीचे शिलाहार कालीन मूर्ती आढळते. शिलाहार काळात आमशी हे गाव लहान वसाहतीच्या स्वरूपात अस्तित्वात असावे असा कयास वर्तवला जातो.

            या सातेरी-महादेव डोंगराच्या भोवती नरगेवाडी, केकतवाडी, धोंडेवाडी, गणेशवाडी, अशी गावे स्थित आहेत. धोंडेवाडी ते गणेश वाडी यादरम्यान आपल्याला नागमोडी वळणांचा रस्ता लागतो. या रस्त्यावरच दोन ठिकाणी पावसाळी धबधबे आपल्याला पाहण्यास मिळतात. मुसळधार पाऊस सुरु झाल्यानंतर हे धबधबे प्रवाहित होतात. या धबधब्याचे कोसळणारे पाणी, वाहणारे ओढे यांचे दृष्य ही सुंदर दिसते. वरून येणारे हे पाणी खाली बांधण्यात आलेल्या पाझर तलावात साठवले जाते. खालच्या सखल भागात अलीकडच्या काळात पाझर तलाव तयार करण्यात आला आहे. यामुळे गणेशवाडी गावची काही जमीन ओलिताखाली आली आहे.

          या पाझर तलावाच्या डाव्या बाजूस आपल्याला एक अलग झालेली छोटी टेकडी दिसते. या टेकडीला स्थानिक भाषेत राळ्याची रास असे म्हटले जाते. या टेकडी विषयी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. काही वर्षांपूर्वी राळे नामक धान्याचे या भागात मोठ्या प्रमाणावर पिक घेतले जात होते. या राळ्याची मळणी या टेकडी शेजारी होत असे. या पिकाचे उत्पादन इतक्या मोठ्या प्रमाणावर होत असे की त्याच्या राशीच्या राशी येथे लागत असत. या पिकाचे मोठ्या प्रमाणावर होणारे उत्पादन आणि त्याचे लागणारे मोठे ढिग याची तुलना या टेकडी सोबत केली जात असे. यावरूनच या टेकडीला राळ्याची रास हे प्रतीकात्मक नाव मिळाले आहे. आजच्या घडीला या भागात राळे हे पीक घेतले जात नसले तरी येथे भुईमूग, बाजरी, सोयाबीन, भात अशी पिके घेतली जातात.



          गणेशवाडी गाव ओलांडल्यानंतर आपणास बीडशेड ही बाजारपेठ लागते. आज येथे कापड उद्योग, हॉटेल, दवाखाने, ऑटोमोबाईल, मेडिकल, किराणामाल दुकाने अशा हरएक प्रकारची दुकाने स्थापन झाली आहेत. एक मोठी बाजारपेठ म्हणून बीडशेड उदयास येत आहे. याच्या पुढे आपणांस कसबा बीड, सावरवाडी, बहिरेश्वर अशी गावे लागतात. शिलाहार काळात अत्यंत महत्वाची असणारी ही गावे आजतागायत आपले प्राचीनत्व टिकवून आहेत.

            कोल्हापूर प्रदेशावर राज्य करणाऱ्या शिलाहारांनी आपली उपराजधानी आणि सैन्य तळ कसबा बीड (त्याकाळचे तीरवाड बीड) या ठिकाणी वसवला होता. सध्याच्या आरे, महे, कोगे, बहिरेश्वर, गणेशवाडी, सावरवाडी आणि कसबा बीड या गावांच्या इतकी मोठी असणारी ही राजधानी सातेरी-महादेव टेकडीवरून सहज नजरेच्या टप्प्यात येत होती. प्रथम शिलाहारांनी कराड येथुन कोल्हापूर येथे आपली राजधानी वसवली होती. कोल्हापूर ही मुख्य राजधानी असताना राजाच्या विश्रांतीचे तसेच राजधानी पासुन सुरक्षित अंतरावर सैन्य गतीविधीचे ठिकाण म्हणून कसबा बीड या गावची निवड केली होती. कसबा बीड ते कोल्हापूर यांना जोडणारा मार्ग हा आरे मार्गे जात असे. राजधानी कोल्हापूर आणि सैन्य शिबिर असणाऱ्या कसबा बीड मध्ये सतत संपर्क होत असे. या संपूर्ण मार्गावर सातेरी-महादेव डोंगरावरून लक्ष ठेवणे सोयीस्कर होते. या टेकडीवरून कोल्हापूर आणि त्याच्या पश्चिमेचा बराच परिसर नजरेस पडतो. त्यामुळे येथे राहुन राजधानीच्या जवळपासच्या सर्व हालचाली टिपणे सहज सोपे होते.

           याशिवाय कोंकणातुन येणारा व्यापारी मार्ग हा सध्याच्या घानवडे, आरळे, शिरोली, कसबा बीड, बहिरेश्वर, म्हारूळ, सांगरूळ, कोपार्डे, कळे अशा मार्गाने शिलाहारांचे मुख्य लष्करी ठाणे आणि नंतर झालेले राजधानीचे ठिकाण पन्हाळा गडाकडे जात असे. शिलाहार राजा भोज यांच्या एका ताम्रपटातही तीरवाड बीड ते पन्हाळा मार्गाचा उल्लेख आला आहे. या संपूर्ण मार्गावर सातेरी-महादेव टेकडीवरून नजर ठेवण्यास मदत होतं असे. वर उल्लेख आलेल्या व्यापारी मार्गावर अनेक टप्पे तयार करण्यात आलेले आहेत. जसे शिरोली तेथील डोंगर, सातेरी-महादेव डोंगर, सांगरूळ येथील डोंगर. या टप्प्यावरून सदर व्यापारी मार्गावर नजर ठेवली जात असे. या सर्व टप्प्यांपैकी सातेरी-महादेवाचे स्थान सर्वांत उंच आहे. या स्थानावरूनच व्यापारी मार्गावरील सर्व टेहळणीची ठिकाणे सहज दृष्टीस पडतात. आरळे-घानवडे पासुन ते पन्हाळा दुर्गापर्यंतचा पुर्ण व्यापारी मार्ग ह्या एकट्या सातेरी-महादेव डोंगरावरून नजरेस पडत होता. याशिवाय कोल्हापूर, पन्हाळा, कसबा बीड या राजशिबिरांमध्ये परस्पर संपर्क साधण्यास देखील हा डोंगर नक्कीच उपयोगी पडत असेल. प्राचीन काळाच्या अनेक क्लुप्ती वापरून महत्त्वाचे संदेश लवकरात लवकर पोहोचवणे हे आपण अनेक मालिकांमध्ये तसेच छत्रपती शिवरायांच्या युध्द नितीमध्ये पाहिले आहे. असे संदेश कोल्हापूर, पन्हाळा, कसबा बीड तसेच संपूर्ण व्यापारी मार्गावरील टेहळणी ठिकाणांवर पोहचवण्यासाठी या टेकडीचा वापर होतं असावा. इतके हे स्थान महत्त्वाचे होते.

           भौगोलिक दृष्ट्या ही या डोंगराचे आणि डोंगर रांगेचे स्थान महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात या डोंगरावरुन प्रवाहीत होणाऱ्या ओढ्यांचे पाणी खाली तयार करण्यात आलेल्या पाझर तलावांत साठवले जाते. याचा फायदा पायथ्याच्या गावांना होतो. तसेच येथील वाऱ्याची गती पाहता पवनचक्की प्रकल्पाद्वारे येथे वीज निर्मितीही होवू शकते. शिवाय जीवसंस्थेच्या आधीवासासाठी हे डोंगर महत्त्वाचे आहेत.

            श्री. श्रेत्र सातेरी-महादेव हे स्थान नैसर्गिक, भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे आहे. या ठिकाणी सांस्कृतिक पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन, निसर्ग पर्यटन होवू शकते. या दृष्टीने येथे पर्यटन व्यवसाय वाढवला जाऊ शकतो. पर्यटन वाढीसोबतच येथे स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होवू शकतात. महाशिवरात्री, नवरात्री तसेच प्रत्येक सोमवारी अनेक भाविक या ठिकाणाला भेट देत असतात. या सर्व भाविक आणि पर्यटकांसाठी येथे चांगले रस्ते, प्रसाधनगृहे, वीजेची सोय अशा प्रकारच्या सोयी होणे अत्यंत महत्वाचे आहे. तसेच या परिसरामध्ये अनेक ठिकाणी बेकायदेशीर उत्खनन देखील वाढले आहे. स्थानिक प्रशासनाने वेळीच लक्ष घालुन नियोजनबद्ध रितीने या जागेचा विकास करणे गरजेचे आहे. आपणही आपल्या मित्रपरिवारासह, आपल्या कुटुंबासह येथील इतिहास, सांस्कृतिक वारसा, निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी किमान एकदा तरी या ठिकाणाला अवश्य भेट द्याच. सातेरी-महादेव डोंगरासोबतच आपण या भागातील बहिरेश्वर, सावरवाडी आणि कसबा बीड या गावातील ऐतिहासिक पर्यटनही तुम्ही अनुभवू शकता. अधिक माहिती आणि गाईड साठी यंग ब्रिगेड, सुवर्णराजधानी कसबा बीड ही संघटना सदैव आपल्या सेवेत तत्पर आहे.




          धन्यवाद..



सूरज संजय तिबीले

यंग ब्रिगेड, सुवर्णराजधानी कसबा बीड

मो. नं. : 9503973234

ई-मेल : tibilesuraj7@gmail.com